भुकेलेल्या बिबट्याने मारला कोंबड्यांवर ताव! माळेगाव पठार येथील घटना; शेतकर्याचे मोठे नुकसान
नायक वृत्तसेवा, घारगाव
भूकेने व्याकुळ झालेल्या बिबट्याने थेट खुराड्यात प्रवेश करीत सुमारे साठ कोंबड्यांवर ताव मारला आहे. सदर घटना संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील माळेगाव पठार गावांतर्गत असलेल्या रामेश्वरदरा येथे शनिवारी (ता.9) पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. यामुळे पशुपालक व शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
माळेगाव पठार गावांतर्गत असलेल्या रामेश्वरदरा येथील नवनाथ आबाजी पांडे यांच्या घराजवळच कोंबड्यांचे खुराडे आहे. या खुराड्यात सुमारे पन्नास मोठ्या कोंबड्या व दहा लहान पिल्ले होती. शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास भुकेलेला बिबट्या थेट खुराड्यात घुसला आणि निम्या कोंबड्या फस्त केल्या. तर काही भीतीने मृत्यूमुखी पडल्या. नेहमीप्रमाणे पांडे पहाटे पाच वाजता झोपेतून उठून घराबाहेर आले असता खुराड्यात बिबट्या दिसला. यावेळी काहीक्षण त्यांचीही भंबेरी उडाली. मात्र, त्यांना पाहताच बिबट्याने धूम ठोकली. त्यानंतर खुराड्यात जावून पाहिले असता काही कोंबड्या गतप्राण अवस्थेत दिसल्या. सदर घटनेची माहिती वन विभागाला मिळाली असता घारगावचे वनपरिमंडळ अधिकारी रामदास थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक योगिता पवार व सुखदेव गाडेकर यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने तात्काळ पिंजरा लावावा अशी मागणी मल्हारी पांडे, सतीश क्षीरसागर, ज्ञानेश्वर पांडे, साईनाथ धादवड, उत्तम पांडे, नारायण धादवड आदी शेतकर्यांनी केली आहे.