उद्धवजींना साईंची शाल दिली आणि ते मुख्यमंत्री झाले ः केसरकर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर दीपक केसरकरांचा दुसरा शिर्डी दौरा

नायक वृत्तसेवा, शिर्डी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी नुकतेच शिर्डीत येऊन साई समाधीचे दर्शन घेतले. केसरकर हे निस्सीम साईभक्त असून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर 15 दिवसांत हा त्यांचा दुसरा शिर्डी दौरा होता. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी शिर्डीतील शालीचा किस्सा सांगितला.

महाविकास आघाडी सरकार बनत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. त्यावेळी आम्ही सर्व आमदार एकाच हॉटेलात वास्तव्यास होतो. फक्त मला एकट्याला साईदर्शनासाठी शिर्डीला येण्याची परवानगी मिळाली. मी येथून साईंची शाल घेतली आणि उद्धवजींना दिली तर ते मुख्यमंत्री झाले, असे दीपक केसरकरांनी सांगितले. आता पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी साईंची शाल घेऊन मी निघालो आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील एकी कायम टिकू दे आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारे स्थिर सरकार असू दे अशी प्रार्थना साई चरणी केल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.

केसरकरांना तुम्ही शिवसेना भवनावर दावा करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. आम्ही कुठंही मातोश्री किंवा शिवसेना भवनावर दावा केलेला नाही. केवळ बाळासाहेबांशी नातं असल्याने आपला मान जपला जाईल, मात्र शिवसैनिक जगले पाहिजेत, ते आहेत म्हणून पक्ष आहे. एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत. बाळासाहेबांचा विचार मी शिवसैनिकांना शिकवला पाहिजे असं अजिबात नाही. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीचा मोठेपणा टिकवणं गरजेचं असल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे.

आम्ही काँग्रेसपुढे झुकावं का? ठाकरेंना प्रश्न..
आपल्याभोवती जे कोंडाळं असतं याचा आपण कधीतरी वेध घ्यायला हवा. बाळासाहेबांच्या मध्ये येण्याची कुणाची हिंमत नव्हती. मी एकटा राहिलो तरी चालेल मात्र काँग्रेससोबत जाणार नाही, हा विचार बाळासाहेबांचा होता. तोच पुढे घेऊन आम्ही चाललोय. आम्ही काँग्रेसच्या पुढे झुकावं का? हा प्रश्न आहे, असं म्हणत केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आठवण करून दिली.
