अवघ्या आठ मिनिटांतच चोरट्यांचा दोन मंगळसूत्रांवर डल्ला! नवरात्रोत्सवात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; स्थानिक गुन्हे शाखेचा ‘धाक’ नेमका कोणावर?..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे नवरात्रोत्सवात देवीशक्तीचा जागर सुरु असताना दुसरीकडे संगमनेरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे ओरबाडून नेणार्या चोरट्यांनी पोलिसांच्या उपस्थितीलाच आव्हान दिले आहे. रविवारी सकाळी अवघ्या आठ मिनिटांच्या अंतराने दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी शहरातील दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेली. या दोन्ही घटनांमध्ये पीडित महिलांनी केलेले वर्णन आणि पालिकेच्या सीसीटीव्ही कॅमेर्यांनी टिपलेली छबी यातून दोन्ही प्रकार चोरट्यांच्या एकाच जोडीने केल्याचेही स्पष्ट झाले असून घटनेनंतर आरोपी लोणीच्या दिशेने पसार झाले आहेत. महिलांचा उत्सव मानल्या जाणार्या नवरात्रोत्सवातच एकापाठोपाठ दोन घटना समोर येवून त्यात तब्बल दोनतोळे वजनाचे मंगळसूत्र लांबवले गेल्याने महिलांमध्ये दहशत निर्माण झाली असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे गेल्याकाही दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) शहराभोवतीच घुटमळत असतानाही या घटना घडल्याने मोठे आश्चर्य निर्माण झाले असून या शाखेचा ‘धाक’ नेमका कोणावर आणि कशासाठी यावरुनही चर्चा रंगल्या आहेत.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील पहिली घटना रविवारी (ता.18) सकाळी 10 वाजून 39 मिनिटांनी मालपाणी हॉस्पिटलसमोर घडली, तर त्यानंतर अवघ्या आठ मिनिटांनी, 10 वाजून 47 मिनिटांनी पुणे-नाशिक महामार्गावरील 132 केव्ही सबस्टेशनसमोर दुसर्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडण्यात आले. या दोन्ही ठिकाणी चोरट्यांनी आसपासची वर्दळ आणि एकट्या महिलांना लक्ष्य करुन क्षणार्धात पोबारा केल्याने उत्सवाच्या काळातच महिलांमध्ये चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. यातील पहिल्या घटनेत सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचे, तर दुसर्या घटनेत एक तोळा वजनाचे मंगळसूत्र चोरीस गेले आहे.

गणेशविहार परिसरात राहणार्या सोनाली म्हातारबा गोल्हार या रविवारी सकाळी आपल्या मुलाला शिकवणीला सोडून पायी घरी परतत होत्या. सकाळी 10 वाजून 39 मिनिटांच्या सुमारास त्या जाणता राजा मैदानाजवळील मालपाणी हॉस्पिटलसमोर असताना समोरुन काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरुन दोघे आले. तोंडाला रुमाल बांधलेल्या या दोघांपैकी मागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्रावर हात मारला आणि सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचा ऐवज ओरबाडून दोघांनी पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकाराने गोल्हार यांना सावरण्याचीही संधी मिळाली नाही. त्यांनी आरडाओरड केली, मात्र सकाळच्या वेळी परिसरात वर्दळ कमी असल्याने चोरट्यांचे फावले.

या घटनेला अवघी आठ मिनिटे उलटत नाहीत तोच दुसरी महिला त्याच प्रकारची शिकार ठरली. ऐश्वर्या पेट्रोलपंपाच्या पाठीमागील बाजूस राहणार्या निर्मला वसंत तळेकर या पायी जात असताना सकाळी 10 वाजून 47 मिनिटांच्या सुमारास काळ्या रंगाच्या पल्सरवरुन त्यांच्या पाठीमागून आलेल्या त्याच दोघांनी त्यांना लक्ष्य केले. मागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील एक तोळा वजनाचे मंगळसूत्र ओरबाडले आणि दोघेही साईश्रद्धा चौकाच्या दिशेने सुसाट वेगात पसार झाले. दोन्ही महिलांनी शहर पोलीस ठाणे गाठल्यानंतर घटनांमधील साम्य स्पष्ट झाले. स्वतंत्र ठिकाणी, काही मिनिटांच्या अंतराने आणि जवळपास एकाच पद्धतीने घडलेल्या या घटनांनी चोरट्यांचा शहरातील बिनधास्त वावरही उघड केला.

गेल्या अनेक महिन्यांपासून शहरात घडणार्या अशा सातत्यपूर्ण घटनांसह शहरात सुरु असलेल्या वेगवेगळ्या अवैध व्यवसायांसह गोवंश व गुटखा तस्करीवर नियंत्रण आल्याचे चित्र दिसत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून अचानक सक्रिय झालेल्या स्थानिक गुन्हेशाखेच्या कारवायांनी शहरात अशाप्रकारचे सर्व उद्योग राजरोस असल्याचे स्पष्ट केले असून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धाकाने काही महिने टपर्यांमधून ‘गायब’ झालेला गुटखाही आता हळुहळु पुन्हा आपली जागा घेत आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरु असलेल्या कारवाया नेमक्या कोणावर धाक निर्माण करण्यासाठी सुरु आहेत असा प्रश्न उपस्थित झाला असून या प्रकरणाच्या तपासातच त्याचे उत्तर दडल्याची चर्चाही आता शहरात सुरु झाली आहे.

नवरात्रोत्सवात शहरातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी महिलांसह अबालवृद्धांची गर्दी होते. गरबा आणि दांडियाच्या कार्यक्रमांमुळे सायंकाळच्या वेळी महिलांची वर्दळही मोठ्या प्रमाणात वाढते. अशा काळात गर्दीच्या ठिकाणीच नव्हे, तर महिलांची ये-जा असलेल्या रस्त्यांवर आणि कमी वर्दळीच्या परिसरातही पोलिसांची गस्त प्रभावी असणे आवश्यक आहे. उत्सवाच्या काळात मंगळसूत्र चोरीसारखे गुन्हे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करतात. त्यामुळे अशा घटनांकडे केवळ चोरीच्या घटना म्हणून न पाहता त्याच्या मूळात जावून तत्काळ त्याचा छडा लावण्याची गरज आहे. गुन्हेगारांवर धाक निर्माण करण्यासाठी एकामागून एक छापे घालणारी स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाकडे किती गांभीर्याने पाहते याकडे आता संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.

