शेंडेवाडीच्या आदिवासी नागरिकांना मिळाल्या नवीन शिधापत्रिका! महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांच्या ‘यशोधन’ जनसंपर्क कार्यालयाचा पाठपुरावा
नायक वृत्तसेवा, घारगाव
राज्यात समृद्ध तालुका म्हणून संगमनेरचे लोकप्रतिनिधी तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ओळख निर्माण केलेली आहे. सहकार, शिक्षण, आरोग्य, मुलभूत सुविधा व प्रशासनाच्या दृष्टीने मतदारसंघात लौकिक मिळविला आहे. गुरुवारी (ता.4) सकाळी इंद्रजीत थोरात यांच्या प्रयत्नांतून आणि ‘यशोधन’ जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील साकूर गटांतर्गत असणार्या हिवरगाव पठार येथील शेंडेवाडीच्या आदिवासी बांधवांना नवीन शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. यामुळे इतक्या वर्षानंतर शिधापत्रिका मिळाल्याचे पाहून आदिवासी बांधवांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते.
पठारभाग हा डोंगरदर्यांच्या सान्निध्यात वसलेला आहे. यामुळे संगमनेरचे लोकप्रतिनिधी बाळासाहेब थोरात यांनी सतत पठारभागावर लक्ष केंद्रित करुन मुलभूत सुविधा पुरविण्यावर भर दिलेला आहे. यासाठी ‘यशोधन’ जनसंपर्क कार्यालय सतत शासनाच्या योजना आणि सुविधा देण्यासाठी तत्पर असते. या कार्यालयांतर्गत मतदारसंघात सर्वत्र जनसेवकांची निवड केलेली आहे. त्यानुसार ते नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करतात. त्याचाच भाग म्हणून अनेक वर्षांपासून शिधापत्रिकेपासून दुर्लक्षित असलेल्या हिवरगाव पठार येथील शेंडेवाडीतील आदिवासी बांधवांना गुरुवारी शिधापत्रिकांचे वाटप केले.
आदिवासी बांधव हे उदरनिर्वाहासाठी सतत कामात व्यस्त असतात. त्यातच कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची माहिती नसल्याने ते शासनाच्या सुविधा घेण्यापासून दूरच राहणे पसंत करतात. त्यामुळे यशोधन जनसंपर्क कार्यालयाने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इंद्रजित थोरात यांच्या प्रयत्नांतून तहसीलमध्ये पाठपुरावा करुन शिधापत्रिकांचे वाटप केले. यामुळे आदिवासी बांधवांना धान्य मिळणे, आरोग्य सुविधा यांसह इतर शासकीय प्रतिपूर्तीसाठी महत्त्वाचा दस्तावेज म्हणून उपयोग होणार आहे. सदर शिधापत्रिका वाटपवेळी बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, जिल्हा परिषद महिला बालकल्याण समितीच्या सभापती मीरा शेटे, आदिवासी सेवक प्रा.बाबा खरात, सरपंच सुप्रिया मिसाळ, उपसरपंच दत्ता वनवे, भाऊसाहेब नागरे, जनसेवक अविनाश आव्हाड, पांडुरंग वामन आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.