श्रीरामपूरमध्ये पेपरमिलच्या हौदात बुडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू वैद्यकीय अहवालानुसार पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
येथील औद्योगिक वसाहत परिसरातील दोन मजुरांचा एका पेपरमिलच्या हौदात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे. मनोजसिंग दयाशंकर सिंग (वय 35) व प्रशांत विरेश भुतळे (वय 16, दोघेही रा.धनगरवाडी) असे मृतांची नावे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी दिली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, प्रशांत हा आपल्या आईसोबत पेपरमिल परिसरात राहत होता. बुधवारी सांयकाळी त्याची आई शेतमजुरीचे काम आटोपून घरी परतली. त्यावेळी प्रशांत हा घरात नसल्याने आईने त्याचा सर्वत्र शोध घेतला. दरम्यान, औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) परिसरात रात्रीच्या सुमारास एका पेपरमिलच्या कागदी लगदा तयार केल्या जाणार्या हौदात प्रशांत व मनोजसिंग याचा मृतदेह आढळून आला.
त्यानंतर ही माहिती रात्री सर्वत्र पसरल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी जमलेल्या कामगारांनी दोघांनाही हौदाबाहेर काढून येथील कामगार रुग्णालयात काल रात्री उशिरा उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करुन दोघेही मृत असल्याचे घोषित केले. त्यामुळे दोन्ही कुटुंबासह कामगार वर्गावर शोककळा पसरली. वैद्यकीय अहवालानुसार तालुका पोलिसांनी मध्यरात्री अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक साळवे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून घटनेची माहिती घेवून पुढील तपास सुरु केला आहे. मृतदेहांच्या उत्तरणीय तपासणीनंतर गुरुवारी (ता.8) दुपारच्या सुमारास शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले.