साईसंस्थानच्या जुन्या रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी कोविड सेवेत इतर रुग्णांवरील उपचार आता राहणार बंद; तर रेमडेसिवीरसाठी नातेवाईकांचे हाल

नायक वृत्तसेवा, शिर्डी
राहाता, शिर्डी व लोणी ही तीनही मोठ्या लोकसंख्येची गावे कोविडचा ‘हॉटस्पॉट’ ठरली आहे. तालुक्यात कोविड उपचार घेणार्‍या रुग्णांच्या संख्येने बुधवारी नऊशेचा आकडा पार केला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गुरुवारपासून साईसंस्थानच्या जुन्या रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी कोविड सेंटरच्या सेवेत पाठविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत तहसीलदार कुंदन हिरे म्हणाले, साईसंस्थानच्या जुन्या रुग्णालयात कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांवर उपचार गुरुवारपासून बंद करण्यात येणार आहेत. तेथील डॉक्टर व कर्मचार्‍यांना साईसंस्थान कोविड रुग्णालयात नियुक्त करण्यात येणार आहे. आता कोविड केअर सेंटरमध्ये सहाशे खाटा, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधा असलेल्या चाळीस खाटांसह एकूण एकशे चौदा खाटा, तसेच डेडिकेटेड कोविड रुग्णालयात तीन व्हेंटिलेटरच्या सुविधेसह पन्नास खाटांचा अतिदक्षता विभाग कार्यरत आहे. राहाता शहरातील जनरल सर्जन डॉ.किरण गोरे, स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ.दत्ता कानडे व साकुरी येथील डॉ.व्ही.एम.वाणी यांनी ऑक्सिजन बेडची सुविधा असलेली कोविड रुग्णालये सुरू केली.

दरम्यान, साईसंस्थानच्या कोविड रुग्णालयात वैद्यकीय सेवा देणार्‍या डॉक्टरांना व्हेंटिलेटर टेक्निशिअन तातडीने उपलब्ध करावेत, चाळीस रुग्णांमागे किमान दोन डॉक्टर असावेत, कर्मचार्‍यांची संख्या वाढवावी, नातेवाईकांच्या मुक्त वावराला आळा घालावा, खासगी व सरकारी, असा भेद न करता तालुक्यातील सर्व एमबीबीएस डॉक्टरांची येथे नियुक्ती करावी, अशी मागणी एका डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर बोलताना केली आहे.

रेमडेसिवीर लसीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला आहे. नऊशे रुपये किंमतीचे हे इंजेक्शन साडेतीन हजार रुपये मोजूनही मिळत नाही. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल सुरू आहेत.
– नीलेश कोते (उपनगराध्यक्ष, शिर्डी)

Visits: 164 Today: 1 Total: 2057218

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *