आणखी एका नायब तहसीलदारांना कोविडने जखडले..! नवरात्रोत्सवात संगमनेरकरांंना दिलासा मिळण्याची श्रृंखला मात्र आजही कायम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून संगमनेरकरांना कोविडपासून मिळणारा दिलासा कायम असून आजही घसरती रुग्णसंख्या समोर आली आहे. नागरिकांमध्ये कोविडविषयक झालेली जागृती, आणि भारतीय वातावरणातील मानवीय शारीरिक क्षमता या जोरावर दुस्रया टप्प्यातील संक्रमण आटोक्यात आल्याचे काही वैद्यकीय जाणकारांचे मत आहे. मात्र हिवाळ्यातील वातावरणात संक्रमणात वाढ होण्याची शक्यताही काही तज्ज्ञांकडून वर्तविली जात असल्याने आजचा दिलासा किती दिवसांचा याबाबत भाष्य करणं अशक्य आहे. आज रॅपिड अँटीजेनसह खासगी प्रयोगशाळेच्या अहवालातून 22 रुग्ण समोर आले असून तालुक्याने 3 हजार 985 रुग्णसंख्या गाठली आहे.

गेल्या 1 ऑक्टोबरपासून एखाद् दिवसाचा अपवाद वगळता संगमनेरकरांना सलग दिलासा मिळत आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यातील 20 दिवसांत शहरातील एकासह अवघ्या दोघांचा बळी गेल्याने संगमनेरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यासोबतच दररोज समोर येणार्या रुग्णसंख्येतही मोठी घट होत असल्याने येत्या काही दिवसांत तालुक्यातील संक्रमण आटोक्यात येण्याचेही चित्र निर्माण झाले आहे. मात्र हा विषाणू अदृष्य असल्याने जोवर त्यावरील प्रभावी उपाय येत नाही तोवर त्याचा धोका कायमच राहणार आहे हे मात्र निश्चित आहे.

आज खाजगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीतून शहरातील अवघ्या चौघांसह 22 जणांचे अहवाल संक्रमित आले आहेत. त्यात शहरातील गोविंदनगर परिसरातील 20 वर्षीय तरुणी, परदेशपूरा येथील 28 वर्षीय तरुण, इंदिरानगर परिसरातील 30 वर्षीय तरुण व जनतानगर परिसरातील 66 वर्षीय इसमाचा समावेश आहे. आज शहराच्या रुग्णसंख्येत चौघांची भर पडल्याने शहरातील एकूण रुग्ण संख्या 1 हजार 145 झाली आहे.

त्यासोबत आज तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात 18 रुग्ण समोर आले असून त्यात कनोली येथील 44 वर्षीय तरुण, पेमगिरी येथील 26 वर्षीय महिलेसह बारा वर्षीय मुलगा, सारोळे पठार येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 19 वर्षीय तरुण, जवळे बाळेश्वर येथील 33 वर्षीय तरुण, चिखली येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 35 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथील 55 वर्षीय महिलेसह 48 वर्षीय इसम,

गुंजाळवाडी येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निळवंडे येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, जोर्वे येथील 47 वर्षीय इसम, मिरपूर येथील 25 वर्षीय तरुण, डोंगरगाव येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, रहिमपूर येथील 87 वर्षीय वयोवृद्ध नागरिक, पिंपळगाव कोंझिरा येथील 40 वर्षीय महिला व सावरगाव तळ येथील 56 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव प्राप्त झाला आहे. ग्रामीण भागाच्या रुग्ण संख्येत आज 18 रुग्णांची भर पडल्याने ग्रामीण भागाची एकूण रुग्णसंख्या 2 हजार 840 वर तर तालुक्याची एकूण रुग्ण संख्या 3 हजार 985 वर पोहोचली आहे.

दुसरे नायब तहसीलदारही जायबंदी!
कोविडशी चारहात करणार्या शासकीय अधिकारी व कर्मचार्यांना कोविडचे संक्रमण होण्याच्या काही घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. मात्र गेल्या मोठ्या कालावधीत कोविड योद्ध्यांना संक्रमण होण्याला ब्रेक लागला होता. मध्यंतरीच्या काळात प्रशासनाने शहरातील सर्वच शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचार्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी घेतली. त्यातून महसुल, पोलीस, पंचायत समिती या विभागातील काहींना कोविडची लागण झाल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे पालिकेतील जवळपास 250 हून अधिक कर्मचार्यांच्या चाचण्या मात्र निगेटिव्ह आल्या होत्या. त्यामुळे प्रत्यक्ष कोविडशी चारहात करणार्या कर्मचार्यांमध्ये प्रतिपिंड (अँटी बॉडीज्) तयार झाल्याचे बोलले जात होते.

त्यामुळे शासकीय विभागातील कर्मचार्यांमध्ये कोविड विषयी काहीसे दुर्लक्ष झाल्याचेही निरीक्षण समोर आले असून त्याचा फटका कोविड संक्रमणाच्या पहिल्या दिवासापासून वरीष्ठ अधिकार्यांसह मैदानात शड्डू ठोकून लढणाऱ्या आणखी एका नायब तहसीलदारांना बसला आहे. नाशिकमध्ये केलेल्या स्राव चाचणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून सध्या त्यांच्यावर नाशिकमध्येच उपचार सुरु आहेत.

यापूर्वी कोविडच्या संबंधी जबाबदारी पेलणार्या एका नायब तहसीलदारांना संक्रमण झाले होते. त्यांच्यावर पुण्यात उपचार करण्यात आले. त्यातून त्यांची प्रकृती गंभीर होवून त्यांना व्हेंटीलेटरवर नेण्याची वेळ आली होती. सलग कोविडशी लढताना, मोठ्या कालावधी नंतर मुला-बाळांना भेटण्यासाठी पुण्याला जायचं निमित्त काय झालं, त्यांच्यावर जणू संकटच कोसळलं. ते विनापरवाना पुण्याला गेल्याचा व तेथूनच संक्रमित होवून माघारी आल्याचा ठपका ठेवून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचेच आदेश बजावले होते. ते जायबंदी झाल्यानंतर त्यांचे सगळे कामकाज अन्य एका नायब तहसीलदारांना देण्यात आले होते. त्यांनीही ते तितक्याच ताकदीने पेललेही होते. कोविडचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून मैदानात असलेल्या या लढवय्याला भरतीतही कोविडची लागण झाली नाही, ती आता ओहोटीत झाली आहे. सध्या ते नाशिकमध्ये उपचार घेत असल्याची माहिती आहे.

