महसूल विभागाचे काम इतर राज्यांसाठी अनुकरणीय ः थोरात महाराष्ट्राच्या डिजिटल ‘अमृतवेल’ सात-बारा विशेषांकाचे प्रकाशन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महसूल विभागातील काम इन लाईन ऐवजी ऑनलाईन करण्यासाठी आपण पुढाकार घेतला. त्यामुळे नागरिकांना चांगली सुविधा मिळाली आहे. आगामी काळात सात-बारा, ई-फेरफार, चतुर्सीमा सर्वच ऑनलाईन पद्धतीने मिळणार असून अमृतवेल महाराष्ट्र डिजिटल सातबारा हा विशेषांक गौरवास्पद ठरणार असून राज्याच्या महसूल विभागाचे ऑनलाईन कामकाज हे देशातील इतर सर्व राज्यांसाठी अनुकरणीय ठरत असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे अमृतवेलच्यावतीने डिजिटल सात-बारा पुस्तकाचे प्रकाशन मंत्री थोरात यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, अमृतवेल मीडियाचे संपादक धर्मेंद्र पवार, राज्य समन्वयक व उपजिल्हाधिकारी रामदास जगताप, प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम आदिंसह पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

सुवर्ण जयंती राजस्व अभियान अंतर्गत महसूल विभागातील विविध कामे ऑनलाईन पद्धतीने केली गेली. यामुळे सात-बारासह सर्व उतारे शेतकर्‍यांना मिळवणे सोपे झाले. आत्तापर्यंत 2 कोटी 53 लाख सातबारे हे ऑनलाईन झाले असून आगामी काळात सर्वच उतारे ऑनलाईन करण्यासह चतुर्सीमा, फेरफारही ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे. महाराष्ट्राचे महसूल विभागाचे डिजिटल कामकाज हे राष्ट्रीय पातळीवर गौरवास्पद ठरले असून बाहेरील विविध राज्यांमधून अनेक महसूल विभागाचे वरीष्ठ अधिकारी राज्याची काम करण्याची पद्धती अभ्यास करण्यासाठी येत आहेत. या विभागात अत्यंत चांगले काम करताना अद्ययावत प्रणाली, हायटेक तंत्रज्ञानाचा वापर, त्वरीत दाखल्यांची उपलब्धता व पारदर्शकता यातून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी आपला सातत्याने प्रयत्न असल्याचे महसूल मंत्री थोरात यांनी नमूद केले. त्याचबरोबर या नव्या डिजिटल सात-बारा अंकामुळे एक नवी प्रणाली रूढ होत असून महसूल विभागाच्या या कामात सर्व वरीष्ठ अधिकारी ते तलाठी, कोतवाल या सर्वांचा मोठा सहभाग असल्याचे आवर्जुन म्हणाले. स्वागत व प्रास्ताविक धर्मेंद्र पवार यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर तहसीलदार अमोल निकम यांनी आभार मानले.

Visits: 18 Today: 1 Total: 117753

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *