कोविडच्या संकटातही संगमनेरातील विकृती जिवंतच! बालकांशी अश्लिल चाळे करणारा पोहोचला ‘पोक्सो’ अंतर्गत गजाआड..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यात कोविडचा उद्रेक झालेला असतांनाही शहरातील विकृती जिवंतच असल्याचे दिसून येत आहे. कधीकाळी देवाचा मुक्काम म्हणून देवाचा मळा असे नाव पडलेल्या परिसरातील एका नराधमाने पोलीस ठाण्याजवळील परिसरातील दोघा लहान मुलांना ‘धाक’ दाखवून त्याचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी दोन्ही बालकांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित आरोपी सचिन चांगदेव केदारी याला गजाआड करण्यात आले आहे. हा प्रकार अत्यंत चीड आणणारा असून आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी होत आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्याच्या परिसरात राहणार्या बारा व तेरावर्षीय मुलांना संशयित आरोपी सचिन चांगदेव केदारी (रा.देवाचा मळा, संगमनेर) याने ‘तुम्ही बांधकामाचे गज चोरले आहेत, ही गोष्ट मी तुमच्या घरीच सांगतो’ असे म्हणून त्या बालकांना आरोपी मजकूर याने ‘धाक’ दाखवला. त्यानंतर त्याने त्यातील बारावर्षीय बालकाला ‘चल, मी तुला स्कुटी चालवायला शिकवतो’ असे म्हणत तर तेरावर्षीय मुलाला धाकासह खर्च करण्यासाठी पैशांचे आमिष दाखवून गोल्डन सिटीजवळील काटवनात वेगवेगळ्या वेळी घेवून गेला.

तेथे आरोपीने त्या निरागस बालकांना दमबाजी करीत त्यांच्याशी अश्लिल चाळे करण्यास सुरुवात केली. त्याच्या या कृत्याला त्या बालकांनी विरोध केला असता आरोपीने पुन्हा दमबाजी सुरु केली. असा प्रकार या दोघांसोबत दोनवेळा घडल्यानंतर संबंधित पीडित मुलांनी सदरचा प्रकार आपल्या पालकांना सांगीतला. त्यानंतर गुरुवारी (ता.8) रात्री दोन्ही बालकांच्या पालकांनी पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दोन्ही बालकांना विश्वासात घेवून संपूर्ण प्रकार समजून घेतला.

त्या दोघांनी सांगितलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपी सचिन चांगदेव केदारी याच्या विरोधात भा.दं.वि. कलम 377 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण करणार्या कायद्याचे (पोक्सो) 6 प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला तत्काळ अटक केली आहे. आज त्याला न्यायालयासमोर हजर करुन त्याची पोलीस कोठडी मागितली जाणार आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रोहिदास माळी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकाराने संगमनेरात खळबळ उडाली असून बालकांशी असा घाणेरडा प्रकार करणार्या विकृत नराधमाविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यात सध्या कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरु आहे. राज्य शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्यात कठोर निर्बंध लागू केलेले आहेत. या महामारीच्या भयाने अवघा जिल्हा हादरलेला असताना संगमनेरातून सदरचा ‘विकृत’ प्रकार समोर आल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. सदर प्रकरणाचा सखोल तपास करुन संशयीताने आणखी कोणत्या बालकाचा असा छळ केलाय का? याचाही तपास व्हावा आणि त्याला कठोर शासन व्हावे अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

