खंडणीसाठी विवाहितेचे अपहरण; पाच लाखांची मागणी
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील एका विवाहितेस बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले. शरीरसंबंध ठेवण्याची मागणी करीत आरोपीने पाच लाखांची खंडणी मागितली. यापैकी तीन लाखांची वसुली केली. याप्रकरणी पीडितेने श्रीरामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला असून एकाविरुद्ध अपहरण, विनयभंग, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सुनील लक्ष्मण लोखंडे (रा. शिवानंद गार्डन हाउसिंग सोसायटी, वानवडी, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. लोखंडे याने राहुरी परिसरात गुरुवारी (ता. 30) सायंकाळी सव्वासात वाजता, घरी जात असलेल्या महिलेचे वाहन अडविले. बंदुकीचा धाक दाखवून तिचे अपहरण केले, तसेच शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. ही बाब कोणास सांगितल्यास सोशल मीडियावर बदनामी करण्याची व कुटुंबासह तिला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेस पाच लाखांची खंडणीही मागितली. तीन लाख रुपये पीडितेकडून घेतले. सुटका करून घेतल्यानंतर पीडित महिलेने श्रीरामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. श्रीरामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी (ता.1) राहुरी पोलीस ठाण्यात तो वर्ग करण्यात आला. पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे तपास करीत आहेत.