विजयादशमीच्या दिनी तालुक्याने ओलांडली बाधितांच्या 41 व्या शतकाची सिमा..! शहरातील अवघ्या तिघांसह ग्रामीण भागातील अकरा जणांना संक्रमण झाल्याचे स्पष्ट..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
रॅपिड अँटीजेन चाचण्यांनी आज विजयादशमीची सुट्टी घेतल्याने तालुक्याच्या रूग्ण संख्येत आज मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. शासकीय प्रयोगशाळेकडून मिळालेले अवघे दोन व खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अकरा अहवालातून शहरातील तिघांसह एकूण 13 जणांचे अहवाल आज पॉझिटिव प्राप्त झाले. त्यामुळे तालुक्याच्या रुग्ण संख्येने विजयादशमीच्या दिनी 41 व्या शतकाची सीमा ओलांडली व 4 हजार 104 रुग्ण संख्या गाठली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरासह तालुक्यातील रुग्ण संख्येत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे संगमनेरकरांना काहीसा दिलासा मिळाल्याचेही चित्र आहे. दररोज पस्तिशीच्या आत येणाऱ्या रुग्ण संख्येमुळे तालुक्याचा सरासरी रुग्णवाढीचा दरही कमी झाल्याने तालुक्यातील कोविडची स्थिती आटोक्यात येत असल्याची चिन्हे दिसत आहेत. त्यातच आज प्रशासनाने रॅपिड अँटीजेन चाचणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विजयादशमीची सुट्टी दिल्याने तालुक्याच्या तालुक्याच्या रुग्ण संख्येत कमालीची घट पाहायला मिळाली. मात्र ही घट कोविडचे संक्रमण कमी झाल्याने नव्हे तर, कर्मचारी सुट्टीवर असल्याने झाली आहे.

आज शासकीय प्रयोगशाळेकडून अवघ्या दोन जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यात चिकणी येथील 65 वर्षीय महिला व डोंगरगाव येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा अहवाल संक्रमित प्राप्त झाला आहे. उर्वरित 11 जणांचे अहवाल खासगी प्रयोगशाळेकडून मिळाले आहेत. त्यातून शहरातील इंदिरानगर परिसरातील 29 वर्षीय दोन महिला व अशोक चौकातील 62 वर्षीय महिलेचा समावेश आहे. शनिवारीही शहरातील अवघ्या तीन जणांचे अहवाल पॉझिटिव आले होते. आजही तितकीच रुग्णसंख्या कायम असल्याने शहरातील संक्रमण मात्र आटोक्यात असल्याची स्थिती आहे.

याशिवाय आज प्राप्त झालेल्या अहवालातून तालुक्यातील घुलेवाडी येथील 48 वर्षीय महिला, जोर्वे येथील 58 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथील 47 वर्षीय इसम, संगमनेर खुर्द येथील 55 वर्षीय महिला, कोकणगाव येथील 45 वर्षीय महिला, आश्वी बुद्रुक मधील 19 वर्षीय तरुण व जवळेकडलग येथील 55 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. आज तालुक्याच्या एकूण रुग्ण संख्येत तेरा रुग्णांची भर पडल्याने तालुक्याने बाधितांचे 41 व्या शतकाची सीमा ओलांडताना 4 हजार 104 रुग्णसंख्या गाठली आहे.

