हक्काचा मतदार बांधून ठेवण्याचे ठाकरे गटासमोर आव्हान! मागील आठ निवडणुकांमध्ये काँग्रेसला निर्भेळ यश; शिवसेनेतील उभी फूटही पथ्यावर..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील सलग पाच निवडणुका पक्षचिन्हावर लढविणार्‍या शिवसेनेला आजवर संगमनेर विधानसभा मतदारसंघात विजयी घोडदौड करता आलेली नाही. विशेष म्हणजे प्रत्येकवेळी नवा उमेदवार देणार्‍या शिवसेनेला या पाचही निवडणुकांमध्ये आपल्या मतपेटीतही फारसा बदल करता आलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील पारंपरिक विरोधातील मते वगळता शिवसेनेकडून यापुढेही चमत्कार घडण्याची शक्यता कमी आहे. त्यातच संगमनेर मतदारसंघात पारंपरिक विरोधक असलेली शिवसेना यापूर्वीची प्रत्येक निवडणूक भाजपासोबत लढली असल्याने यंदा होणार्‍या सर्वच निवडणुकांमधून भाजप आणि सेनेच्या दोन्ही गटांच्या मतदारांचे विभाजनही होणार आहे. त्यामुळे एकीकडे फुटलेल्या पक्षाची घडी बसवण्यासोबतच दुसरीकडे नूतन पदाधिकार्‍यांसमोर आपल्या हक्काचा पारंपरिक मतदारही बांधून ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. ठाकरे गटातील पदाधिकार्‍यांच्या निवडीवरुन संगमनेर व अकोले या दोन्ही विधानसभा मतदार संघात निर्माण झालेली नाराजी कोणाच्या पथ्यावर पडते हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्याच्या निर्मितीपूर्वी डाव्या विचारसरणीचा समजला जाणारा संगमनेर तालुका 1962 पासून काँग्रेसच्या ताब्यात आहे. 1985 साली काँग्रेसनेते व विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्वपक्षा विरोधात बंडखोरी करुन त्यावेळची निवडणूक लढविली व विजयही प्राप्त केला होता. तेव्हापासून संगमनेर विधानसभा मतदारसंघ त्यांच्याच ताब्यात आहे. 1990 सालच्या निवडणुकीत भाजप-सेना युतीने पहिल्यांदा वसंतराव देशमुख यांच्या रुपाने त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला. त्यावेळी रामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन सुरु असल्याने देशभर हिंदुत्त्वाची लाट निर्माण झाल्याचेही चित्र होते. मात्र त्या उपरांतही थोरात यांनी 57 हजार 465 मते मिळवून देशमुख यांचा 4 हजार 862 मतांनी पराभव केला होता. दोन्ही उमेदवारातील मतांचा हा फरक नंतरच्या काळात वाढत जावून 2004 साली तो थेट 75 हजार 757 मतांवर जावून पोहोचला.

विशेष म्हणजे 2014 साली देशभरात मोदी लाट निर्माण झालेली असतांनाही थोरात यांनी एक लाखांहून अधिक मते मिळवतांना त्यावेळी शिवसेनेकडून उमेदवारी करणार्‍या जनार्दन आहेर यांचा 58 हजार 805 मतांनी पराभव केला होता, तर 2019 मध्ये उद्योजक साहेबराव नवले यांनाही त्यांनी 62 हजार 252 मतांच्या फरकाने धुळ चारली होती. 1990 ते 2019 पर्यंत झालेल्या सात विधानसभा निवडणुकांच्या मतांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता 4 हजार 862 मतांच्या फरकापासून सुरु झालेला विरोधकांचा पराभव गेल्या निवडणुकीपर्यंत थेट 62 हजारांहून अधिक मतांपर्यंत पोहोचला तर बाळासाहेब थोरात यांना मिळणार्‍या मतांनीही सहा आकडी संख्या ओलांडली. या कालावधीत विरोधकांना 1990 व 1995 या दोनच निवडणुकांमध्ये 50 हजारांहून अधिक मते मिळाली.

या दरम्यान मधल्या कालावधीत झालेल्या चार निवडणुकांमध्ये भाजप-सेना युती असतानाही विरोधकांच्या एकूण मतांची संख्या 40 ते 45 हजार मतांच्या दरम्यानच राहिली. अपवाद गेल्या निवडणुकीत त्यात बदल होवून उद्योजक साहेबराव नवले यांच्या रुपाने शिवसेनेला पहिल्यांदाच 60 हजारांचा आकडा ओलांडता आला, मात्र या निवडणुकीत विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांनीही आजवरची सर्वाधिक 1 लाख 25 हजार 380 मतं मिळवली होती हे विशेष. थोरात यांनी शिवसेना-भाजप युती विरोधात आजवर लढवलेल्या सात निवडणुकांमध्ये 6 लाखा 37 हजार 939 मते मिळवली तर शिेवसेना-भाजपाच्या विरोधी उमेदवारांना त्याच्या जवळपास निम्मी म्हणजे अवघी 3 लाख 45 हजार 582 मतं मिळवता आली. या सातही निवडणुकांमध्ये थोरात यांच्या विजयाची सरासरी मतं विरोधी उमेदवारापेक्षा 41 हजार 765 अधिक होती हे महत्त्वाचे.

गेल्या निवडणुकीनंतर शिवसेना व भाजप यांच्या पारंपरिक युतीत मुख्यमंत्रीपदावरुन कटूता निर्माण होवून दोन्ही पक्षांचे परस्परांशी संबंध ताणले गेले आणि त्यातून राज्याला अनपेक्षित असलेली शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी निर्माण झाली. त्या माध्यमातून राज्यात स्थापन झालेल्या सरकारने अडीच वर्ष राज्याचा कारभार सांभाळल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जूनमध्ये आपल्याच पक्षातील चाळीस आमदारांना फोडून सरकार पाडले व भाजपाला सोबत घेवून राज्याचे मुख्यमंत्रीपदही मिळवले. त्यानंतरही विविध राजकीय घडामोडी घडतच राहिल्या. त्यातून शिंदे यांनी संख्याबळाचा दाखला देत चक्क शिवसेना आणि पक्षाच्या चिन्हावरच दावा ठोकल्याने शिवसेनेत उभी फूट पडली.

या सर्व घडामोडींना आता तीन महिन्यांचा कालावधी लोटला असून त्यातून झालेले मूळ शिवसेनेचे नुकसान आता समोर येवू लागले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राज्यातील बहुतेक सर्वच ठिकाणच्या शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेत मोठे फेरबदल होवून नवशिवसैनिकांच्या हाती पक्षाची सूत्रे गेल्याने जुन्या काळातील शिवसैनिक अडगळीत गेले होते. हाच धागा धरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या शिवसेनेत येण्याची साद घालण्यास सुरुवात केली. त्यातून ठिकठिकाणी शिवसैनिकांचे स्थलांतर घडत असतांना आता संगमनेरातही तेच दृष्य बघायला मिळू लागले आहे. त्यामुळे गेल्या साडेतीन दशकांत शिवसेनेने निर्माण केलेला जवळपास 50 हजार मतांचा गठ्ठा आता विभाजित होणार आहे.

पूर्वी असलेली एकच शिवसेना आज दोन भागात विभागली गेली असून शिंदे गटाच्या शिवसेनेला भाजपाची साथ मिळाली आहे. त्यामुळे गेल्या सात निवडणुकांमध्ये मूळ शिवसेनेने भाजपसोबत जमवलेला पन्नास हजार मतदारांचा हा गठ्ठा अधिकाधिक आपल्याकडे ठेवण्यासाठी शिवसेनेला (ठाकरे गट) मोठी कसरत करावी लागणार आहे. शिंदे गटाची निर्मिती अलिकडची आहे आणि त्यांनी अजूनपर्यंत निवडणुकीच्या माध्यमातून गमावण्यासारखे काही कमावलेले नसल्याने आगामी कालावधीत या फूटीतून होणारे नुकसान एकट्या शिवसेनेलाच (ठाकरे गट) सोसावे लागणार आहे हे मात्र निश्चित.

भाजप-सेना युती असताना 1990 पासून उभे असलेले उमेदवार व त्यांना पडलेली मतं पुढीलप्रमाणे – सन 1990, वसंतराव देशमुख 52 हजार 603, (काँग्रेस 57 हजार 465). सन 1995, बापूसाहेब गुळवे (अपक्ष) 58 हजार 957, (काँग्रेस 73 हजार 611). सन 1999, बापूसाहेब गुळवे (शिवसेना) 40 हजार 524, (काँग्रेस 61 हजार 175). सन 2004, संभाजी थोरात 44 हजार 301, (काँग्रेस 1 लाख 20 हजार 58). सन 2009, बाबासाहेब कुटे 41 हजार 310, (काँग्रेस 96 हजार 686). सन 2014, जनार्दन आहेर 44 हजार 759, (काँग्रेस 1 लाख 3 हजार 564) व सन 2019, साहेबराव नवले 63 हजार 128, (काँग्रेस 1 लाख 25 हजार 380).

Visits: 189 Today: 2 Total: 1103814

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *