म्हाळुंगी नदीपात्रात ‘लाल’ पाण्याचा प्रवाह! पाहणार्‍यांच्या मनात धडकी; अनेकांची उत्सुकतेपोटी काठावर धाव..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पालिका निवडणुकांच्या निकालात ऐतिहासिक यश मिळवणार्‍या संगमनेर सेवा समितीच्या विजयी उमेदवारांच्या प्रभागनिहाय मिरवणुकांनी गल्लोगल्ली गुलालाचा अक्षरशः धुरळा उडावला. त्यामुळे पालिकेने मध्यरात्रीच रस्त्यांची सफाई हाती घेवून अनेक रस्त्यांवरील गुलाल पाण्याने धुवून काढल्याने त्याचे पाणी गटारांद्वारा थेट म्हाळुंगी नदीपात्रातून वाहते झाले. भल्या सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणार्‍यांना नदीपात्रातून वाहणारे लाल पाणी पाहून मात्र धडकीच भरली, त्यामुळे काहींनी लागलीच त्याची छायाचित्र काढून सोशल माध्यमातून एकमेकांकडे विचारणाही सुरु केली. त्याचा परिणाम थेट नदीपात्रात संगमीत होणार्‍या संगमनेरच्या गटारगंगेचे दर्शन घेण्यासाठी अनेकांनी सकाळीच गोडव्या गारठ्यातही नदी गाठली. सरतेशेवटी रस्त्यांच्या सफाईतून वाहणार्‍या गुलालाचे पाणी गटारत मिश्रीत झाल्याने काळ्यारंगाने लाल रंग धारण केल्याचे वास्तव समोर आले आणि सुरुवातीला पाहणार्‍यांची हृदयस्थिती नियमित झाली.


रविवारी (ता.21) संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासह सदस्यपदाच्या 30 जागांची मतमोजणी होवून निकाल घोषीत झाले. या निवडणुकीत आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समितीने ऐतिहासिक यश मिळवताना नगराध्यक्षपदावर विक्रमी मतांसह तब्बल 27 जागांवर यश मिळवले. पालिकेच्या क्रीडा संकुलात मतमोजणी झाल्याने प्रभागनिहाय निकाल घोषीत झाल्यानंतर विजयी उमेदवारांनी तेथूनच आपल्या मिरवणुका सुरु करुन प्रभागात नेल्या. या मिरवणुकांमध्ये भगव्या, गुलाबी व पिवळ्या गुलालासह यावेळी हिरव्या रंगाचाही मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचे दिसून आले. नेहरु उद्यानाजवळील शिवप्रेमी हिंदू मंडळाच्या फलकासमोर मोठ्या प्रमाणात हिरवा रंग उधळला गेल्याने त्यावरुन काहीसा तणावही निर्माण झाला होता, मात्र पालिकेने पाण्याच्या सहाय्याने तो धुवून काढला.


पालिकेच्या क्रीडा संकुलापासून विविध प्रभागांकडे जाणार्‍या रस्त्यांवर अशाच पद्धतीने गुलालाची उधळण होत गेल्याने शहरातील प्रत्येक अंतर्गत रस्ता आणि गल्ल्या गुलालाने अक्षरशः माखल्या गेल्या. वार्‍यातून जमिनीवरील गुलाल हवेत उडून वायू प्रदूषणासह कोणाला इजा होवू नये यासाठी पालिकेने रात्रीच शहरातील रस्त्यांची सफाई हातात घेतली. काही ठिकाणी मशिनरीचा वापर करुन रस्त्यावरील धूळ आणि गुलाल स्वच्छ केला गेला, तर काही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गुलाल पसरलेला असल्याने पाण्याचा प्रवाह वापरुन तो स्वच्छ केला जात आहे. त्यामुळे रस्त्यावरील गुलालाचे लाल पाणी गटारातून वाहत जावून थेट म्हाळुंगी नदीपात्रात पोहोचत असल्याने एरव्ही काळ्याशार वाहणार्‍या सांडपाण्याने तांबडा-लाल रंग धारण केला आहे.


वाहत्या लालपाण्याचे दृष्य पाहणार्‍यांना शहरातील गुलाल सफाईबाबत माहिती नसल्याने वेगवेगळ्या कथा, पटकथांनीही आकार घ्यायला सुरुवात केली होती. मात्र सोशल माध्यमातील छायाचित्रांमधून सदरची बाब समोर आल्यानंतर त्यावर प्रकाश पडल्याने सुरुवातीला लाल रंग पाहून भयभीत झालेल्यांच्या हृदयाची गती सामान्य झाली आहे.

Visits: 265 Today: 1 Total: 1867501

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *