संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत आजही अर्धशतकीय वाढ..! शहरातील दहा जणांसह तालुक्यातील एकूण एक्कावन्न जणांना झाले संक्रमण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मंगळवारी कोविड बाधितांचे बत्तीसावे शतक गाठणार्या संगमनेर तालुक्यात रुग्ण समोर येण्याची श्रृंखला सुरुच आहे. आजही शासकीय व खासगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा करण्यात आलेल्या स्राव तपासणीतून शहरातील 10 जणांसह तालुक्यातील 51 जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील रुग्णसंख्येचा डोंगर वाढतच असून आजच्या रुग्णवाढीने त्यात आणखी भर पडून बाधितांची संख्या 3 हजार 251 वर जावून पोहोचली आहे.

गेल्या महिन्याभरापासून संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्येत वाढ होवू लागली आहे. त्यामागे विविध सण-उत्सवांची कारणे दिली जात असली तरीही प्रत्यक्षात मात्र शहरातील रुग्णसंख्येला काहीसा ब्रेक लागल्याचेही दिसत असल्याने उत्सवांचा फटका फक्त ग्रामीणक्षेत्राला कसा असाही प्रश्न निर्माण झाला आहे. अनलॉक प्रक्रीया सुरु झाल्यानंतर प्रशासनाने टप्प्याटप्प्याने अंत्यसंस्कार, दहावे यासह लग्न समारंभासाठी नियमांची जंत्री ठरवून परवानगी दिल्याचा हा परिणाम असल्याचेही वेळोवेळी सिद्ध झाले आहे.

शहरीभागात प्रशासकीय कार्यालयांची भरमार असल्याने संगमनेरात होणार्या सर्व कार्यक्रमांमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे अपवाद वगळता पालन होत आहे. अर्थात यापूर्वी शहरात काही बडे व्यापारी आणि राजकीय व्यक्तिच्या संपर्कातील नातेवाईकांच्या घरातील लग्न सोहळ्यातून शहरी रुग्णसंख्या वाढण्याचा दांडगा अनुभव संगमनेरकरांच्या पाठीशी आहेच. पण आता हाच अनुभव सध्या ग्रामीणभागात घेतला जातोय, त्यामुळेच शहराच्या तुलनेत तालुक्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येत आहेत.

नात्यागोत्याच्या खेळात समारंभांना अथवा कार्यक्रमांना हजेरी लावण्याचे प्राचीन संस्कार असल्याने संबंधात कटुता नको म्हणून अनेकजण आजही ‘धोक्या’ पेक्षा नात्यांना अधिक महत्त्व देतांना दिसत आहेत. त्यातून ग्रामीण क्षेत्रातील कोविडचे संक्रमण अचानक शिगेला पोहोचल्याचे निरीक्षणही काही जाणकार व्यक्त करीत आहेत. पितृपक्ष पंधरवड्यासह अंत्यसंस्कार व दहाव्याच्या कार्यक्रमातून अनेक गावांना बाधित केल्याचेही दाखले आहेत, मात्र तरीही नागरिक त्यापासून परावृत्त होत नसल्याने ग्रामीण क्षेत्रातील रुग्णवाढीचा सिलसिला आजही कायम आहे.

आजच्या अहवालातून संगमनेर शहरातील दहा जणांसह तालुक्यातील 41 जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. यातील केवळ एक अहवाल शासकीय प्रयोगशाळेकडून तर अठरा अहवाल खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झाले आहेत. आजच्या अहवालातून शिवाजीनगर परिसरातून चार तर देवाचा मळा परिसरातून तीन रुग्ण समोर आले आहेत. शिवाजीनगर मधील 61 व 57 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 29 व 27 वर्षीय तरुण, देवाचा मळा परिसरातील 36 व 24 वर्षीय तरुणांसह बारा वर्षीय बालक, क्षत्रियनगर परिसरातील 24 वर्षीय तरुण, सावतामाळी नगर मधील 33 वर्षीय तरुण व इंदिरानगर मधील 39 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. त्याचबरोबर तालुक्यातील 41 जणांचे अहवालही आज पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यातून गुंजाळवाडीतील 45 व 39 वर्षीय तरुण, सावरगाव तळ मधील 39 वर्षीय तरुणासह 36 वर्षीय महिला, नांदुरी दुमाला येथील 49 वर्षीय इसम, रायतेवाडी येथील 65 वर्षीय महिलेसह 23 वर्षीय तरुण, निमगाव जाळीतील 48 वर्षीय महिलेसह दोन वर्षीय बालक,

वडगाव लांडगा येथील 37 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथील 82 वर्षीय महिला, देवकवठे येथील 49 वर्षीय इसमासह 35 वर्षीय तरुण, चिखली येथील 73 वर्षीय महिलेसह 38 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 41 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 60 वर्षीय महिलेसह 34 वर्षीय तरुण, राहणे मळा येथील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, माळवाडी येथील 21 वर्षीय तरुणी, बोटा येथील 22 वर्षीय महिला, डोळासणे येथील 60 वर्षीय दोघा ज्येष्ठ नागरिकांसह तीस वर्षीय तरुण, पिंपळदरी येथील 40 वर्षीय महिला, घारगाव येथील 32 वर्षीय तरुणासह 22 वर्षीय महिला, जवळे कडलग येथील 34 वर्षीय तरुण, मंगळापुर येथील 34 वर्षीय महिला, सायखिंडी येथील 38 वर्षीय तरुण, शिवापूर येथील 23 वर्षीय तरुण, जोर्वे येथील 48 वर्षीय इसम, कऱ्हे येथील 19 वर्षीय तरुण, झोळे येथील 47 वर्षीय इसमासह 37 वर्षीय महिला व 18 वर्षीय तरुण, पेमगिरी येथील तीस वर्षीय महिला, रायते येथील 59 वर्षीय इसमासह 38 वर्षीय तरुण व 26 वर्षीय महिला अशा एकूण एक्कावन्न जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्ण संख्या 3 हजार 251 वर पोहोचली आहे.

पालिकेचे पावणे तिनशे कर्मचारी ठरले ‘निगेटिव्ह’!
गेल्या चार दिवसांपासून संगमनेरातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या जात आहेत. या चाचण्यांतून सुरुवातीला महसुल विभागातील एका कनिष्ठ अधिकार्यासह चार तलाठी, दोन पोलीस पाटील व पंचायत समितीमध्ये कार्यरत अकरा कर्मचारी बाधित असल्याचे समोर आले होते. गेल्या सोमवारपासून (ता.28) संगमनेर नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचार्यांची सरसकट रॅपिड अँटीजेन चाचणी घेण्यात आली. सोमवारी तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांसह ठेकेदारी पद्धतीने कार्यरत असलेल्या सफाई मजूरांसह एकशे दहा जणांची चाचणी करण्यात आली होती, मंगळवारी (ता.29) पालिकेच्या कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी अशा एकुण 137 जणांची तर आज उर्वरीत 40 जणांची अशी एकुण 287 जणांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे कोविडच्या या वैश्विक युद्धात अगदी सुरुवातीपासून बिनीच्या फळीत असलेल्या पालिकेतील कोणत्याही अधिकारी, कर्मचारी अथवा मजूराला कोविडचा स्पर्श झाला नसल्याचे गेल्या तीन दिवसांतील चाचण्यांमधून समोर आले आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरही समाधानाचे वातावरण आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज ४७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ८३८ झाली आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८८.२२ टक्के झाले आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील रुग्णसंख्येत ६७४ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या ४ हजार ४६७ झाली आहे.

आज जिल्हा रुग्णालयाच्या कोविड प्रयोगशाळेतून ६९, खाजगी प्रयोगशाळेतून २२८ आणि रॅपिड अँटीजेन चाचणीतून जिल्ह्यातील ३७७ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोविड प्रयोगशाळेतील अहवालातून अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ३१, अकोले १२, कर्जत ०२, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०५, पारनेर ०६, पाथर्डी ०१, राहुरी ०१, संगमनेर ०१, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०२, व लष्करी रुग्णालयातील तिघांचे अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले आहेत.

आज खाजगी प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालातून जिल्ह्यातील २२८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ५७, अकोले ०८, जामखेड ०५, कर्जत ०५, कोपरगाव ०७, नगर ग्रामीण २६, नेवासा १३, पारनेर १३, पाथर्डी ०५, राहाता १२, राहुरी २०, संगमनेर २७, शेवगाव ०३, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर २२ येथील रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात विविध ठिकाणी आज करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन चाचणीतून ३७७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ३२, अकोले १८, जामखेड ३०, कोपरगाव २३, नगर ग्रामीण ५२, नेवासा ४०, पारनेर ११, पाथर्डी १९, राहाता ३६, राहुरी १६, संगमनेर ३९, शेवगाव २१, श्रीगोंदा २१, श्रीरामपूर १७, लष्करी क्षेत्र ०२ येथील रुग्णांचा समावेश आहे.

आज जिल्ह्यातील ४७३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील १०२, अकोले ५२, जामखेड ३५, कर्जत १९, कोपरगाव २३, नगर ग्रामीण २९, नेवासा २४, पारनेर १२, पाथर्डी २२,, राहाता ५०, राहुरी १२, संगमनेर २७, शेवगाव २२, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर १६, लष्करी परिसर ०५, लष्करी रुग्णालय १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

- जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या : ३८ हजार ८३८..
- जिल्ह्यात उपचार सुरु असलेले एकूण रुग्ण : ४ हजार ४६७..
- जिल्ह्यातील आजवरचे एकूण मृत्यू : ७१८..
- जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या : ४४ हजार २३
- जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण ८८.२२ टक्के..
- जिल्ह्यात आज ४७३ रुग्णांना डिस्चार्ज तर ६७४ बाधितांची नव्याने पडली भर..

