नेवासा पंचायत समितीवर अंगणवाडी कर्मचारी यूनियनचे निदर्शन एकरकमी लाभाबरोबरच दरमहा निवृत्तीवेतनाची निवेदनाद्वारे केली मागणी

नायक वृत्तसेवा, नेवासा
अंगणवाडी कर्मचार्‍यांना सेवासमाप्तीनंतर देण्यात येणारा एकरकमी लाभ हा तुटपुंजा असून, त्यातून कर्मचार्‍यांचा उदरनिर्वाह होणे शक्य नाही. त्यामुळे एकरकमी लाभाबरोबरच दरमहा निवृत्तीवेतन मिळावे. या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका-मदतनीस कर्मचारी यूनियनच्यावतीने नेवासा पंचायत समितीमधील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रकल्प कार्यालयावर नुकतेच निदर्शन करून निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना यूनियनचे सरचिटणीस कॉ.राजेंद्र बावके म्हणाले, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीतर्फे अंगणवाडी कर्मचार्‍यांना सेवासमाप्तीनंतर दरमहा निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. सदर प्रस्तावानुसार निवृत्तीवेतन योजना लागू करावी ही मागणी संघटनेने गेली अनेक वर्षांपासून शासनाकडे केलेली आहे. शासनाने त्याबाबत सकारात्मक आश्वासने देवून काहीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचार्‍यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर तालुका प्रकल्प स्तरावर आंदोलने केली जात आहे. सरकारने याबाबत निर्णय घेऊन अंगणवाडी कर्मचार्‍यांना न्याय द्यावा. अन्यथा मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

याप्रसंगी यूनियनच्या अध्यक्ष मदिना शेख, सहचिटणीस जीवन सुरुडे, माया जाजू यांची भाषणे झाली. वरील मागण्यांचे निवेदन एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे कार्यालयीन प्रमुख जयश्री जाधव यांचेमार्फत मुख्यमंत्री, महिला बालविकास मंत्री यांना देण्यात आले. अंगणवाडी सेविका सविता दंरदले यांनी आभार मानले. कावेरी शिंदे, चंद्रकला विटेकर, अलका दरंदले, बेबी आदमाने, शरीफा शेख, शांता कोरडे, मंगल मिसाळ, सुषमा सोनवणे, हिरा कदम, सुनीता बोरुडे, सुशिला गायकवाड, अनिता गवळी, रंजना मारकळी, मनीषा बेलदार, अलका तांदळे आदिंसह मोठया संख्येने अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते.

Visits: 151 Today: 1 Total: 2236712

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *