गुरुवार, शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी पास वितरण केंद्र राहणार बंद! भक्तांच्या अलोट गर्दीच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय


नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी येथे श्री साईबाबा समाधी मंदिरमध्ये गुरुवार, शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवार, शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी मंदिर परिसरातील पास वितरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय साई संस्थांनने घेतला आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी ही माहिती दिली आहे.

श्री साईबाबा मंदिर भाविकांसाठी 16 नोव्हेंबरला दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे. मंदिरातील दर्शनाची सुविधा ही मर्यादित स्वरूपाची आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसभरात 15 हजार भाविकांना दर्शन दिले जाऊ शकते. त्यामुळे साईबाबा दर्शनासाठी येताना पूर्वनियोजन करुन व संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन बुकिंग करुन दर्शनास यावे, असे वारंवार आवाहन संस्थान प्रशासनाने सातत्याने केले आहे. मात्र त्यानंतरही श्री साईबाबांचे दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी विशेषतः गुरुवार, शनिवार, रविवार आणि इतर सण अथवा सुट्ट्यांच्या दिवशी होत असल्याने दर्शन व्यवस्थेवर क्षमतेपेक्षा जास्त ताण येत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे आता संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार शिर्डी येथे दर गुरुवारी, शनिवारी, रविवारी तसेच इतर सण व सुट्ट्यांच्या दिवशी श्री साईबाबांचे दर्शनास भक्तगणांनी संकेतस्थळावर जाऊन सशुल्क व निशुल्क दर्शनपास/आरती पास आरक्षित करूनच येणे बंधनकारक आहे. या दिवशी म्हणजेच गुरुवार, शनिवार, रविवार तथा सुट्ट्या व सणांचे दिवशी भक्तांची अलोट गर्दी होत असल्याने श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथील पास वितरण केंद्रे गर्दी नियंत्रण करण्यासाठी बंद ठेवण्यात येतील. शिर्डीत पायी पालख्यांचे प्रमाणही अभूतपूर्वरित्या वाढत आहे. त्यामुळे समस्त पालखी मंडळांनी देखील शिर्डीत पालख्या आणण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Visits: 4 Today: 2 Total: 30100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *