पाणलोटात पावसाचा पुन्हा झंझावात! वाकी ओव्हरफ्लो; मागणी रोडावल्याने निळवंडेचे दरवाजे बंद..
नायक वृत्तसेवा, अकोले
धरणांच्या पाणलोटात गुरुवारी सकाळपासून काहीशी विश्रांती घेणार्या वरुणराजाचे अवघ्या चोवीस तासांतच झंझावाती पुनरागमन झाले आहे. भंडारदर्याच्या पाणलोटात एकसारख्या कोसळणार्या जलधारांनी अवघ्या चोवीस तासांतच धरणात जवळपास 400 दशलक्ष घनफूट पाणी वाढवले आहे. कळसूबाईच्या शिखरांवरही पावसाला जोर चढल्याने कृष्णवंती दुथडी झाली असून या नदीवरील वाकी लघुपाटबंधारे ओसंडल्याने निळवंडे धरणात नवीन पाण्याची आवक वाढली आहे. मुळा खोर्यातही संततधार टिकून असल्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यातच जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा धरणाचा पाणीसाठा 36 टक्क्यांवर पोहोचला आहे. पाणलोटासह लाभक्षेत्रातही आषाढ सरी कोसळल्याने आवर्तनातील पाण्याची मागणी घटली, त्यामुळे निळवंडे धरणातून सुरु असलेले आवर्तन आज थांबवण्यात आले आहे.
गेला आठवडाभर पाणलोटात कमी-अधिक प्रमाणात कोसळणार्या पावसाने बुधवारपासून काहीशी विश्रांती घेतली होती. अधुनमधून कोसळणार्या आषाढसरी वगळता जोर ओसरल्याने धरणातील पाण्याची आवकही घटली होती. मात्र हे चित्र फारकाळ राहिले नाही. गुरुवारी रात्रीपासून मान्सूनच्या ढगांनी पाणलोटाला सर्वदूर व्यापून टाकले आणि मुळा खोर्यासह भंडारदरा व निळवंडे धरणांच्या पाणलोटात सर्वदूर जोरदार पुनरागमन केले. त्यामुळे गुरुवारी रोडावलेल्या ओढ्यानाल्यांना पुन्हा आवेश चढला, रेंगाळलेले जलप्रपात पुन्हा नव्या जोशात खळाळू लागले. त्याचा परिणाम अवघ्या चोवीस तासांतच एकट्या भंडारदरा धरणात 382 दशलक्ष घनफूट पाण्याची वाढ झाली. त्या खालोखाल निळवंडे धरणात 84 दशलक्ष घनफूट पाणी आले. मात्र यातील सुमारे 70 दशलक्ष घनफूट पाणी भंडारदरा धरणातून विद्युत निर्मितीसाठी सोडलेले आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे, रात्र होताहोता नऊ वाजता कृष्णवंती नदीवरील 112 दशलक्ष घनफूट क्षमतेचा वाकी लघु पाटबंधारे प्रकल्पही ओसंडल्याने त्यावरुन जवळपास एक हजार क्यूसेकचा विसर्ग सुरु झाला.
वाकी भरल्याने निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यातही आता वेगाने वाढ होण्यास सुरुवात होईल. गेल्या चोवीस तासांत भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील रतनवाडीसह घाटघरमध्ये पुन्हा विक्रमी सहा इंच पाऊस नोंदविला गेला आहे. त्यासह पांजरे, उडदावणे, साम्रद अशा सगळ्याच भागाच पावसाचा जोर वाढल्याचे वृत्त आहे. मुळा खोर्यातील हरिश्चंद्रगडाच्या माथ्यावर संततधार कायम असल्याने मरगळलेला मुळेचा प्रवाह पुन्हा खळाळू लागला आहे. सकाळ सहा वाजता कोतुळनजीक मुळापात्रातून 3 हजार 822 क्यूसेकचा प्रवाह वाहत होता. गेल्या चोवीस तासांत मुळा धरणात 58 दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात धरणाचा पाणीसाठा 36 टक्के झाल्याने लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे.
गेल्या 24 तासांत भंडारदर्याच्या पाणलोटातील रतनवाडीत विक्रमी सहा इंच (155 मि.मी.) तर, घाटघरमध्ये 145 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. भंडारदरा येथे 137 मि.मी., वाकी येथे 127 मि.मी. व निळवंडे येथे 20 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. सध्या भंडारदरा धरणातून विद्युतगृहासाठी 840 क्यूसेकचा प्रवाह सुरु असून निळवंडे धरणातून सुरु असलेले उन्हाळी आवर्तन थांबवण्यात आले आहे. सकाळी सहा वाजता मुळा धरणात 9 हजार 276 दशलक्ष घनफूट (35.65 टक्के), भंडारदरा 6 हजार 350 दशलक्ष घनफूट (57.52 टक्के), निळवंडे 1 हजार 874 दशलक्ष घनफूट (22.52 टक्के) व आढळा 532 दशलक्ष घनफूट (50 टक्के) (अद्याप नवीन पाण्याची आवक नाही.) इतका पाणीसाठा आहे.
मुळा व भंडारदरा धरणांच्या पाणलोटाच्या तुलनेत निळवंडे धरणाच्या पाणलोटात पावसाचे प्रमाण कमी आहे. कृष्णवंतीच्या खोर्यातून वाहून येणार्या पाण्यावरच या धरणाची भिस्त आहे. शुक्रवारी रात्री 9 वाजता या नदीवरील 112.66 दशलक्ष घनफूट क्षमतेचा वाकी जलाशय भरल्याने सुमारे एक हजार क्यूसेक वेगाने ओव्हरफ्लोचे पाणी वाहत आहे. त्यातच निळवंडे धरणाचे आवर्तनही बंद करण्यात आल्याने या धरणातील पाणीसाठ्यातही आता वेगाने वाढ होण्याची शक्यता आहे.