ब्राह्मणवाड्याची पुणेरी दंतकथा दगडूशेठ हलवाई! पुण्यातील मानाचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती..
नायक वृत्तसेवा, अकोले
पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे भाविकांच्या श्रध्देचे ठिकाण होय. या गणपतीची स्थापना करणारे दगडूशेठ अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील मूळचे रहिवासी राहिलेले दगडूशेठ आज दंतकथा बनले आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचा दगडू धोंडिबा आरोटे ते दगडूशेठ हलवाई हा प्रवास चित्तथरारकच होता. दगडू आरोटे हे स्वत: उदरनिर्वाहासाठी ब्राह्मणवाडा येथे शेती करत होते. पुढे त्यांनी पोट भरण्यासाठी पुण्यात मिठाईचा व्यवसाय सुरु केला. त्यांनी अंदाजे सन 1870 ते 1885 या काळात प्रथम बैलगाडीने व्यवसाय सुरु केला. बैलगाडी घेऊन ते पुण्याला जात. पुण्याला गुळ-खोबरे खरेदी करुन त्याची विक्री राजूर या चाळीसगाव डांगाणच्या प्रमुख ठिकाणी करीत. तेथील प्रसिध्द रेवडी भरुन पुन्हा पुण्याला विक्री करीत. असे कष्ट करणार्या दगडू आरोटे यांचे नामकरण दगडूशेठ झाले. त्यांचे आजोळ वाघोली. हळूहळू त्यांचा ओढा पुण्याकडे वाढला.
आईच्या वतनावर वाघोलीला गेलेल्या दगडूशेठ यांनी पुढे शुक्रवार पेठेत चार मजली इमारत बांधली. तेथेच म्हशींचा तबेला सुरु केला. हनुमान व्यायामशाळा सुरु केली. दुधाचा धंदा असल्याने बर्फी, खवा, मावा व अन्य दुग्धजन्य पदार्थ बनविणारे दगडूशेठ ओघाने दगडूशेठ हलवाई झाले आणि आरोटे नाव जाऊन त्यांनी वाघोलीकर नाव स्वीकारले. पुण्याला जाण्यापूर्वी त्यांनी ब्राह्मणवाडा येथील त्यांची वडिलोपार्जित शेती आपल्या भावाला विकली. त्यांच्या भावकीतील लोक आजही मुक्ताई परिसरात राहत असून सुरेश मारुती आरोटे (तळवाले) त्यांची आजही आठवण सांगतात. या कुटुंबाची नाळ अजूनही ब्राह्मणवाडा गावाशी, तालुक्याच्या कुलदैवताशी (टाहाकारी) टिकून आहे. दगडूशेठ यांना हरिबा व तुकाराम अशी दोन मुले झाली. हरिबा यांचे चिरंजीव विवेक (दगडूशेठ यांचा नातू) दरवर्षी ब्राह्मणवाड्याला येतात. मुक्तादेवी, खंडोबा यांच्या दर्शनाबरोबरच कुलदैवत असणार्या टाहाकारीच्या जगदंबेची पूजा करण्यासाठी जातात.
सन 1893 ला श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्याकाळातील पुण्यातील एक सुप्रसिध्द मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजे त्यांची सुरुवातीची राहायची जागा होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या तुकाराम या मुलाचे देहावसन झाले. त्या घटनेने ते स्वत: व पत्नी लक्ष्मीबाई हे दोघेही व्यथित झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरु माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की आपण काही काळजी करु नका. आपण श्री दत्त महाराज व गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची रोज पूजा करा. ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या माता-पित्यांचे नाव उज्जवल करते त्याचप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्जवल करतील. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेठजींनी श्री दत्त महाराजांची एक संगमरवरी व श्री गणपतीची मातीची मूर्ती बनविली. ती गणपती बाप्पाची मूर्ती म्हणजेच पहिली मूर्ती होय. ही पहिली मूर्ती आज सुध्दा शुक्रवार पेठेतील अकरा मारुती मंदिरात ठेवलेली असून तिची नित्यनियमाने पूजा चालू असते. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती. सन 1894 साली टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली.
बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, मोरप्पाशेठ गाडवे, नारायणराव जाधव, नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर, गणपतराव विठुजी शिंदे, सरदार परांजपे, शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर, नारायण दरोडे यांसह सर्व स्थरातील लोकांनी एकत्र येऊन ही मंगल परंपरा सुरु केली. पुढे सन 1902 साली दुसरी आणि 1967 साली अमृतमहोत्सवानिमित्त तिसरी नवीन गणपतीची मूर्ती तयार करण्यात आली. अशाप्रकारे सध्या गणपती मंदिरात असलेली श्रींची सर्वांग सुंदर, नवसाला पावणारी व त्याकाळी (1967 साली) सुमारे सुमारे 1125 रुपये मूर्ती बनविण्याचा खर्च आला होता. आज हा पुण्यातील एक मानाचा गणपती आहे.