एकाला लाथाबुक्यांनी तर दुसर्‍याला फायटरने बेदम मारहाण! परदेशपुर्‍यातील लागोपाठच्या घटना; दोघांवर ‘अ‍ॅट्रोसिटी’, एकाला अटक..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पोलिसांना आपली माहिती देत असल्याच्या संशयावरुन गेल्या शुक्रवारी संगमनेर खुर्दमधील एका तरुणाला शिवीगाळ, दमदाटी व लाथाबुक्यांनी मारहाण करण्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झालेली असताना पहिल्या घटनेच्या दुसर्‍याच दिवशी पुन्हा तसाच प्रकार घडला. यावेळी आधीच्या प्रकरणात मारहाण झालेल्या तरुणाच्या चुलत भावाला अडवून त्याच आरोपीने आपल्या दोघा साथीदारांसह मारहाण व शिवीगाळ केली. यावेळी आरोपीने आपल्या हातातील लोखंडी फायटरने प्रहार केल्याने त्यात जगन श्रावण राखपसारे हा तरुण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी त्याने दिलेल्या तक्रारीवरुन शनिवारी तिघांविरोधात घातक शस्त्राने मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमवारी रात्री उशिराने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (अ‍ॅट्रोसिटी) तरतुदींनुसार त्यात वाढीव कलमांचा समावेश करण्यात आला असून मुख्य आरोपी स्वप्नील कवडे याला रात्रीच अटक करण्यात आली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील पहिली घटना गेल्या शुक्रवारी (ता.१) शहरातील परदेशपुरा परिसरात घडली. संगमनेर खुर्दमध्ये राहणारा संतोष अभिमन्यू राखपसारे हा रात्रीचे जेवण झाल्यानंतर शतपावलीसाठी परदेशपुर्‍यात आला होता. यावेळी तेथे आलेल्या स्वप्नील कवडे याने त्याला ‘तू आमची माहिती पोलिसांना का देतोस?’ असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने राखपसारे याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करीत ‘तुझ्याकडे बघतोच’ असा दमही भरला. या घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाला. याप्रकरणी पीडित तरुणाने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी स्वप्नील कवडे याच्या विरोधात मारहाण व दमदाटीच्या कलमान्वये अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला.

वरील प्रकार ताजा असताना त्याच्या दुसर्‍याच दिवशी या घटनेचा दुसरा अध्याय घडला. यावेळी पीडित तरुण आधीच्या प्रकरणातील पीडित तरुणाचा चुलत भाऊ, तर मुख्य आरोपी तोच फक्त त्याच्यासोबत अन्य दोघांची भर पडली. शनिवारी (ता.२) सायंकाळी सातच्या सुमारास फिर्यादी परदेशपुर्‍यातून संगमनेर खुर्दकडे जात असताना वरील तिघांनी त्याला नालकर मळ्याजवळ अडवले व शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली.

त्यावर तुमचे भांडण माझ्या चुलत भावाशी आहे, तुम्ही मला कशासाठी दमबाजी करताय? असा खडा सवाल करताच आरोपींचे पित्त खवळले आणि त्या तिघांनीही आधीच्या प्रकरणातील फिर्यादीचा भाऊ जगन श्रावण राखपसारे (वय ३५, रा.संगमनेर खुर्द) याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करीत मुख्य आरोपी स्वप्नील कवडे याने त्याच्या जवळील लोखंडी फायरटरने त्याच्या डोक्यात प्रहार केला व त्यानंतर ते तिघेही तेथून पसार झाले. या प्रकरणात त्याच दिवशी रात्री स्वप्नील कवडे (रा.गोल्डनसिटी, गुंजाळवाडी), तन्मय गोडगे (रा.इंदिरानगर गल्ली नं.२) व अन्य एक अशा तिघांविरोधात घातक शस्त्रांचा वापर करुन मारहाण केल्याप्रकरणी भारतीय दंडसंहितेचे कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला.

सोमवारी (ता.४) वरील गुन्ह्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (अ‍ॅट्रोसिटी) कलम ३ (१), (आर), (एस), ३ (१), (सी) या तरतुदींचा दाखल गुन्ह्यात समावेश करुन या प्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्नील कवडे याला अटक करण्यात आली आहे. आज त्याला न्यायालयासमोर हजर करुन अन्य आरोपींच्या अटकेसाठी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *