मुळा धरण 88 टक्के भरले; नदीपात्रात पाणी सोडण्याची तयारी सुरू

मुळा धरण 88 टक्के भरले; नदीपात्रात पाणी सोडण्याची तयारी सुरू
28 ऑगस्टला धरण तांत्रिकदृष्ट्या पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता
नायक वृत्तसेवा, राहुरी
दक्षिण नगर जिल्ह्याचे जीवनदायिनी असलेले मुळा धरण भरण्याच्या मार्गावर आहे. पाणलोटात सुरू असलेल्या दमदार पावसाने मुळा धरणात रविवारी (ता.23) सायंकाळी 22 हजार 812 दशलक्ष घनफूट पाण्याची नोंद झाली आहे. यामुळे धरण 88 टक्के भरले आहे. दरम्यान, धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याची तयारी पाटबंधारे विभागाने सुरू केली आहे.


26 हजार दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या धरणात सध्या 23 हजर दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. पाणलोटात पाऊस सुरू असल्याने धरणात 6 हजार 260 क्यूसेक्सने आवक सुरु आहे. रविवारी पाणलोट व लाभक्षेत्रावर सूर्यदर्शन झाले. तरीही पाणलोट क्षेत्रावर रिमझिम पावसाने हजेरी लावली. सध्या मुळा धरणातून पाणी सोडण्यासाठी गेटची सर्व्हिसिंग करण्यात आली. लवकरच गेटच्या परिसरात वीज यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. मुळा धरणावरील सायरनची देखील दुरुस्ती करण्यात आली असून, नदीकाठी असणार्‍या नागरिकांना लवकरच सावधानतेचा इशारा देण्यात येणार आहे.


मुळा धरणात 25 हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाल्यानंतर जिल्हाधिकारी व तहसीलदारांना पाटबंधारे खात्याच्यावतीने इशारा पत्र देण्यात येणार आहे. 25 हजार 400 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाल्यानंतर नदीपात्रात पाणी सोडण्याचा नियम आहे. दरम्यान, 28 ऑगस्टला धरण तांत्रिकदृष्ट्या पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Visits: 154 Today: 2 Total: 1591215

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *