गावागावांचा कानाकोपरा चकाचक करताहेत हरिभाऊ उगले स्वच्छतेची जनजागृती करण्यासह सामाजिक वास्तवावर करताहेत भाष्य


नायक वृत्तसेवा, अकोले
हातात खराटे, फावडी, घमेली घेत एक अवलिया गावांमध्ये अवतरतो आणि गावांची उत्स्फूर्तपणे स्वच्छता करू लागतो. एरव्ही गावाला परिचित नसलेल्या या अवलियाचे लोकांना अप्रूप वाटते. लोकही त्यांच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी होतात. काही तासांत गावातील कानाकोपरा चकाचक झालेला असतो ही किमया डोंगरगाव (ता.अकोले) येथील हरिभाऊ ज्ञानोबा उगले हे करताहेत.

हरिभाऊ उगले यांनी संत गाडगेबाबांना आदर्श मानत ग्रामस्वच्छेतेचा वसा घेतला असून त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्रातील एक हजार खेड्यांना भेटी देत तेथे स्वच्छता केली आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील अनेक खेड्यांमध्ये एक रात्र मुक्काम करून त्यांनी ग्रामस्वच्छता करून घेतली आहे. ग्रामस्थ, पदाधिकार्‍यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले आहे. जनजागृती केली आहे. त्यांच्या सामाजिक कार्यात त्यांच्या कुटुंबियांचे नैतिक पाठबळ लाभले आहे. डोंगरगाव शिवारात हरिभाऊंची सहा एकर बागायती शेती आहे. दूधाचा जोडधंदा आहे. त्यांचा गुरांचा गोठा अतिशय स्वच्छ असतो. आदर्श गोठा म्हणून पंचक्रोशीतील नागरिक गोठा पहाण्यास आवर्जून भेट देत असतात.

मोटारसायकलने ते महाराष्ट्रातील खेड्या-पाड्यांत, वाड्या-वस्त्यांवर जातात. तेथे ग्रामपंचायत, मंदिर, शेतात किंवा मिळेल त्या मोकळ्या जागेत मुक्काम करतात. गावकर्‍यांनी प्रेमाने दिलेल्या भोजनाचा आस्वाद घेत ते ग्रामस्वच्छेतेचे काम अविरतपणे करत आहेत. हरिभाऊ या नावाने ते परिचित झाले आहेत. हरिभाऊंच्या स्वच्छतेचा पुरावा काय म्हणता येईल तर हजारोंच्या वर ग्रामपंचायतींनी त्यांना दिलेले प्रशस्तीपत्रक आहे. प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयामधील छायाचित्रेही त्यांच्या मोबाईलमध्ये संग्रहित आहेत. ‘ग्रामस्वच्छतेचा मूलमंत्र, आरोग्य आणि समृध्दी एकत्र’, ‘आपली स्वच्छता आपल्या हाती, मिळेल आजारातून मुक्ती’ अशा विविध प्रेरक घोषवाक्यांच्या पाट्या तयार करून ते जनजागृती करतात.

ग्रामस्वच्छतेबरोबर गावा-गावांमध्ये सुरू असलेल्या कीर्तन सप्ताह, विवाह सोहळ्यात पंगतीत गळ्यात पाटी अडकवून अन्न वाया न जाऊ देण्याचा संदेश हरिभाऊ देतात. ‘जेवढे बसेल पोटात, तेवढेच घ्या ताटात’, ‘महिने लागतात पिकवायला आणि मिनिट लागतो फेकायला’ अशा घोषवाक्याच्या पाट्या उपस्थितांचे लक्ष वेधून घेतात. हरिभाऊंना नदी स्वच्छतेविषयीही तळमळ आहे. डोंगरगाव ग्रामपंचायतीने ग्रामसभेत एक कांतिक्रारी ठराव केला आहे. गावात मृत्यूमुखी पडणार्‍या व्यक्तींचा अंत्यविधी शेतात करणार्‍या कुटुंबाची वर्षभराची घरपट्टी हरीभाऊ स्वतः भरणार आहेत. हरिभाऊंच्या मनात अंधश्रध्देला थारा नाही. ओसाड, उजाड पडलेल्या स्मशानभूमींची हरिभाऊ स्वच्छता करतात.
बोलता-बोलता हरिभाऊ सामाजिक वास्तवावर मार्मिक भाष्य करतात. ते म्हणतात, खेड्या-पाड्यांतील तरूणाई व्यसनांच्या विळख्यात अडकून गेली आहे. मुलींचे घरून पळून जाण्याचं प्रमाण वाढले आहे. आज गावा-गावात 30 ते 35 वय वर्ष ओलांडलेले असंख्य तरूणांचे विवाह झालेले नाहीत. पूर्वीही गावांमध्ये उत्सव, सप्ताह, जत्रा गुण्यागोविंदाने, आनंदाने आयोजित केले जात होते. आज मात्र याला बीभत्स, धांगडधिंग्याचे स्वरूप आले आहे. उत्सवाच्या दुसर्‍या दिवशी चार ते पाच गोण्या भरतील एवढ्या दारूच्या बाटल्यांचा कचरा निघतो. आजच्या समाजाला संत व महापुरुषांच्या विचारांची शिकवण नव्यानं देण्याची गरज निर्माण झाली आहे, असा त्यांचा आग्रह आहे.

Visits: 126 Today: 2 Total: 1107304

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *