चोरट्याचा धुमाकूळ; चंदनापुरीत धाडसी चोरी! रोख रकमेसह लाखो रुपयांचे साहित्य लांबवले

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
तालुक्यातील चंदनापुरी येथील अतिशय गजबजलेल्या नाशिक- पुणे महामार्गावर असलेल्या रॉयल ॲग्रो सर्विसेस,सन्मार्ट सुपर शॉपी या दोन दुकानांमध्ये चोरट्यांनी  धाडसी चोरी करत रोख रकमेसह लाखो रुपयांचे साहित्य घेऊन पोबारा केला.
मंगळवारी मध्यरात्री राहुल पाचोरे यांच्या रॉयल ॲग्रो सर्विसेसचे शटर हत्याराच्या साहाय्याने उघडून रोख रक्कम चाळीस हजार रुपये तसेच किंमती कांदा बियाणे यांची चोरी केली. तर  सिंधू लॉन्स लगत असलेले सागर रहाणे यांच्या मालकीच्या सन्मार्ट सुपर शॉपी मधून किराणा माल आणि सुपर शॉपी मध्ये ठेवलेले डीजे साऊंड सिस्टिम मशिनरी यांची अंदाजे चार लाख किंमतीच्या साहित्याची चोरी केली.सकाळी सन्मार्ट सुपर शॉपीचे मालक दुकानात आल्यानंतर सुपर शॉप मध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे  पोलिस पथकासह चंदनापुरीत दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी  केली तसेच उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम चालू होते.चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे चंदनापुरी पंचक्रोशीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
मंगळवारी मध्यरात्री परिसरातील लाईट बंद केली होती.तसेच नाशिक- पुणे रस्त्या लगत बंद असलेल्या स्ट्रीट लाईट याचा गैरफायदा घेत कृषी केंद्र व किराणा सुपर शॉपी फोडून रोख रक्कम तसेच डीजेच्या साहित्याची धाडसी चोरी केली.टोल प्रशासन संबंधित ठेकेदार यांच्या आडमुठे धोरणामुळे रस्त्याच्या लाईट अनेक ठिकाणी बंद आहेत.
हिवरगाव पावसा टोलनाका  परिसरात अवैध धंदे,आणि गुन्हेगारांची मोठी वर्दळ वाढली आहे.याचा मोठा त्रास पंचक्रोशीतील रस्त्याच्या लगतचे व्यवसायिक, सामान्य नागरिकांना होत आहे.पोलीस प्रशासनाचा धाक राहिला नसल्यामुळे ग्रामीण भागात दुचाकी चोऱ्या,दरोड्यांचे प्रमाण वाढले आहे.ग्रामीण भागामध्ये तसेच टोल परिसरात रात्रीचे गस्त पथक नेमण्याची परिसरातील नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे.
Visits: 154 Today: 1 Total: 1913727

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *