माजी नगराध्यक्षांच्या घरावर दहा ते पंधराजणांचा सशस्त्र हल्ला! एकाला जीवे मारण्याचा हेतू असल्याचा आरोप; संगमनेरात मंगळवारी पहाटे घडलेला धक्कादायक प्रकार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांच्या चैतन्यनगरस्थीत निवासस्थानासह नेहरुचौकातील एकाच्या घरावर मंगळवारी (ता.22) पहाटेच्या सुमारास दहा ते पंधरा सशस्त्र तरुणांनी हल्ला करीत त्यांचा पुतण्या वैष्णव व आदित्य कानकाटे याला आव्हान दिले. मात्र परिस्थितीचा विचार करुन दोन्ही कुटुंबांनी घराचे दार न उघडता पोलिसांना फोन केल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत मुर्तडक व कानकाटे यांच्या तक्रारीवरुन संगमनेर शहरातील पाच निष्पन्न आरोपींसह एकूण 17 जणांवर भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा केला आहे. या घटनेने संगमनेरच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून या घटनेला अन्य कुठली पार्श्वभूमी आहे का याचाही पोलीस शोध घेत आहेत.

याबाबत माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांचे बंधू शिवाजी यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सदरची घटना मंगळवारी (ता.22) पहाटे सव्वादोन वाजेच्या सुमारास त्यांच्या चैतन्यनगर येथील निवासस्थानासमोर घडली. वरील वेळी फिर्यादीचे पुतणे वैष्णव यांना कोणीतरी मोठमोठ्याने हाका मारीत होते. त्यामुळे फिर्यादीने खिडकीतून डोकावून पाहिले असता प्रवेशद्वारासमोर तीन वाहने उभी असल्याचे व विश्वास निसाळ, अंकुश जेधे, संतोष गायकवाड व सनी धारणकर (सर्व रा.संगमनेर) यांच्यासह दहा ते बारा जणांनी त्यांच्या बंगल्याच्या प्रांगणात अनाधिकाराने प्रवेश करुन दरवाज्यावर लाथा घालीत ‘वैष्णव तू खाली ये’ असे म्हणत काहीवेळ आरडाओरड केली व नंतर ते सर्व तेथून निघून गेले.

सदरचा प्रकार घडून गेल्यानंतर पहाटे साडेतीनच्या सुमारास पुन्हा वैष्णवच्या नावाने आरडाओरड कानी आल्याने फिर्यादीने आपल्या शयनकक्षाच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता आधी आलेल्या सर्वांच्या हातात यावेळी काठ्या, गज, लोखंडी रॉड आणि गुप्ती यासारखी हत्यारे दिसत होती व त्यातील काहीजण घराच्या प्रवेशद्वारावर लाथा मारीत असल्याचेही फिर्यादीला दिसले. दोन्ही वेळेला हा सगळा प्रकार सुरु असताना अंकुश जेधे याने वैष्णव मुर्तडक यांच्या मोबाईलवर फोन करुन त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. “सुदैवाने तू खाली आला नाहीस म्हणून वाचलास, आता आज तुला मारण्याचा मूड गेलाय. मात्र उद्या सकाळी तुझ्याकडे बघतो..” अशी धमकी दिल्याचेही दाखल फिर्यादीत म्हटले आहे.

तर, याच दरम्यान घडलेल्या दुसऱ्या प्रकरणात शितलकुमार कानकाटे या नेहरुचौकातील भाजीविक्रेत्यानेही अशीच तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार विश्वास निसाळ व संतोष गायकवाड याच्यासह पाच ते सहा जणांनी मंगळवारी पहाटे सव्वादोनच्या सुमारास नेहरुचौकातील त्यांच्या घरासमोर हातात काठ्या, लाठ्यांसह येवून त्यांचा मुलगा आदित्य याच्या नावाने आरडाओरड करीत शिवीगाळ केली. यावेळी आदित्यच्या मोबाईल क्रमांकावर फोन करुन त्याला जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली, अशा आशयाची तक्रार शीतलकुमार कानकाटे यांनी दाखल केली. त्यावरुन शहर पोलिसांनी विश्वास निसाळ व संतोष गायकवाड याच्यासह पाच ते सहा जणांवर भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये दुसरा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने संगमनेरच्या सामाजिक शांततेला काही प्रमाणात बोटं लागले असून राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

Visits: 357 Today: 4 Total: 1104301
