‘राजहंस’ यंदाची दिवाळी गोड करणार ः थोरात संगमनेर तालुका दूध संघाची 44 वी वार्षिक सभा उत्साहात
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोना संकटात दूध उत्पादकांना मदत करण्याऐवजी खासगीवाले त्यावेळेस गप्प होते. दूध विक्री बंद असताना त्यांनी दूध उत्पादकांना वार्यावर सोडले. अशावेळी राजहंस दूध संघ या उत्पादकांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला. या सहकारी संस्था गोरगरिबांच्या जीवनाशी निगडित आहेत. आपला हेतू प्रामाणिक असून निष्ठेने होत असलेल्या कामांमुळे संगमनेरच्या संस्था अग्रगण्य असून राजहंस दूध संघाकडून यंदाची दिवाळी गोड होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी दूध संघाचे अध्यक्ष तथा महानंदचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख होते तर व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, अॅड. माधव कानवडे, इंद्रजीत थोरात, बाबासाहेब ओहोळ, शंकर खेमनर, लक्ष्मण कुटे, आर. बी. रहाणे, उपाध्यक्ष साहेबराव गडाख, संचालक मोहन करंजकर, सुभाष आहेर, भास्कर सिनारे, विलास वर्पे, गंगाधर चव्हाण, अॅड. बाबासाहेब गायकर, विलास कवडे, संतोष मांडेकर, पांडुरंग सागर, माणिक यादव, राजेंद्र चकोर, प्रतिभा जोंधळे, ताराबाई धूळगंड, कार्यकारी संचालक डॉ. प्रताप उबाळे आदी उपस्थित होते.
आपला हेतू प्रामाणिक असून निष्ठेने व काळजीपूर्वक होत असलेल्या कामांमुळे संगमनेरच्या सहकारी संस्था अग्रगण्य आहेत. या सहकारी संस्थांचा संबंध थेट गोरगरीब माणसांच्या जीवनाशी निगडित आहे. या संस्था आपण निष्ठापूर्वक जपल्या पाहिजे. दूध संघाने कायम अडचणीच्या काळात उत्पादकांना मदत केली आहे. दूध व्यवसाय हा संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा ठरला आहे. कोरोना संकटामध्ये दूध विक्री बंद होती अशा काळात महाविकास आघाडी सरकारने धाडसी निर्णय घेत दहा लाख लिटर दुधाची भुकटी करण्याचा निर्णय घेतला. यातून उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला. राजहंस दूध संघाने याकाळात 1800 मेट्रिक टन दूध पावडर बनवली होती. परंतु दूध पावडरचे दर हे नियमित नाहीत. दूध व पावडर हे नाशवंत आहेत. त्यामुळे याबाबत अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतात. अत्यंत काटकसरीतून हा दूध संघ शेतकर्यांच्या पाठिशी उभा राहिला आहे. दूध संघाची आर्थिक स्थिती मजबूत असून दिवाळीच्या काळात रिबीट जाहीर केले जाणार आहे. यामुळे यंदाची दिवाळी सर्व दूध उत्पादक व कामगार यांच्यासाठी गोड होणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख म्हणाले, कोरोना काळामध्ये दुग्ध विक्री बंद होती. उपपदार्थांची विक्री देखील कमी झाली होती. अशा काळात दुधाचे उत्पादन जास्त असताना राजहंस दूध संघाने पावडर प्लांटचा धोरणात्मक निर्णय घेतला. 1800 मेट्रिक टनाचे पावडर केली असून याकामी महाविकास आघाडी सरकारने मोठी मदत केली. महानंदच्या माध्यमातून दूध संघांसाठी पावडर करण्याचा निर्णय अत्यंत दूरदृष्टीचा ठरला अशा अडचणीच्या काळामध्ये खासगीवाले कोणतेही दूध घेत नव्हते. आता संकट संपले आहे तर एक रुपया वाढून देऊन ते दुधाची पळवपळवी करत आहेत हे अत्यंत चुकीचे आहे. शेतकर्यांच्या संस्था शेतकर्यांनी जपला पाहिजे. उत्पादकांनी खासगी दूध संघांच्या थोड्या आमिषाला बळी न पडता कायम सहकारी संघाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. दूध संघाने सातत्याने नवनवीन उपक्रम राबवले असून शेतकर्यांना मुरघासकरता 110 मेट्रिक टनाची आफ्रिकन मकाचे मोफत वाटप केले आहे. तर सोर्तेड सीमेन्समुळे 95 टक्के गायी जन्माची शक्यता निर्माण होते असे त्यांनी सांगितले. यावेळी पंडित शिंदे, सुधाकर ताजणे, संतोष वाळके, कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, सुभाष सांगळे, भारत मुंगसे, रामहरी कातोरे, अॅड. सुहास आहे, विष्णूपंत रहाटळ, राजेंद्र गुंजाळ, राजेंद्र कडलग, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, फायनान्स मॅनेजर जी.एस.शिंदे, रोहिदास पवार आदी उपस्थित होते. नोटीस वाचन कार्यकारी संचालक डॉ. प्रताप उबाळे यांनी केले सूत्रसंचालन अॅड. सुरेश जोंधळे व नामदेव कहांडळ यांनी केले तर दूध संघाचे उपाध्यक्ष साहेबराव गडाख यांनी आभार मानले.