भाषा समृद्धी म्हणजेच यशाची गुरुकिल्ली : डॉ.संजय मालपाणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
आजच्या स्पर्धेच्या आणि जागतिकीकरणाच्या युगात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर भाषेवर प्रभुत्व, संवादकौशल्य, शब्दसंपत्ती आणि वैचारिक स्पष्टता या बाबी विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने यशाकडे घेऊन जातात, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले.
संगमनेर महाविद्यालयात युजीसी अंतर्गत प्रथम वर्ष पदवी विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘मी माझ्या महाविद्यालयाचा’ या उपक्रमांतर्गत विशेष मार्गदर्शन सत्रात डॉ. मालपाणी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ. रवींद्र ताशीलदार, उपप्राचार्य डॉ. प्रविण त्र्यंबके, उपक्रमप्रमुख डॉ. दिगंबर घोडके उपस्थित होते.
डॉ.मालपाणी  पुढे म्हणाले की, सध्याच्या काळात शुद्ध मराठीसोबत संवादक्षम इंग्रजी अवगत असणे ही काळाची गरज बनली आहे. सोशल मीडियाच्या आहारी जाऊन मौल्यवान वेळ वाया घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वाचन करून शब्दसंपत्ती वाढवावी. इन्स्टाग्रामच्या रील्समधून मिळणारा क्षणिक आनंद शिक्षणाची गती कमी करत असतो. त्यामुळेच मोबाईलचा वापर आवश्यक मर्यादेत ठेवून डिजिटल तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविक प्रा. सुजाता शिरोडे यांनी, सूत्रसंचालन डॉ.रोशन भगत यांनी तर आभार डॉ. दिगंबर घोडके यांनी मानले.   यावेळी डॉ.रुपेंद्र भागडे, प्रा.सुजाता शिरोडे, डॉ.संदीप वडघुले, प्रा.चिन्मय तिवारी, प्रा.सीताराम कवडे सह सर्व समिती सदस्यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमासाठी प्रथम वर्षातील प्रवेशित विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘मी माझ्या महाविद्यालयाचा’ या उपक्रमामागील उद्दिष्ट सांगतांना, विद्यार्थ्यांनी इथे केवळ शिक्षण घेण्यासाठीच नाही, तर स्वतःला शोधण्यासाठीही यावे. महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या उपक्रमांचा लाभ घेऊन स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा असे प्राचार्य अरुण गायकवाड यावेळी  म्हणाले.
Visits: 195 Today: 1 Total: 1961870

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *