गोवंशाचे मांस वाहण्यासाठी आता ‘लक्झरी’ वाहने! लपूनछपून पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न; सतर्क पोलिसांनी मात्र डाव उधळला..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातल्या सगळ्यात मोठ्या कारवाईनंतर पोलिसांनी समूळ बंद केलेले संगमनेरातील गोवंश कत्तलखाने पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न अधुनमधून समोर येवू लागले आहेत. मात्र आता शहर हद्दित एकही कत्तलखाना सुरु होवू न देण्याचा चंग बांधलेल्या पोलिसांनी प्रत्येकवेळी शहरातील ‘त्या’ काही कसायांचे मनसुबे प्रत्येकवेळी उधळून लावले आहेत. त्यामुळे कसायांनाही आपल्या पारंपरिक पद्धतीत सुधारणा करुन वेगवेगळ्या शक्कल लढवाव्या लागत आहेत. त्याचाच भाग म्हणजे पूर्वी मालवाहतूक टेम्पोतून केली जाणारी हजारों किलो गोवंश मांसाची तस्करी आता शे-दोनशे किलोसह ‘लक्झरी’ वाहनातून करावी लागत आहे. असाच प्रकार बुधवारी रात्री शहर पोलिसांनी समनापूर चौफुलीवर केलेल्या कारवाईतून समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल एकाला अटक केली आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची प्रकार बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास समनापूर-वाघापूर बायपास रस्त्यावरील समनापूर चौफुलीवर घडला. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना याबाबत माहिती मिळाली होती. त्याची खातरजमा केल्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे, पो.ना.धनंजय महाले व सचिन उगले यांना कारवाईच्या सूचना देवून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पाठवले.
उपनिरीक्षक शिंदे यांनी समनापूर चौफुलीवर वाघापूर रस्त्यावर पुढे काही अंतरावर अंधारात आपले सरकारी वाहन उभे करुन सापळा लावला. रात्री सव्वादहाच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसारच्या वर्णनाची पांढर्या रंगाची स्वीफ्ट डिझायर ही लक्झरी कार भरधाव वेगाने येत असल्याचे पोलीस पथकाला दिसले. सदर वाहनाला थांबण्याचा इशारा करीत त्याची झाडाझडती घेतली असता ‘त्या’ कारच्या डिकीत सुमारे दोनशे किलो वजनाचे गोवंश मांस भरलेले आढळले. त्यानंतर पोलिसांनी सदरचे वाहन ताब्यात घेत चालकाला ओळख विचारली असता त्याने आपले नाव आमीन कादीर अन्सारी (वय 23, रा.मिल्लतनगर, श्रीरामपूर) असल्याचे सांगितले व सदरचे वाहन संगमनेरातील आजमत कुरेशी याने आपल्याकडे आणून सोपविल्याची माहिती पथकाला दिली.
घटनास्थळावरील कायदेशीर सोपस्कार उरकून पोलिसांनी बेकायदा गोवंश मांस तस्करीसाठी वापरलेली लक्झरी श्रेणीतील स्वीफ्ट डिझायर (क्र.एम.एच.19/ए.पी.4722) ही कार ताब्यात घेत त्यात ठेवलेले सुमारे दोनशे किलो गोवंशाचे मांस हस्तगत करुन त्याची विल्हेवाट लावली आहे. या प्रकरणी पो.ना.महाले यांच्या फिर्यादीवरुन वरील दोघांवर भा.द.वी.269, 429 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याचे कलम 5 (अ), 5 (क) व 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करुन आमीन अन्सारी याला अटक केली आहे. या प्रकरणातील मूळ सूत्रधार आजमत कुरेशी मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वीच पसार झाला आहे.
2 ऑक्टोबर, 2021 रोजी जमजम कॉलनी व भारतनगर परिसरातील साखळी कत्तलखान्यांवर राज्यातील सर्वात मोठी कारवाई झाली होती. त्यानंतर संगमनेर पोलिसांनी आपल्या हद्दित गोवंशाचा एकही बेकायदा कत्तलखाना सुरु होणार नाही असा चंगच बांधला होता. त्यासाठी सुरुवातीचे काही दिवस या भागात 24 तास पोलिसांचा पहारा आणि गस्ती वाहनाच्या फेर्याही वाढवण्यात आल्या होत्या. त्यातच त्या कारवाईत पकडण्यात आलेल्या एकूण 11 आरोपींमधील चार जणांना उच्च न्यायालयातून जासमीन मिळाला, मात्र उर्वरीत सातही आरोपी आजही गेल्या पाच महिन्यांपासून तुरुंगातच आहेत.
असे असतानाही संगमनेरात पुन्हा लपूनछपून का असेना काही कसाई डोके वर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत पोलिसांनी सुमारे डझनभर कारवाया केल्या आहेत, यावरुन ही गोष्ट अधोरेखीत होत असली तरीही पोलिसांच्या कारवायांची संख्या पाहता प्रत्येकवेळी कसायांचे मनसुबे उधळले गेले आहेत. त्यामुळे कसायांना आता आपल्या पारंपरिक प्रणालीत पुन्हा एकदा बदल करुन आपला धंदा सुरु ठेवण्याची वेळ आली आहे. बुधवारी रात्रीच्या कारवाईत ही गोष्ट स्पष्ट झाली असून पोलिसांच्या धाकामुळे हजारो किलोने होणारी वाहतूक शे-दोनशे किलोवर आल्याचेही दिसून आले आहे.
संगमनेर शहरातील साखळी कत्तलखाने राज्यात कुप्रसिद्ध आहेत. राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यानंतर राज्यातील सर्वाधीक कारवायाही संगमनेरातच झालेल्या आहेत. या कायद्याच्या गेल्या आठ वर्षांत सन 2014-15 या कालावधीत पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण आणि त्यानंतर सन 2017-18 या कालावधीत पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे या दोन्ही अधिकार्यांनी कसायांच्या मनात पोलिसांचा मोठा धाक निर्माण केला होता. त्यांच्या कार्यकाळात संगमनेरातील कसायांनी आपली कार्यक्षेत्र बदलली होती, यावरुन त्यांनी निर्माण केलेल्या धाकाचा अंदाज येतो.