मुख्याधिकारी साहेब अतिक्रमणधारकांची मुजोरी वाढली बरं का! भोंगा लावून फळविक्री; विरोध करणार्‍या व्यापार्‍याच्या दुकानात घुसून चारजणांची दमबाजी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
वैभवशाली शहराची टिमकी वाजवणार्‍या संगमनेर शहरात बोकाळलेल्या बेसुमार अतिक्रमणांनी संगमनेरची अक्षरशः वाट लावली आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाला ‘नारळ’ फोडून प्रत्येक रस्त्यावर पथार्‍या आणि हातगाड्या मांडून सर्वसामान्यांना वेठीस धरणार्‍या या अतिक्रमण धारकांनी आता आसपासच्या दुकानदारांनाच त्रास देण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या गैरकृत्याला विरोध केल्यास गुंडांच्या टोळक्यासह थेट दुकानात घुसून कार्यक्रम करण्याच्या धमक्या दिल्या जावू लागल्या आहेत. संगमनेरात यापूर्वी कधीही न घडलेल्या अशा प्रकारातून आता शहराचे सामाजिक स्वास्थच बिघडू लागले असून आतातरी त्यांचा बंदोबस्त करा अशी विनवणी करण्याची वेळ हजारो रुपयांचा कर भरणार्‍या व्यापार्‍यांवर आली आहे. भ्रष्टाचारात बरबटलेला पालिकेचा अतिक्रमण विभाग आतातरी जागा होवून कारवाई करणार की शहराची शांतता भंग झाल्यानंतरच भ्रष्टाचाराच्या चादरीतून बाहेर येणार अशा संतप्त प्रतिक्रिया गुरुवारी सायंकाळी नवीन नगर रस्त्यावरील घटनेनंतर व्यक्त होवू लागल्या आहेत.

खुद्द पालिकेनेच दुतर्फा अतिक्रमण करुन नवअतिक्रमणधारकांसमोर आदर्श निर्माण केलेल्या नवीन नगर रस्त्यावर गुरुवारी (ता.24) सदरचा प्रकार घडला. या रस्त्याच्या बाजूने असलेल्या वीज वितरण कंपनीच्या अगदी प्रवेशद्वारासमोरच एका फळविक्रेत्याने आपल्याच पूर्वजांची मालमत्ता समजून अगदी बिनधास्तपणे फळाची गाडी उभी केली. अतिशय अरुंद मात्र प्रचंड रहदारी असलेल्या या रस्त्यावर आधीपासूनच मोठ्या प्रमाणात फळविक्रेते, टपर्‍या, पथार्‍या आणि हातगाड्यांवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची गर्दी असतांना या फळविक्रेत्याची त्यात नव्याने भर पडली ती काहीतरी हेतू मनात बाळगूनच.

आधीपासूनच या रस्त्यावर असंख्य फळविक्रेते असताना या महाशयांनी आपला गाडाही त्या गर्दीत घुसवून मोठमोठ्याने हाळ्या देत ‘शंभरला किलोऽ..’ असे ओरडण्यास सुरुवात केली. बराचवेळ ही आरडाओरड सुरुच राहिल्याने आसपासच्या ‘अधिकृत’ दुकानदारांना त्याचा त्रास होवू लागला. मात्र या फळविक्रेत्यांना विरोध केल्यास ते लागलीच संघटित होवून मारहाण करतात असा यापूर्वीचा अनुभव असल्याने त्रास होत असूनही त्याला विरोध करण्यास कोणी पुढे धजावले नाही. परंतु हा प्रकार वाढतच गेल्याने अखेर नाईलाज होवून या फळविक्रेत्याच्या अगदी समोरच असलेल्या पालिकेच्या व्यापारी संकुलातील राजेंद्र कळसकर या स्टीलभांड्यांच्या व्यापार्‍याने हिंमत करुन त्या अतिक्रमणधारकाला आरडाओरड न करण्याची सूचना केली.

त्यावर आपण अतिक्रमणधारक आहोत, आपल्यामुळे इतरांना त्रास होता कामा नये, पालिकेच्या ठेकेदाराकडून 20 रुपयांची पावती फाडून तात्पुरत्या स्वरुपात आपण येथे धंदा थाटल्याचा विसर पडलेल्या त्या फळविक्रेत्याने नवीन नगर रस्ता म्हणजे आपल्या पूर्वजांचीच मिळकत असल्याच्या अर्विभावात त्याने बॅटरीवर चालणारा छोटा लाऊडस्पीकर आणला आणि त्यावरुन मोठ्याने ‘शंभरला दोन किलोऽ..’ अशा मोठ्याने बोंबा मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याच्या या गैरकृतीचा आसपासच्या सगळ्याच व्यापार्‍यांसह अतिक्रमणधारकांनाही त्रास होवू लागला. मात्र त्याचा कोणताही परिणाम त्या अतिक्रमणधारकावर झाला नाही.

त्यातून व्यापारी राजेंद्र कळसकर व त्या अतिक्रमणधारकामध्ये पुन्हा शाब्दिक वादाची ठिणगी पेटली, परंतु अशा प्रकारच्या वादात सरशी मिळवण्याचे बाळकडू घेवून आलेल्या त्या फळविक्रेत्याने त्याला कोणतीही दाद दिली नाही. मात्र त्याच्या मनात काहीतरी शिजत होते, जे कळसकर यांच्या लक्षात आले नाही. सायंकाळी थंडीमुळे रस्त्यावरील गर्दी आटू लागली, या भागात असलेल्या अन्य अतिक्रमितांनीही आपापले व्यवसाय आवरुन घराकडे प्रस्थान करण्यास सुरुवात केली आणि नेमक्या त्याचवेळी ‘तो’ फळविक्रेता आपल्या सोबत अन्य तीन जणांना घेवून अनाधिकाराने त्या स्टीलभांडी व्यापार्‍याच्या दुकानात शिरला. जवळपास पाच मिनिटे त्यांच्यात शाब्दिकक हमरीतुमरीही झाली.

त्या दरम्यानच काळा शर्ट घातलेला एकजण बाहेरुन तेथे अवतरला आणि त्याने बेभान होवून जणू या शहरावर आपलेच राज्य असल्याचा अर्विभाव निर्माण करुन राजेंद्र कळसकर यांच्यावर दोन ते तीनवेळा धावून जाण्याचा प्रयत्न केला. अर्थात यावेळी आधीपासूनच दुकानात शिरलेल्या ‘त्या’ अन्य तिघांनी त्याला आवरल्याने शहराची शांतता धोक्यात येण्याचा प्रसंग टळला. या घटनेनंतर संबंधित व्यापारी पोलीस ठाण्यातही गेला. यावेळी त्याची तक्रार दाखल करुन घेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याची गरज असताना प्रत्यक्षात मात्र केवळ त्याचा अर्ज घेवून त्याची बोळवण करण्यात आली. आज सकाळी तो व्यापारी पुन्हा पोलीस ठाण्यात गेला असून संबंधितांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र वृत्तलिहेपर्यंत तसे काहीही घडलेले नव्हते.

अशा एखाद्या प्रसंगातूनही संगमनेरचे सामाजिक स्वास्थ बिघडू शकते असा संगमनेरचा पूर्वइतिहास आहे. मात्र पोलीस आणि पालिका प्रशासनाला अद्यापपर्यंत या गोष्टीचे गांभीर्यच समजलेले नसल्याने त्यांच्याकडून एखाद्या गंभीर घटनेची तर प्रतीक्षा केली जात नाही ना? अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण होवू लागली आहे. शहराचे सामाजिक स्वास्थ खराब करु पाहणार्‍या अशा प्रवृत्तींवर कोणाचाही मुलाहिजा न बाळगता यंत्रणांनी कारवाई करणे अभिप्रेत असताना त्यांना मात्र नेमका त्याचाच विसर पडल्याचे दुर्दैवी चित्र सध्या संगमनेरात दिसत आहे.

शहरातील विविध भागात पथार्‍या, हातगाड्या व अन्य साधनांद्वारे किरकोळ व्यापार करणार्‍यांची मोठी संख्या आहे. त्यांच्याकडून पालिकेने नियुक्त केलेला ठेकेदार नियमितपणे जागेच्या आकारानुसार भाडे आकारतो व तोच परस्पर अतिक्रमणांना प्रोत्साहन देवून आपला धंदाही वाढवतो. त्यातूनच शहराच्या अगदी गल्ली-बोळातील जागाही अशा अतिक्रमणधारकांनी व्यापल्या असून आता त्यांचा भस्मासूर झाल्याप्रमाणे ते पालिकेला दरवर्षी हजारो रुपयांचा कर भरणार्‍या व्यापार्‍यांच्याच डोक्यावर हात ठेवण्यासाठी पुढे सरसावू लागले आहेत. अशा प्रवृत्तींचा वेळीच बिमोड न झाल्यास त्यांच्या कृत्यातून शहराची सामाजिक शांतता धोक्यात येण्याचीही दाट शक्यता यातून निर्माण झाली आहे, याची पोलीस आणि पालिकेने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.

Visits: 66 Today: 1 Total: 420532

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *