पन्हाळगड-पावनखिंड मोहिमेस शिवभक्तांच्या प्रतिसाद इल्हे, शेळके यांचा राज्यस्तरीय शिवराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्र आयोजित पन्हाळगड ते पावनखिंड ही ३३ वी साहसी मोहीम नुकतीच पार पडली. याच काळात नरवीर शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे यांचा स्मृतिदिन असल्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने तरुण शिवभक्त सहभागी झाले होते. यावेळी सुखदेव इल्हे आणि संतोष शेळके यांचा राज्यस्तरीय शिवराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला.

या मोहिमेत संगमनेर परिसरातून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ७० शिवभक्त तर राज्यभरातून साडेपाचशे शिवप्रेमी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. पन्हाळ्यावरील नरवीर शिवा काशीद आणि बाजीप्रभूंच्या पुतळ्यांचे पूजन करून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर, खासदार धर्यशील माने, उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, शिवराष्ट्र संस्थापक प्रशांत साळुंके, शिव व्याख्याते प्रा.दिपक कर्पे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पाहुण्यांनी मसाईच्या पठारावर येऊन मोहिमेतील शिवभक्तांच्या अनेक समस्या जाणून घेतल्या.

खोतवाडीतील पहिल्या मुक्कामी शिवराष्ट्र निर्मित पावनखिंड हा लघुपट दाखविण्यात आला. या ठिकाणी शिवव्याख्याते प्रा.दिपक कर्पे यांचे पावनखिंडीचा इतिहास उलगडणारे प्रेरणादायी व्याख्यान झाले. महाराष्ट्रातील शिवप्रेमी यांनी मोहिमेत सहभाग नोंदवत डोंगरद-या, जंगल, ओढे नाल्यातील अत्यंत खडतर प्रवास अनुभवला.
पांढरपाणी येथुन शिवरायांच्या पालखीची मिरवणूक मोठ्या उत्साहाने पावनखिंड येथे आणण्यात आली. यावेळी नरवीर रायाजी बदलांचे वंशज अनिकेत बांदल सपत्नीक उपस्थित होते. त्यांनी अनवाणी पावलांनी शिवपालखीला खांदा दिला.

पावनखिंडीतील धारातीर्थावर पूजन करण्यात आले. या प्रसंगी पावनखिंड मोहिमेतील सातत्यपूर्ण सहभागाबद्दल शिवकार्यातून सामाजिक योगदानाबद्दल संगमनेरच्या संतोष शेळके आणि सुखदेव इल्हे यांना राज्यस्तरीय शिवराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.तसेच युवाव्याख्याते भूपाल शेळके यांचे पावनखिंड परिसराचा इतिहास आणि भूगोल यांची योग्य सांगड घालणारे प्रेरणादायी व्याख्यान झाले. याप्रसंगी आधारचे समन्वयक डॉ. महादेव अरगडे, प्राचार्य बाळासाहेब आहेर, ॲड. महेश थोरात,प्रा. सोमनाथ गडाख, सागर कोळगे, पंढरीनाथ घुले, भाऊसाहेब नागरे, गोरक्ष हासे, पोलीस पाटील दत्तू इल्हे, आबा फटांगरे, डॉ. रवी साबळे, सुभाष घनदाट यांचेसह शेकडो शिवभक्त उपस्थित होते. सूत्रसंचालन नंदकिशोर राहणे यांनी केले.

Visits: 162 Today: 2 Total: 1413082
