अखेर सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेतून जागला! उपअभियंत्याची मनमानी मात्र कायम; रस्त्याची डागडूजी आणि थांबारेषा आखली..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरचा सार्वजनिक बांधकाम विभाग शहराच्या विकास कामांमध्ये खोडा घालीत असल्याबाबत दैनिक नायकने कानउपटणी केल्यानंतर जागलेल्या विभागाने अकोले रस्त्यावरील खड्ड्यांची श्रृंखला भरुन काढली असून कार्यान्वीत झालेल्या सिग्नलजवळ थांबारेषाही आखल्या आहेत. मात्र त्याचवेळी ‘त्या’ उपअभियंत्याचा नाकर्तेपणाही ठळकपणे समोर आला असून अकोले रस्त्याची डागडूजी करताना पाट्या टाकण्यात आल्या आहेत. तर, थांबारेषा आखताना माणसांना रस्ता ओलांडण्यासाठी आवश्यक असलेल्या झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मात्र तसेच ठेवले आहेत. सूर्यप्रकाशाचे कारण सांगून गेल्या पंधरा दिवसांपासून पालिका आणि पोलीस अशा दोहींनाही खेळवणार्‍या या महाशयांनी गेल्या चार दिवसांपासून लख्ख प्रकाश पडलेला असतानाही जाणीवपूर्वक अर्धवट काम केल्याने शहरातून संताप निर्माण होत असून या निष्क्रिय अधिकार्‍यावर कारवाई करण्यासह त्याची तत्काळ बदली करण्याचीही मागणी करण्यात येत आहे.


संगमनेरच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेले उपअभियंता श्याम मिसाळ यांनी गेल्याकाही दिवसांपासून जाणीवपूर्वक शहरातील विकासकामांना खो घातला आहे. त्यांच्या या नाकर्तेपणाचा फटका खूद्द संगमनेरचे लोकप्रतिनिधी आमदार अमोल खताळ यांनाही बसल्याने त्यांनी याबाबत थेट सभागृहात प्रश्‍न उपस्थित केले होते. त्यानंतर तरी या अधिकार्‍याच्या वागणुकीत सुधारणा अपेक्षित असताना प्रत्यक्षात तसे काहीही घडले नाही. उलटपक्षी माळीवाडा ते जाजू पंपापर्यंतचा अकोले रस्ताही तसाच राहीला आणि पोलीस अधिक्षकांच्या आदेशाने पालिकेने तत्काळ दुरुस्त केलेली सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत होवून पंधरवडा उलटूनही बेशीस्तच राहीली, मात्र तरीही हे महाशय ढिम्मच.


अखेर जनहिताची बांधिलकी जोपासताना दैनिक नायकने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या नाकर्त्या उपअभियंत्याच्या कारभारावर आसूड ओढताना ‘संगमनेरच्या विकासात सार्वजनिक बांधकामचा खोडा’ अशा ठळक मथळ्याखाली या उपअभियंत्याच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकताना प्रत्येक संगमनेरकरासाठी डोकेदुखी ठरत असलेल्या गचाळ वाहतूक व्यवस्थेतून दिलासा देण्यासाठी खूद्द पोलीस अधिक्षकांसह मुख्याधिकारी आणि स्थानिक पोलीस पुढे सरसावले असताना हा मुजोर अधिकारी कशा पद्धतीने त्यात अडथळे आणतोय याचे प्रतिबिंब दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर जागलेल्या या महाशयांनी घाईगडबडीत शहरातील तिनही सिग्नलच्या रस्त्यावर वाहनांसाठी आवश्यक असलेल्या थांबारेषा आखल्या आहेत.


मात्र त्याचवेळी त्याने आपली खोडही कायम ठेवली असून लख्ख सूर्यप्रकाश पडूनही जाणीवपूर्वक ‘झेब्रा क्रॉसिंग‘चे काम तसेच मागे ठेवले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पोलिसांकडून अर्धवट स्थितीतच वाहतूकीचे संचालन सुरु करण्यात आले आहे. या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्याविरोधात जनमानसात रोष निर्माण होत असतानाच दैनिक नायकने त्यांच्या निष्क्रियतेवर घणाघात करताना सलग दुसर्‍या दिवशी ‘संगमनेरच्या सार्वजनिक बांधकामकडून असंवेदनशीलतेचा कळस!’ या मथळ्याखाली मालपाणी विद्यालयासारखे शहरातील सर्वात प्रतिष्ठीत आणि मोठे विद्यालय, केंद्रीय विमा कार्यालयाचे मुख्यालय, पेट्रोल पंप, कासट संकूल आणि मुख्य म्हणजे शहराच्या बाजारपेठेचे पश्‍चिमेकडील प्रवेशद्वार असतानाही या निष्क्रिीय अधिकार्‍याने व्यक्तिगत द्वेषातून या रस्त्याचे काम खोळंबवले व हजारो पालकांच्या जीवाला घोर लावला.


दैनिक नायकच्या या वृत्ताने आपल्या निष्क्रियतेचे बिंग फूटल्याचे पाहून या महाशयांनी तातडीने माळीवाडा मारुती मंदिर ते जाजू पेट्रोल पंपापर्यंतच्या रस्त्याची मलमपट्टी करताना केवळ रस्त्यावरील मोठे खड्डे बुजवले. येथेही त्याच्या नाकर्तेपणाचे उदाहरण उभे राहीले असून या रस्त्यावरील खड्डेही घाईघाईत आणि अर्धवट पद्धतीने बुजवण्यात आले आहेत. त्यामुळे या रस्त्याचा वापर करणारेही अद्याप या निष्क्रिय अधिकार्‍याच्या नावाने बोटं मोडीत आहेत.


थेट राज्य सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राप्त होणार्‍या निधीतून इमारती, दळणवळणाची साधनं अथवा स्मारके उभारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभिप्राय आवश्यकच असतो. अनेक प्रसंगात सदरचे काम या विभागालाच करुन द्यावे लागते. संगमनेर तालुक्याला सध्या चार आमदार लाभले आहेत. त्यातील तिघे सत्ताधारी गटातील आहेत. अशा स्थितीत अधिकाधिक प्रलंबित योजनांचे प्रस्ताव सादर करुन या ऐतिहासिक शहराच्या सौंदर्यात भर घालणारी कृती घडणं अपेक्षित असताना या विभागाचा उपअभियंता स्वतः निष्क्रिय राहून त्याने विकासकामांनाच खोडा घातल्याने शहरातून संताप व्यक्त होत असून त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन त्याच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Visits: 330 Today: 5 Total: 1110465

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *