औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्राचे कुलगुरुंच्या हस्ते उद्घाटन एक दिवसीय कार्यशाळेतून तज्ज्ञांनी शेतकर्‍यांना केले अनमोल मार्गदर्शन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
क्षेत्रीय सह सुविधा केंद्र पश्चिम विभाग (राष्ट्रीय औषध बोर्ड आयुष्य मंत्रालय भारत सरकार) वनस्पती विज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व स्वयंसिद्ध अ‍ॅग्रो प्रॉडक्ट प्रा. लि. संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राज्यस्तरीय एक दिवसीय औषधी वनस्पती शेती, प्रक्रिया, मार्केट या विषयावर कार्यशाळेचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यशाळेत नामवंत तज्ज्ञांनी शेतकर्‍यांना औषधी वनस्पतींबद्दल अनमोल मार्गदर्शन केले.

यावेळी माजी आमदार वैभव पिचड, बाळासाहेब मुरकुटे, प्रा. अविनाश आडे, प्रमुख संशोधक व प्रादेशिक संचालक डॉ. दिगंबर मोकाट, अमित नवले, डॉ. स्वप्नील शिंदे, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे उपस्थित होते. सकाळच्या सत्रात डॉ. दिगंबर मोकाट यांनी मोठी मागणी असणार्‍या औषधी वनस्पतींची शेतीवर सविस्तर मार्गदर्शन करताना पारंपारिक पिकांऐवजी चांगले नियोजन करून जर औषधी वनस्पतींची लागवड केली तर हमखास उत्पन्न मिळू शकते असे सांगितले. डॉ. स्वप्नील शिंदे यांनी औषधी वनस्पती व प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली. काही औषधी खरेदीदार, व्यापारी यांनी सुद्धा आपली मनोगते व्यक्त केली. या सत्रास बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. माधव कानवडे, जिल्हा विभागीय कृषी अधिकारी गवांडे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, सचिन काळभोर, सेंद्रीय शेती अभ्यासक डॉ. प्रशांत नाईकवाडी यांनी भेटी दिल्या.

दुपारच्या सत्रात औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्राचे उद्घाटन झाले. सतीश कानवडे यांनी तयार केलेल्या देशी बी पॅकेट, आयुर्वेदिक प्रॉडक्टचे पॅकिंग, शेतीचा कार्बन वाढविण्यासाठी तयार केलेल्या कृषीक्रांती कार्बन व चरकामृत सिरपचा शुभारंभ झाला. त्यानंतर शेतकरी व व्यापारी यांच्यात बाय पॅक खरेदी करार झाला. या सत्रास सीताराम भांगरे, डॉ. अशोक इथापे, राम जाजू, सुधाकर गुंजाळ, दीपक भगत, शैलेश फटांगरे, शिरीष मुळे, राहूल भोईर, भाऊसाहेब वाकचौरे, वैभव लांडगे, किरण गुंजाळ, नेताजी घुले, दीपक थोरात, श्रीराज डेरे आदिंनी भेटी दिल्या. तर कुलगुरूंनी शेतकर्‍यांसमवेत शिवार फेरीत सुद्धा सहभाग घेतल्याने शेतकरी सुखावले. शेवटी सहभागी शेतकर्‍यांना कुलगुरूंच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप केले आणि सतीश कानवडे यांनी आभार प्रदर्शन केले.

Visits: 15 Today: 1 Total: 118900

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *