साकूरच्या ‘रुबाब’ अत्याचार प्रकरणात चौथा आरोपी अटक! घरी येताच आवळल्या मुसक्या; द्रुतगती न्यायालयात चालणार खटला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
साडेपाच महिन्यांपूर्वी पठारभागातील साकूरमध्ये असलेल्या ‘रुबाब’ पानशॉपमध्ये साडेपंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेनंतर पीडित मुलीने विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याने त्यावेळी या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. त्यामुळे दबाव वाढल्याने घारगाव पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह त्याला मदत करणार्‍या दोघांना त्याचवेळी अटक केली होती तर, विजय शिवाजी खेमनर हा मात्र तेव्हापासून पसार होता. गेल्या रविवारी (ता.11) पसार असलेला हा आरोपी घरी आल्याची कुणकुण लागताच घारगाव पोलिसांनी मध्यरात्री छापा घालीत त्याच्या मुसक्या आवळल्या, न्यायालयाने त्याला बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणातील सूत्रधार अद्यापही कारागृहातच असून त्याच्या अन्य दोघा साथीदारांना मात्र गेल्या आठवड्यात जामीन मंजूर झाला आहे.


गेल्या 29 फेबु्रवारी रोजी सदरचा धक्कादायक प्रकार पठारावरील साकूरमध्ये असलेल्या रुबाब पानशॉप या दुकानात घडला होता. यातील इयत्ता दहावीत शिकणारी पीडित मुलगी परीक्षेची पावती घेण्यासाठी साकूरमध्ये आली होती. त्यावेळी सकाळी आठच्या सुमारास ती साकूरमधील रुबाब पानशॉप समोरुन जात असताना आरोपी सौरभ रावसाहेब खेमनर (वय 21, रा.हिरेवाडी) याने तिला रस्त्यात थांबवून बळजबरीने ‘त्या‘ पानशॉपमध्ये फरफटत नेले. यावेळी त्याचा साथीदार योगेश रामा खेमनर (वय 25, रा.हिरेवाडी) याने दुकानाचे शटर बाहेरुन बंद करुन घेतले तर प्रशांत भास्कर भडांगे (वय 24, रा.भडांगे वस्ती, साकूर) व विकास रामदास गुंड (वय 26, रा.गुंड वस्ती, मांडवे बु.) या दोघांनी दुकानाबाहेर राखन करीत तेथे आलेल्या बाजीनाथ दातीर यास दमबाजी केली व आरोपीच्या कृत्यात त्याला हातभार लावला.


दुकानात कोंडून घेतल्यानंतर आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीच्या तोंडाला रुमाल बांधून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने आपल्या साथीदाराला हाक मारुन समोरच्या दुकानावरुन थंडपेय मागवले व ते घेतल्यानंतर त्याने पुन्हा तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. या घटनेने भेदरलेल्या पीडितेने घटनास्थळावरुन घरी जात घडला प्रकार आपल्या आईला सांगितला आणि कोणाला काही समजण्याच्या आंतच विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. या प्रकरणी घटनेनंतर तब्बल 17 दिवसांनी पीडितेच्या आईने घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.


त्यावरुन पोलिसांनी मुख्य आरोपी सौरभ रावसाहेब खेमनर (वय 21, रा.हिरेवाडी) याच्यासह त्याला हा प्रकार करण्यास प्रोत्साहन देणार्‍या आणि मदत करणार्‍या योगेश रामा खेमनर (वय 25, रा.हिरेवाडी), प्रशांत भास्कर भडांगे (वय 24, रा.भडांगे वस्ती, साकूर), विकास रामदास गुंड (वय 26, रा.गुंड वस्ती, मांडवे बु.) व विजय शिवाजी खेमनर (वय 29, रा.हिरेवाडी) या पाच जणांविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 376 (3), 109, 305, 506, 34 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्‍या कायद्याचे (पोक्सो) कलम 4, 8, 12, 17, 21 प्रमाणे गुन्हा दाखल करीत मुख्य आरोपी सौरभ खेमनरसह योगेश खेमनर व प्रशांत भडांगे यांना गजाआड केले. या घटनेपासूनच आरोपी विजय खेमनर पसार झाला होता. तर, विकास गुंड याचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचेही समोर आले होते.

या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यास झालेला विलंब पीडितेच्या कुटुंबावरील दबाव दर्शवणारा ठरल्याने या प्रकरणाचे प्रतिध्वनी राज्यात उमटले. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठनेते, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महिला नेत्या व भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी साकूरमध्ये येवून पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली व पोलिसांना सखोल चौकशी करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. हा विषय राज्यपातळीवर पोहोचल्याने शासनाने सदरचा खटला द्रुतगती न्यायालयात चालवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे घारगाव पोलिसांनीही प्रकरणातील बारकावे शोधून काढीत 16 मे 2024 रोजीच या प्रकरणाचे दोषारोपपत्र दाखल केले. मात्र पसार असलेला पाचवा आरोपी विजय खेमनर मात्र पोलिसांच्या हाती लागला नव्हता.


गेल्या रविवारी (ता.11) रात्री आठच्या सुमारास साकूरमधील वैभव दत्तात्रय आमले (वय 24) व स्नेहा वैभव आमले (वय 22) या नवदाम्पत्याने गळफास घेवून आत्महत्या केली होती. याबाबतची माहिती मिळताच घारगावचे पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, कर्मचारी सुभाष बोडखे व प्रमोद गाडेकर यांच्यासह घटनास्थळी पोहोचले. तेथील कायदेशीर सोपस्कार पूर्ण करीत असतानाच त्यांना ‘रुबाब’ अत्याचार प्रकरणातील पसार असलेला विजय शिवाजी खेमनर हा घरात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी कोणालाही सुगावा लागू न देता मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्या घरावर छापा घालीत झोपेतच त्याच्या मुसक्या आवळल्या.


सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला बुधवारपर्यंत (ता.14) पोलीस कोठडीत पाठवले. तर, यापूर्वीच अटक झालेल्या प्रशांत भास्कर खेमनर व योगेश रामा खेमनर या दोघा आरोपींना गेल्या आठवड्यात औरंगाबाद खंडपीठाने जामीन मंजूर केल्याने त्या दोघांची सुटका झाली आहे. सध्या या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सौरभ रावसाहेब खेमनर हा तुरुंगातच असून त्याला आता विजय खेमनर याची साथ मिळाली आहे. या प्रकरणी रविवारी अटक झालेल्या विजय खेमनरचे पुरवणी दोषारोप दाखल केले जाणार असून हा खटला संगमनेरचे अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश दिलीप घुमरे यांच्यासमोर चालणार आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी अटक झाल्याने पठारभागातून समाधान व्यक्त होत आहे.

गेल्या साडेपाच महिन्यांपासून घारगाव पोलिसांना गुंगारा देणारा विजय शिवाजी खेमनर हा आरोपी ज्यावेळी घरी परतला त्याचवेळी साकूरमध्ये नवविवाहित दाम्पत्याने गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या तपासासाठी साकूरमध्ये गेलेल्या पोलिसांना पसार असलेल्या आरोपीचा सुगावा लागला आणि तो थेट गजाआड पोहोचला. या प्रकरणाचा खटला द्रुतगती न्यायालयात चालणार असून आता येत्या सहा महिन्यांतच त्याचा निवाडा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Visits: 58 Today: 2 Total: 116035

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *