निंब्रळमध्ये घरात घुसून बिबट्याचा ऐंशीवर्षीय वृद्धावर हल्ला आरडाओरड झाल्याने बिबट्या सावज म्हणून चादर घेऊन पसार
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील निळवंडे परिसरात बिबट्याने हल्ला करुन एका आदिवासी महिलेचा बळी घेतल्यानंतरही बिबट्यांची दहशत कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर एक वाजेच्या सुमारास निंब्रळ येथील एका ऐंशीवर्षीय वृद्धावर थेट घरात घुसून हल्ला केला आहे. सुदैवाने बिबट्या सावज म्हणून केवळ चादर घेऊन पसार झाला.
याबाबत राजूर वन विभागाकडून समजलेली अधिक माहिती अशी की, निंब्रळ येथील निवृत्ती सयाजी उघडे हे घरात झोपलेले होते. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्रीनंतर एक वाजेच्या सुमारास बिबट्याने थेट घरात प्रवेश करुन वृद्ध निवृत्ती उघडे यांच्यावर हल्ला चढविला. मात्र, त्यांच्या अंगावर चादर असल्याने बिबट्यापासून काही प्रमाणात बचाव झाला. या हल्ल्यात वृद्धाच्या हाताला गंभीर दुखापत झाली. आरडाओरड झाल्याने बिबट्याने सावज म्हणून चादर घेऊन पसार झाला.
या घटनेची माहिती मिळताच राजूर वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री साळवे यांनी कर्मचार्यांसह घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. जखमी वृद्धाला वन विभागाने तत्काळ अकोले ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविले. सध्या वृद्धाची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या भागात बिबट्यांची संख्या अधिक असल्याने नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराचे दरवाजे बंद ठेवावेत. शक्यतो रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री साळवे यांनी केले आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा मानवी वस्त्यांकडे मोठ्या प्रमाणात संचार वाढल्याने वन विभागाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.