संगमनेर तालुक्यात आजी-माजी मंत्र्यांकडून एकमेकाला धक्के-प्रतिधक्के! विखे गटाची जोर्वे, तळेगावात मुसंडी; घुलेवाडीतील पराभवाने थोरातांना बसला मोठा धक्का

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जनसेवा मंडळ व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. यंदाच्या निवडणुकीत विखे यांच्या जनसेवा मंडळाने थोरात गटाला एकामागून एक धक्के दिले असून थोरातांचे मूळगाव जोर्वेसह निमोणची सत्ता खेचून घेतली आहे. त्याचा पलटवार करतांना थोरात गटानेही निमगाव जाळी व उंबरी बाळापूरसारख्या विखेंचे प्राबल्य असलेल्या ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. मात्र घुलेवाडीच्या ग्रामस्थांनी थोरात गटाला जोरदार धक्का देत माजी सरपंच सोपान राऊत यांच्या स्नुषा निर्मला राऊत यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

आज सकाळी पालिकेच्या क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमोल निकम यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत तालुक्यातील सर्वच्या सर्व 37 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले. निवडणूका झालेल्या सदतीस ग्रामपंचायतींमध्ये थोरातगटाने 27, विखेगटाने 9 तर सोपान राऊत यांच्या स्वतंत्र गटाने घुलेवाडीचे सरपंचपद मिळवले आहे. ज्या प्रमाणे निकाल जाहीर होत होते, त्याप्रमाणे क्रीडा संकुलाच्या परिसरात जमलेल्या दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये घोषणा, गुलालाची उधळण आणि बँडबाजाच्या तालावर नृत्यही रंगतांना दिसत होते. सकाळपासून समोर आलेल्या विविध निकालांत दोन्ही मोठ्या नेत्यांनी एकमेकाला धक्के-प्रतिधक्के दिल्याचेही दिसून आले.

सरपंचपदाचा शेवटचा निकाल हाती आला तेव्हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाच्या ज्योती पवार (खराडी), सुनीता शिंदे (वाघापूर), शांताबाई कुदनर (जांभुळवाडी), बाबाजी गुळवे (रणखांबवाडी), आनंदा दुगुर्डे (दरेवाडी), सोनाली शेटे (जांबुत), रोहिणी भागवत (कर्जुले पठार), नारायण मरगळ (पिंपरणे), सुरेखा खेमनर (अंभोरे), गिरीजा साबळे (ओझर खुर्द), लता खताळ (धांदरफळ खुर्द), उज्ज्वला देशमाने (धांदरफळ बु.), गायत्री माळी (चिकणी), पांडूरंग सुपेकर (वडझरी खुर्द), कमल कांगणे (हंगेवाडी), बाळासाहेब आहेर (करुले), शशीकला पवार (निळवंडे), अर्चना भुसाळ (उंबरी बाळापूर), विलास सोनवणे (चिंचोली गुरव), संध्या गोर्डे (वडझरी बु.), पुष्पा गुंजाळ (कोळवाडे), प्रतिभा जोंधळे (निमगाव जाळी), सचिन सोनवणे (साकूर), ज्योती कडलग (निमगाव भोजापूर), सुदाम खैरे (पोखरी हवेली) व बिनविरोध सरपंच निवड झालेल्या नीलम पारधी (सायखिंडी), मंगल काकड (डोळासणे) आदी सत्तावीस विजयी उमेदवारांनी थोरात गटाला त्या-त्या गावच्या ग्रामपंचायती मिळवून दिल्या आहेत.

तर विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाने यंदा संगमनेर तालुक्यात जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत असून तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींचे शीर्षपद पटकावले आहे. त्यात सुवर्णा दिघे (कोल्हेवाडी), सुवर्णा घुगे (मालुंजे), भगीरथाबाई काठे (निंबाळे), प्रीती दिघे (जोर्वे), संदीप देशमुख (निमोण), नारायण गुंजाळ (सादतपूर), सविता शिंदे (रहिमपूर), ज्योती पचपिंड (कणकापूर), उषा दिघे (तळेगाव दिघे) आदिंचा समावेश आहे. याशिवाय माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या घुलेवाडीतून अतिशय धक्कादायक निकाल हाती आला असून अविश्वास ठरावाचा सामना करणारे माजी सरपंच सोपान राऊन यांच्या स्नुषा निर्मला राऊत यांच्यावर तेथील मतदारांनी विश्वास दाखवला आहे.

आज झालेल्या मतमोजणीत विजयी आणि पराभूत उमेदवारांमध्ये मतांचे मोठे अंतर बघायला मिळालेले असताना हंगेवाडीत मात्र ‘सामना बरोबरीत’ झाल्याचाही प्रकार समोर आला. येथील अनुसूचित जाती-जमातीसाठीच्या प्रभाग क्रमांक दोनमधील दोन्ही गटाच्या महिला उमेदवारांना समान 180 मते पडली असून त्यांच्या निवडीचा फैसला ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून केला जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अमोल निकम यांनी दिली.

