संगमनेरला मिळाला तिसरी राष्ट्रीय योगासन स्पर्धा भरविण्याचा मान! डॉ. संजय मालपाणी; पाच दिवस चालणार्या स्पर्धेत देशभरातून एक हजार स्पर्धकांचा सहभाग

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्हा व राज्यस्तरावरील योगासन स्पर्धांच्या यशस्वी आयोजनानंतर संगमनेरात आता तिसरी राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे. येत्या 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या क्रीडा संकुलात पार पडणार्या या स्पर्धेसाठी देशातील 30 राज्यांमधून एक हजारांहून अधिक स्पर्धक, त्यांचे प्रशिक्षक व राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मागील स्पर्धांच्या नेटक्या आयोजनाच्या जोरावर संगमनेरात पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांच्या आयोजनाचा मान मिळाला असून या माध्यमातून संगमनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्र सरकारने भारतीय प्राचीन परंपरेतील योगासनांना खेळाचा दर्जा दिल्यापासून त्याच्याप्रचार-प्रसारासह योगासनांच्या स्पर्धांसाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम, योगासनांची निवड, निष्णात पंचांचे प्रशिक्षण आणि वेगवेगळ्या स्पर्धांच्या आयोजनात संगमनेरचे मोठे योगदान राहिले आहे. यापूर्वी योगासनांच्या राज्य व जिल्हास्तरीय स्पर्धाही संगमनेरात आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यातून स्पर्धा आयोजनाचा संगमनेर पॅटर्न विकसित झाल्याने राष्ट्रीय योगासन फेडरेशनचे अध्यक्ष उदीत सेठ व सेक्रेटरी जनरल जयदीप आर्य यांच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवरील या तिसर्या स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी संगमनेरला प्राप्त झाली आहे.

येत्या 26 ते 30 डिसेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या क्रीडा संकुलात या स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी संपूर्ण देशातील 30 राज्यांमधून एक हजारांहून अधिक योगासन खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यासोबतच या सर्व स्पर्धकांचे प्रशिक्षक, शिक्षक व राष्ट्रीय आणि राज्य योगासन संघटनांचे पदाधिकारी अशा जवळपास बाराशेहून अधिक जणांच्या उपस्थितीने योगासन स्पर्धेचे क्रीडा संकुल गजबजून जाणार आहे. या सर्वांच्या निवासासह जेवणाची व स्पर्धा सरावाची व्यवस्थाही करण्यात आली असून त्यासाठी वेगवेगळ्या समित्याही कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय पातळीवर खेळविली जाणारी ही स्पर्धा योगासनांच्या वेगवेगळ्या चार प्रकारांमध्ये होणार आहे. त्यात पारंपारिक व कलात्मक एकेरी व दुहेरी, तालात्मक प्रकारात दुहेरी आणि कलात्मक प्रकारात सांघिक सादरीकरण होणार आहे. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष भालचंद्र पाडळकर, तांत्रिक संचालक रचित कौशिक दिल्ली व व्यवस्थापकीय संचालक डॉ. निरंजन मूर्ती बेंगलोर आदी पदाधिकार्यांसह राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेकजण या स्पर्धेसाठी संगमनेरात येणार आहेत.
