ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालावरुन अंभोर्यात दोन गटात राडा! थोरात व विखे गटाची एकमेकांवर फ्रि स्टाईल; दोन्ही बाजूच्या तीस जणांवर गुन्हा दाखल..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या महिनाभरापासून राज्यासह संगमनेर तालुक्यात उडालेला गावगाड्याच्या निवडणुकांचा धुरळा मंगळवारी मतमोजणी प्रक्रिये सोबत खाली बसल्याचे वाटत असतांना आता निवडणुकांच्या निकालावरुन गावांमध्ये रणकंदन माजत असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी दुपारपर्यंत सर्व निकाल घोषीत झाल्यानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांचा गावागावात जल्लोश सुरु असतांनाच अंभोर्यात मात्र या जल्लोशाला एकमेकांच्या कुरघोड्या करीत मारहाणीची किनार लागली आहे. यात दोन्ही बाजूच्या काहींना दुखापती झाल्या असून दोन्हीकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने एकूण 30 जणांवर दंगलीसह प्राणघातक शस्त्रांचा वापर करुन जखमी करणे, शिवीगाळ व दमदाटी करुन प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात राजकीय हस्तेक्षपही झाल्याने एका गटावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे.
याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार यातील पहिली फिर्याद जनसेवा मंडळाच्या (विखे गट) सचिन संपत खेमनर (रा.शिकारे वस्ती, अंभोरे) यांनी दाखल केली आहे. त्यानुसार आश्वीत राहणारा आरोपी शुभम भास्कर जर्हाड याने मंगळवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास फिर्यादीचा चुलत भाऊ प्रकाश गणपत खेमनर याला शेतकरी विकास मंडळाकडून उमेदवारी करणार्या दगडू बिरु खेमनर यांचा पराभव झाल्याचा राग मनात धरुन हाताच्या चापटीने तोंडावर मारले. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या बाळासाहेब दगडू खेमनर यांनी फिर्यादीच्या शिकारे वस्ती येथील घरी जावून जीवे ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली.
यावेळी आरोपी नारायण सहादु खेमनर (विजयी सदस्य, ह.मु.संगमनेर), रंगनाथ सहादु खेमनर (ह.मु.लोणी), हरिभाऊ सहादु खेमनर, सहादु दामु खेमनर, राधा दामु खेमनर, शरद राघु खेमनर, भरत राघु खेमनर (पाचही रा.अंभोरे), भास्कर गोविंद जर्हाड (रा.आश्वी), कोंडाजी हनुमंत वाघमोडे, नारायण कोंडाजी वाघमोडे (दोघेही रा.अंभोरे) व बाळासाहेब दगडू खेमनर (मूळ कोळवाडे, ह.मु.संगमनेर) या बारा जणांनी फिर्यादीच्या घरासमोर जावून गैरकायद्याची मंडळी गोळा केली व फिर्यादीचे चुलत भाऊ, चुलते यांना शिवीगाळ, दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी, काठीने व हातात दगड घेवून वाहनाच्या की-चेनला असलेल्या कटरने मारुन दुखापत केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
अशा आशयाच्या फिर्यादीवरुन संगमनेर तालुका पोलिसांनी वरील 12 जणांच्या विरोधात बेकायदा जमाव जमवून दंगल घडवणे, प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करुन जखमी करणे, धमकी देणे, शिवीगाळ करणे व प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 143, 147, 149, 324, 323, 504, 506, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1) (3) चे उल्लंघन केल्याने 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
यातील दुसरी फिर्याद शेतकरी विकास मंडळाच्या (थोरात गट) कोमल शरद खेमनर यांनी दाखल केली आहे. त्यानुसार फिर्यादी महिलेचा भाया नारायण खेमनर यांचा ग्रामपंचायत सदस्यपदाच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर दुपारी साडेचारच्या सुमारास ते गावातील मारुती मंदिराच्या समोर उभे होते. त्यावेळी आरोपी श्रावण गोविंद खेमनर व प्रकाश गणपत खेमनर हे दोघे तेथे आले व त्यांनी नारायण खेमनर यांना ‘तु निवडून कसा आलास?, तुझ्याकडे पाहुन घेतो..’ अशी दमदाटी करीत त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी कोमल खेमनर या आपली जाव व सासर्यासोबत मोटार सायकलवरुन जनावरांना चारा आणण्यासाठी जात असतांना आरोपी संपत गोविंद खेमनर (विजयी सदस्य), सचिन संपत खेमनर,
अक्षय श्रावण खेमनर, अशोक गोविंद खेमनर, गणपत गोविंद खेमनर, अजय अशोक खेमनर, योगेश संपत खेमनर, अभय श्रावण खेमनर, ज्योतिबा नामदेव जगन्नर, पंढरीनाथ गंगाराम वाघमोडे, नारायण गंगाराम वाघमोडे, मंगल संपत खेमनर, गोविंद सखाराम खेमनर, सविता अशोक खेमनर, दीपाली प्रकाश खेमनर व अनुराधा सचिन खेमनर (सर्व रा.अंभोरे) यांनी एकत्र येवून फिर्यादी कोमल खेमनर, त्यांचे पती शरद खेमनर, भाया नारायण खेमनर, चुलत सासरे सहादु दामु खेमनर व सासरे राधु दामु खेमनर यांना शिवीगाळ, दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केली. या गदारोळात कोमल खेमनर यांच्या उजव्या कानातील झुबा व गळ्यातील सोन्याचे गंठणही गहाळ झाले.
दुपारी साडेचार वाजता घडलेल्या या घटनेत थोरात गटाचे विजयी उमेदवार नारायण सहादु खेमनर यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी आज पहाटे सव्वादोन वाजता तालुका पोलिसांनी वरील 18 जणांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 143, 147, 149, 324, 323, 504, 506, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1) (3) चे उल्लंघन केल्याने 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने अंभोर्याची ग्रामपंचायत सर करणार्या माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांचा शेतकरी विकास मंडळ व विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळात मोठा तणाव निर्माण झाला असून गावातील वातावरण खराब झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्याच्या राजकारणात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजकीय हस्तक्षेप वाढला असून मंगळवारच्या घटनेत तो स्पष्टपणे दिसून आला. सदरील हाणामारीचा प्रकार जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून घडविला गेला व त्यात विजयी उमेदवार व पेशाने शिक्षक असलेले नारायण खेमनर हे गंभीर जखमीही झाले. मात्र त्यांची फिर्याद घेण्यास सुरुवातीला पोलिसांनी टाळाटाळ केल्याचे समजते. मारहाण व दमदाटी करणार्या गटाची तक्रार दाखल झाल्यानंतरच मार खाल्लेल्या गटाची तक्रार नोंदविण्यात आल्याचेही या घटनेतून समोर आले आहे. त्यावरुन या प्रकरणात राजकारणाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट असून त्याचे कंप यापुढेही जाणवण्याची शक्यता आहे.