संगमनेर तालुक्यातील महाराष्ट्र सैनिकांवर प्रतिबंधात्मक कारवाई! अकरा जणांना ताब्यात घेतले, मात्र न्यायालयाने तत्काळ सोडण्याचे आदेश दिले..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मंगळवारी देशभरात रमजान ईद आणि अक्षयतृतीयाचा सण साजरा होत आहे. मात्र तत्पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भोंग्यांचा मुद्दा पुढे करुन 3 मे पर्यंत धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविण्याचा ‘अल्टीमेटम’ दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण तापल्याने शांतता व सुव्यवस्थेचा मुद्दा निर्माण झाला आहे. त्यातून समाजातील जातीय सलोखा बाधीत होवून शांततेचा भंग होवू नये यासाठी संगमनेर पोलिसांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली असून शहरातील 20 कार्यकर्त्यांना नोटीसा, 16 जणांचे हमीपत्र व सात जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईनंतर आज मनसेच्या प्रमुख पदाधिकार्यांसह अकराजणांवर स्थानबद्धतेची कारवाई करीत त्यांना ताब्यात घेवून न्यायदंडाधिकार्यांसमोर हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी पक्ष व बचाव पक्षात जोरदार युक्तिवाद झाला, अखेर न्यायालयाने पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ‘त्या’ अकराही जणांवर कोणतीही कारवाई करण्यास मनाई करीत त्यांना तत्काळ सोडण्याचे आदेश दिले.
गेल्या 17 एप्रिलरोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा विषय समोर करुन 3 मे पर्यंत सर्व धार्मिकस्थळांवरील भोंगे उतरविण्याचा इशारा राज्य सरकारला दिला होता. जाहीर केलेल्या तारखेपर्यंत शासनाने कारवाई न केल्यास राज्यातील अशा प्रार्थनास्थळांच्या समोर दुप्पट आवाजात लाऊडस्पिकर लावून हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणाही त्यांनी केली होती. त्यानंतर या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण तापले असून यावर्षी रमजान ईद व अक्षयतृतीया हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्याने पोलिसांची डोकेदुखीही वाढली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशार्याची गंभीर दखल घेवून पोलिसांनी आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून संगमनेर पोलिसांनी यापूर्वीच उपद्रवी ठरु शकणार्या 20 कार्यकर्ते व पदाधिकार्यांवर सीआरपीसीच्या 149 अन्वये नोटीसा बजावल्या आहेत, तर सात कार्यकर्त्यांवर सीआरपीसीच्या 107 नुसार प्रतिबंधात्मक कारवाई व 16 जणांकडून हमीपत्र देखील घेण्यात आले आहे. शहरात कायद्याचे राज्य असून कोणत्याही स्थितीचा सामना करण्यास पोलीस सक्षम असल्याचा विश्वास नागरीकांच्या मनात निर्माण व्हावा यासाठी आज (ता.2) पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गावरुन संचलनही केले.
एकीकडे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात असतांना दुसरीकडे महाराष्ट्र सैनिकांकडून त्यात बाधा निर्माण होईल असा बाऊ करुन आज सकाळी पोलिसांनी महाराष्ट्र सैनिकांची धरपकड करुन त्यांना सीआरपीसीच्या 151 (3) नुसार ताब्यात घेतले. दुपारी त्यांना न्यायदंडाधिकार्यांच्या समोर हजर करुन सरकारी पक्षाने या सर्वांना किमान दोन दिवस स्थानबद्ध करण्याची परवानगी मागितली. त्यावर बचाव पक्षाच्यावतीने युक्तिवाद करतांना अॅड.श्रीराम गणपुले यांनी सरकारी पक्षाचा मुद्दा खोडून काढतांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केलेल्या अकरा जणांवर यापूर्वी अशाप्रकारचे कोणतेही गुन्हे दाखल नसल्याने पोलिसांची कारवाई चुकीची असल्याचा मुद्दा मांडला.
तो ग्राह्य धरुन न्यायालयाने पोलिसांनी ताब्यात घेतलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उत्तर नगरजिल्हा प्रमुख शरद ज्ञानदेव गोर्डे (वय 42, रा.वडझरी बु.), तालुका प्रमुख अशोक सवरग्या शिंदे (वय 32, रा.वैदुवाडी), शहरप्रमुख तुषार विजय ठाकूर (वय 32, रा.रहाणेमळा), अविनाश हौशीराम भोर (वय 46, रा.चैतन्यनगर), संदीप रंगनाथ आव्हाड (वय 32, रा.वाडेकर गल्ली), दिलीप साहेबराव ढेरंगे (वय 27, रा.समनापूर), प्रमोद अशोक काळे (वय 31, रा.लक्ष्मीनगर), दर्शन बाबाजी वाकचौरे (वय 37, रा.मेहेरमळा), संकेत सुभाष लोंढे (वय 28, रा.गणेशनगर), अभिजीत अशोक कुलकर्णी (वय 37, रा.मालपाणी नगर) व रामा चंद्रभान शिंदे (वय 19, रा.वैदुवाडी) या सर्वांना तत्काळ सोडण्याचे आदेश दिले. यावेळी सरकारी पक्षाने ताब्यात घेतलेल्यांकडून किमान हमीपत्र भरुन घेण्याची विनंती न्यायालयाला केली, मात्र ती देखील फेटाळण्यात आली व कोणतीही कारवाई न करता या सर्वांना सोडण्यात आले.