उत्तर प्रदेश राज्यात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करा ः तांबे
उत्तर प्रदेश राज्यात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करा ः तांबे
राहुल गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ संगमनेरात युवक काँग्रेसचे निदर्शन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
उत्तर प्रदेशातील हाथसर येथील दलित तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भेटीसाठी जात असलेले काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना झालेली अटक व धक्काबुक्की अत्यंत निंदनीय आहे. या कृतीतून मोदी व योगी सरकार हे पूर्णपणे हुकूमशाही करत असल्याची घाणाघाती टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केली असून उत्तर प्रदेशमध्ये तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
संगमनेर बस स्थानकासमोर संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्यावतीने आयोजित निदर्शन मोर्चात ते बोलत होते. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, निखील पापडेजा, गौरव डोंगरे, सुभाष सांगळे, आनंद वर्पे, नितीन अभंग, राजेश वाकचौरे, निर्मला गुंजाळ, प्रा.बाबा खरात, मजहर शेख, अजय फटांगरे, शैलेश कलंत्री, शेखर सोसे, मुश्ताक शेख, योगेश जाजू, नीलेश शिंदे, आकाश जेधे, प्रथमेश मुळे, सौ.रहाणे आदी युवक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन निदर्शन केले.
याप्रसंगी बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले, देशात मोदी व योगी सरकारच्या काळात लोकशाही पायदळी तुडवून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. भारतीय राज्यघटनेत सक्षम विरोधक हा लोकशाहीत अत्यंत महत्त्वाचा ठरवला आहे. मात्र विरोधकांचे तोंड बंद करण्याचे काम मोदी सरकारकडून केले जात आहे. काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते खासदार राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्की अत्यंत निंदनीय असून याचा संपूर्ण भारतामधून निषेध व्यक्त होत आहे. गोरगरिबांच्या मुलीवर झालेल्या अत्याचारावर भाजप नेते एक शब्दही बोलायला तयार नाही. मात्र सुशांतसिंह प्रकरण, रिया चक्रवर्ती, कंगना राणावत यांच्यावर बोलणारे भाजप नेते आज मात्र गप्प आहेत.
महाराष्ट्रात एका छोट्या गोष्टीवरून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी कंगणा राणावतचे समाजासाठी योगदान काय? मात्र उत्तर प्रदेशातील गोरगरिबाच्या मुलीवर अत्याचार झाला तेथे दंगलराज सुरू आहे. महिला सुरक्षित नाहीत. त्यामुळे राष्ट्रपती महोदयांनी उत्तर प्रदेशात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी तांबे यांनी केली आहे. यावेळी अफजल शेख, अनिस शेख, लाला शेख, वैष्णव मुर्तडक, रमेश गफले, विजय उदावंत, भूपेश भळगट, हर्षल रहाणे, सागर कानकाटे, नवनाथ ढोणे, चंदू क्षीरसागर, तात्या कुटे, सिद्धेश घाडगे, शहबाज शेख, हैदर अली शेख, तुषार वनवे, अमित गुंजाळ, भाऊसाहेब सातपुते, बाळा राक्षे, नीलेश शिंदे, पांडुरंग खेमनर, अलोक बर्डे, सचिन खेमनर, भागवत कानवडे, प्रवीण दिड्डी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.