बिरेवाडीच्या सरपंच श्रीमती सागर यांचा राजीनामा

नायक वृत्तसेवा, साकुर
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बिरेवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच जिजाबाई भाऊसाहेब सागर यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला.

गेल्या तीन वर्षांपूर्वी बिरेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाने ९ पैकी ६ जागांवर बाजी मारत ग्रामपंचायतीवर झेंडा फडकाविला होता. सरपंचपदासाठी एक, दीड तसेच अडीच वर्षं असा कालावधी वाटून घेण्यात आला होता. त्यानुसार पहिल्या एक वर्षांसाठी निलम पांडुरंग ढेंबरे यांची सरपंचपदी निवड करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दीड वर्षांच्या कार्यकाळासाठी जिजाबाई भाऊसाहेब सागर यांची सरपंचपदासाठी निवड करण्यात आली होती. त्यांचाही कार्यकाळ पूर्ण झाल्याने महिनाभरापूर्वी त्यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांच्याकडे दिला आहे.
गटविकास अधिकाऱ्यांनी जिजाबाई सागर यांचा राजीनामा पडताळणीसाठी ग्रामपंचायतीकडे पाठविला आहे. त्यानुसार ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष बैठकीचे १६ जुलै रोजी आयोजन करण्यात आले होते. पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील अडीच वर्षांसाठी नवीन सरपंचांची निवड करण्यात येणार आहे.

Visits: 74 Today: 3 Total: 1098265
