हाथरस घटनेतील आरोपींना फाशी द्या; सर्वधर्मीय समाज संघटनेची मागणी
हाथरस घटनेतील आरोपींना फाशी द्या; सर्वधर्मीय समाज संघटनेची मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी संगमनेर येथील सर्वधर्मीय संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच प्रांत कार्यालयातील प्रभारी नायब तहसीलदार लक्ष्मण मेंगाळ यांना देण्यात आले.
सदर निवेदनात म्हंटले आहे की, उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराची घटना अतिशय निंदनीय असून समाजाला काळिमा फासणारी आहे. सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशी द्यावी. तर हे प्रकरण दडपण्यासाठी योगी सरकार व पोलीस प्रशासन दबाव टाकत असल्याचा आरोप करुन पीडितेच्या कुटुंबियांना संरक्षण देऊन योग्य तो न्याय देण्यात यावा अशी मागणी केली आहे. यावेळी सर्वधर्मीय समाज संघटनेचे समन्वयक व महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले, चर्मकार समाजाचे कारभारी देव्हारे, तांबट समाजाचे भारत रेघाटे, मराठा समाजाचे संदीप शेळके, कतारी समाजाचे दीपक कतारी, सोनार समाजाचे नीतेश शहाणे, निर्हाळी समाजाचे किरण नेहुलकर, मुस्लीम समाजाचे सादिक तांबोळी, रामोशी समाजाचे अमोल म्हस्कुले, बौद्ध समाजाचे बंटी यादव, विजय आढाव, प्रभाकर जगताप, गोसावी समाजाचे गोविंद गोसावी, न्हावी समाजाचे महेश व्यवहारे, कोष्टी समाजाचे कमलेश अस्मर आदी उपस्थित होते.