रुग्णांची संख्या अधिक असूनही चाचण्या नाहीत? तिसर्‍या लाटेचा धोका फार कमी; सत्तर टक्के रुग्णांचा बाह्यरुग्ण उपचार..

श्याम तिवारी, संगमनेर
राज्यात अपेक्षेप्रमाणे कोविड संक्रमणाची तिसरी लाट पसरताना दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या रुग्णसंख्येने गेल्या दहा दिवसांत घेतलेली उसळी बघता जिल्ह्यावरही ही लाट येवून आदळली आहे. जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या साडेचार हजारांहून अधिक असतांनाही रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेणार्‍यांची संख्या मात्र खूपच कमी आहे. एकीकडे जिल्ह्याची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतांना दुसरीकडे दुसर्‍या संक्रमणाचा मोठा धक्का सहन करणार्‍या संगमनेरात मात्र त्याचा फारसा प्रभाव दिसत नसल्याने ‘चाचण्या कमी म्हणून रुग्ण कमी’ अशा चर्चा रंगल्या आहेत. प्रत्यक्षात वास्तव मात्र वेगळेच असून गेल्या दोन वर्षात टिकून असलेला संसर्ग, त्यातून निर्माण झालेली प्रतीपिंड आणि लसीकरण यामुळे बाधित झालेल्या सत्तर टक्के व्यक्ती खासगी डॉक्टरांच्या बाह्यरुग्ण विभागातून उपचार घेवूनच बर्‍या होत आहेत. व्याधीग्रस्त व त्यातही साठ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींनाच रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता असल्याने कोविड आता एकाप्रकारे नियमित आजार होवू लागला आहे.

गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येत अचानक वाढ व्हायला सुरुवात झाली. डिसेंबर अखेर सरासरी पन्नाशीच्याही खाली गेलेल्या रुग्णसंख्येने हळूहळू वेग घेत आज ती दररोज सरासरी 347 रुग्णांवर पोहोचली आहे. नगर महापालिका हद्दीत संक्रमणाचा वेग शंभराहून अधिक आहे. तालुकास्तरावर दुसर्‍या संक्रमणाची मोठी झळ सोसणार्‍या संगमनेरातून मात्र सरासरी बारा रुग्ण या गतीने बाधित समोर येत आहेत. ही सरासरी जिल्ह्यात नवव्या क्रमांकाची आहे. संगमनेरपेक्षा अकोल्याचा सरासरी रुग्ण समोर येण्याचा वेग अधिक असून जिल्ह्यात चौथ्या क्रमांकाचे रुग्ण तेथून समोर येत आहे. राहाता, नगर तालुका, श्रीरामपूर, कोपरगाव, श्रीगोंदा व पारनेर तालुक्यांचा सरासरी वेगही संगमनेरहून अधिक आहे. जिल्ह्यात वेगाने रुग्णवाढ होत असताना संगमनेर समोर येणारी रुग्णसंख्या खूपच नगण्य वाटत असल्याने ‘चाचण्या कमी म्हणून रुग्ण कमी’ अशा चर्चा रंगल्या आहेत. प्रत्यक्षात दैनिक नायकने वैद्यकीय जाणकारांकडून याबाबतची माहिती मिळविली असता यामागील वास्तव समोर आले.

सध्या संगमनेर तालुक्यातील चाचण्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे समोर येणार्‍या रुग्णांची संख्या जिल्ह्याच्या तुलनेत खूपच कमी असल्याने नागरीकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. पूर्वी बाधितांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जायचे. मात्र आता तसे होत नाही. लक्षणे जाणवणार्‍या व्यक्तीने स्वतःहून चाचणी करणे अपेक्षित असते. मात्र सध्या तिसर्‍या संक्रमणाचा प्रभाव दिसत असतानाही संगमनेरात मात्र नगण्य रुग्ण आढळत आहेत. खरेतर सुमारे 60 ते 70 टक्के रुग्ण सर्दी, खोकला व ताप अशा तक्रारी घेवून खासगी डॉक्टरांच्या बाह्यरुग्ण विभागात जावून चाचणी न करताच बरे होत आहेत. सध्या खासगी डॉक्टरांच्या बाह्यरुग्ण विभागातील गर्दी संक्रमणाचा वेग सांगण्यासाठी पुरेशी आहे. ज्यांचे वय साठ वर्षांहून अधिक आहे व त्यातही त्यांना डायबेटीस, ब्लडप्रेशर, संधीवात, अस्थमा वा किडनीचे विकार आहेत अशा नागरिकांना कोविडची लागण झाल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर नियमानुसार त्यांची चाचणी करावी लागत असल्याने केवळ अशाच रुग्णांचे अहवाल समोर येत आहेत. खासगी डॉक्टरांच्या बाह्यरुग्ण विभागातून उपचार घेणारे आपली चाचणीच करीत नसल्याने त्यांची कोठेही नोंद होत नाही. दुसर्‍या संक्रमणात 

राज्यातील कोविडची लाट ओसरुनही जिल्ह्यात आणि संगमनेरात त्याचा दीर्घ प्रभाव टिकून होता. कोविडचे दीर्घकाळ जिल्ह्यात व त्यातही संगमनेर तालुक्यातील वास्तव्य संक्रमणाची तिसरी लाट रुग्णालयांपर्यंत घेवून जाण्याची शक्यता फार कमी आहे. जिल्ह्याचा गेल्या दोन वर्षांचा काळ कोविड छायेतच गेला. या दरम्यान दहा ते पंधरा टक्के नागरिकांना प्रत्यक्ष लागण झाली. अप्रत्यक्षपणे कोविड होवून गेलेल्यांची अथवा परस्पर उपचार घेवून बरे झालेल्यांची संख्या वेगळीच. या सर्व प्रक्रियेतून शरीरात प्रतीपिंड (अँटीबॉडिज्) तयार होवून कोविडचा प्रतिकारही वाढला, त्यात तालुक्यातील लसीकरणाची मोठी भर पडली.

आत्तापर्यंत एकट्या संगमनेर तालुक्यात 35 हजारांहून अधिक बाधित झाले असून पाचशेहून अधिक मृत्यू पावले आहेत. आजही तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 131 आहे व 172 पैकी चाळीस गावांना संक्रमणाची झळ बसली आहे. आत्तापर्यंत तालुक्यातील 3 लाख 27 हजार 771 जणांना (90.98 टक्के) लशीचा पहिला तर 2 लाख 4 हजार 790 जणांना (56.85 टक्के) दुसरा डोस देण्यात आला आहे. 15 ते 18 वयोगटातही लसीकरणाचा वेग अधिक असून आत्तापर्यंत 20 हजार 447 जणांनी (74.18 टक्के) लस घेतली आहे. त्याचा परिणाम कोविड विरोधातील लढाई अधिक तीव्र झाली असून जवळपास सत्तर टक्के नागरिक त्याचा प्रतिकार करण्यास सक्षम झाले आहेत.

त्यामुळे सध्या वातावरण बदलाच्या निमित्ताने होणारी सर्दी, खोकला आणि हलकासा ताप घेवून खासगी डॉक्टरांकडून बाह्यरुग्ण पातळीवरच उपचार घेवून जवळपास 60 ते 70 टक्क्यांहून अधिक नागरीक उपचार घेवून बरे होत आहेत. ज्यांना आधीच्या शारीरिक व्याधी आहेत व वयही अधिक आहे अशांनाच रुग्णालयापर्यंत आणून त्यांची चाचणी व उपचार करण्याची गरज भासत आहे. आयसीएमआरचेही तसेच निर्देश आहेत. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढवली तर केवळ कागदावरील आकडे फुगतील. दुसर्‍या लाटेत रुग्णालयातील उपचार, ऑक्सिजनच्या खाटा, ऑक्सिजन अशा सगळ्याच गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यावेळी गंभीर असलेल्या रुग्णांची संख्याही लक्षणीय होती. या लाटेत मात्र तशी परिस्थिती अजिबातच उद्भवणार नाही, तसेच प्रत्यक्ष रुग्णालयात दाखल होवून उपचार घेणार्‍यांची संख्याही अगदीच नगण्य म्हणजे एक ते दिड टक्क्यांच्या आसपास राहण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.


आयसीएमआरच्या निर्देशानुसार एखाद्या व्यक्तिला एकाचवेळी एकापेक्षा जास्त अंतर्निहित आरोग्यसंबंधी (कॉमोरबिडीटीज्) समस्या असतील अशाच रुग्णांच्या चाचण्या करुन रुग्णालयात उपचार द्यावेत असे म्हटले आहे. याचाच अर्थ कोणतेही आजार नसलेल्या आणि साठापेक्षा कमी वयाच्या व्यक्तिंना कोविडपासून जीवघेणा धोका नाही, बाह्यरुग्ण पातळीवर उपचार व गृहविलगीकरणातून तो बरा होवू शकतो असाच संदेश मिळाला आहे. त्यामुळे कोविड आता सवयीचा आणि नियमित झाला असून तो यापुढेही वेगवेगह्या स्वरुपात सोबत राहणारच आहे. त्यासाठी लॉकडाऊन, निर्बंध अशा गोष्टींची भविष्यात गरज भासणार नाही असाच वैद्यकीय क्षेत्राचा कयास आहे.

Visits: 163 Today: 1 Total: 1425823

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *