शिवाजी कर्डिलेंवर तातडीने कायदेशीर कारवाई करा ः तनपुरे धमकी प्रकरण; पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना दिले निवेदन

नायक वृत्तसेवा, राहुरी
भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी दोन-चार केसेस झाल्याने आम्हांला काही फरक पडत नाही, असे म्हणत त्यांच्याच पक्षातील दिवंगत खासदाराच्या मुलाला हात पाय तोडण्याची धमकी देत, अरेरावी केली. भाजपचे नेते कायद्याला जुमानत नाहीत. संपूर्ण राज्यात अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे हे कायद्याचे राज्य आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्डिले यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करून दखलपात्र गुन्हा दाखल करावा. अन्यथा महाविकास आघाडी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.

गुरुवारी (ता.15) जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतल्यानंतर आमदार तनपुरे बोलत होते. पुढे ते म्हणाले, ज्यांनी कायदे मंडळात काम केले असे भाजपचे माजी आमदार कर्डिले कायद्याला जुमानत नाहीत. याचा समाज मनावर मोठा परिणाम होऊ शकतो. कर्डिलेे यांनी भाजपातील माजी खासदार पुत्राला फोनवर धमकी देत हात पाय तोडण्याची, अरेरावीची भाषा केलेली आहे. सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी पूर्ण राज्यात अशीच भाषा करत आहेत. त्यामुळे हे कायद्याचे राज्य आहे का? असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. बुर्हाणनगरचे अॅड. अभिषेक भगत यांच्यावरही या माजी आमदाराने अन्याय केला आहे. बुर्हाणनगरच्या मंदिराचा प्रश्न अजून न्यायप्रविष्ठ आहे.

अद्याप कोणताही निर्णय न्यायालयाने दिलेला नसताना या माजी आमदाराने त्यांच्या घरावर शंभर-सव्वाशे माणसे पाठवून तेथे दमदाटी व शिवीगाळ केली आहे. त्यामुळे या राज्यात सर्वसामान्य नागरिक सुरक्षित नाही. सत्तेत आल्यावर कायद्याला जुमायाचे नाही, अशीच परिस्थिती पूर्ण राज्यात असून भाजप सत्तेचा दुरुपयोग करत आहे. कर्डिले यांची गुन्हेगारी प्रवृत्ती आजची नाहीये. आजपर्यंत कित्येक गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. जर सत्ताधारी खुलेआम कायदे मोडण्याची भाषा करत असतील व त्यांच्यावर कोणतीच कारवाई न करता गुन्हा दाखल होत नसेल तर सर्वसामान्यांचा कायद्यावरील विश्वास उडेल. यासाठी अशा प्रवृत्तीवर कडक शासन व्हावे, त्वरीत गुन्हा दाखल करावा यसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना महाविकास आघाडीच्यावतीने निवेदन देण्यात आले. येत्या अधिवेशनात या विषयावर आवाज उठवणार असून तारांकित प्रश्नही उपस्थित करणार आहे असे तनपुरे म्हणाले.
![]()
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सीसीटीव्ही फूटेज व मोबाइल रेकॉर्डिंग तपासले जात असून लवकरच योग्य कारवाई करू असे आश्वासन दिले. विक्रम राठोड, बाळासाहेब हराळ यांनी माजी आमदार कर्डिले यांच्यावर यापूर्वी दाखल गुन्ह्यांची माहितीही यावेळी पोलीस अधीक्षकांना दिली.
