आंबीखालसा विकासाचे शिल्पकार ः सुरेश कान्होरे

आंबीखालसा विकासाचे शिल्पकार ः सुरेश कान्होरे
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीखालसा हे गाव विविध विकासकामांपासून कोसो दूर होते. परंतु, गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा ध्यास उराशी बाळगलेले सुशिक्षित पदवीधर असलेले उमदे नेतृत्व सुरेश रामचंद्र कान्होरे यांनी स्थानिक राजकारणात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. आणि आपल्या कामाशी प्रामाणिक राहून ‘इमाने इतबारे’ काम करुन समाजातील तळागाळातील सर्वच घटकांना सोबत घेऊन ग्रामपंचायतच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षांपासून गावाचा अक्षरशः कायापालट केला आहे. आज गाव विकासाच्या यशोशिखरावर पोहोचले असून ग्रामविकासात आंबीखालसा गावाने आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. हे सर्व सुशिक्षित उमद्या नेतृत्व उपसरपंच सुरेश कान्होरे यांच्या कामगिरीच्या बळावर झाले आहे.


पुणे व नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्याकडेला आणि संगमनेर तालुक्याच्या पठारभागात आंबीखालसा हे गाव वसलेले आहे. या गावांतर्गत माळवदवाडी, तांगडी, गणपीरदरा, पानसवाडी, जोठे आदी वाड्या येत आहेत. त्यामुळे या गावचा विकास राजकीय आणि प्रशासकीय उदासिनतेमुळे होणे सुद्धा अवघड होते. परंतु गावातील पदवीधर उमदे नेतृत्व सुरेश कान्होरे यांनी पंधरा वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीची सूत्रे हाती घेतली. आणि तेव्हापासून समाजातील सर्व घटकांना बरोबर घेवून त्यांनी सामाजिक कामाला सुरूवात केली. बघता-बघता ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रामाणिकपणे विविध विकासकामांच्या माध्यमातून गावाचा कायापालट होण्यास प्रारंभ झाला. आजमितीला आंबीखालसा हे गाव विकासाच्या यशोशिखरावर पोहोचले आहे. गेल्या पाच वर्षांच्या कार्यककाळात कान्होरे यांनी रस्ते, पाणी, स्मशानभूमी, पथदिवे आणि वीज आदी विकास कामे मार्गी लावली आहेत. विशेषतः पाण्यातून होणार्‍या आजारांना रोखण्यासाठी आंबीखालसा व तांगडीमध्ये शुद्ध पाण्याचे प्रकल्प उभारले. येथे एक रुपयात पाच लिटर थंड पाणी ग्रामस्थांना मिळते.


याचबरोबर गावांतर्गत रस्ते, वाडी-वस्त्यांना जोडणारे रस्ते, दलित वस्ती सुधार योजनेतून डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगरमध्ये सिमेंट काँक्रिटीकरण, माता रमाबाई नगरमध्ये भूमिगत गटारी, कजबेवस्तीमध्ये पथदिवा आणि सिमेंट काँक्रिटीकरण केले आहे. तसेच गावातील स्मशानभूमीचेही लवकरच सुशोभिकरण होणार आहे. यावरुन गावातील सर्वच भागांतील आणि सर्वच घटकांतील विकासाचा अनुशेष भरुन काढला असल्याचे दिसत आहे. सध्या पानसवाडी आणि तांगडी येथील स्मशानभूमीचे काम प्रगतीपथावर आहे. तर कब्रस्तानमध्येही लवकरच गट (ब्लॉक) बसविण्यात येणार आहे. त्याचबरोबर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी नवीन शाळा खोल्या बांधण्यासाठी निधी मंजूर करुन आणला आहे. यामुळे गावकर्‍यांचा अतूट विश्वास कान्होरे यांच्यावर राहिल्याने काम करताना कोठेही अडथळा निर्माण झाला नाही. याचा प्रत्यय गावातील प्रत्येक विकासकामांवरुन अधोरेखित होत आहे. ग्रामपंचायतबरोबर गेल्या वीस वर्षांपासून प्रभाकरराव भोर विद्यालयाच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहत आहे. यामध्ये त्यांनी विद्यालयाची इमारत आणि इतर भौतिक सुविधांमध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे. तसेच विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक पदाची धुराही यशस्वीपणे सांभाळत आहे. यामुळे येथेही त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला असल्याचे ठळकपणे दिसत आहे.


एखादे काम हाती घेतल्यावर ते पूर्णत्वास जाईपर्यंत त्याचा पिच्छा न सोडणे हे त्यांच्या कार्यशैलीचे प्रमुख वैशिष्ट्य राहिले आहे. सकाळी घरातून गावात आल्यावर नेहमीच त्यांच्या अवतीभोवती कामे करुन घेण्यासाठी ग्रामस्थांचा गराडा असतो. यावरुच त्यांची कामाप्रती असलेली तळमळ दिसून येते. यामुळे गेल्या काही महिन्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावासह वाड्या-वस्त्यांवर जवळपास लाखो रूपयांच्या आसपास विकास कामे झाली आहेत. तसेच गावातील तंटे गावातच सोडविण्यावर त्यांचा कायम भर राहतो. गोरगरीबांच्या सुख-दुःखात नेहमी सहभागी होवून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कधीही मागे पुढे न पाहता कायमच पुढे राहत आहे. यामुळेच आंबीखालसा परिसरात ‘आपला माणूस आपल्यासाठी’ अशी ओळख त्यांची निर्माण झाली आहे. अशीच गावच्या विकासाची घोडदौड पुढेही कायम राहील, असा विश्वासही उपसरपंच सुरेश कान्होरे वाढदिवसानिमित्त व्यक्त केला आहे. संगमनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ते विश्वासू म्हणूनही तालुक्यात सुपरिचित आहे. आज त्यांनी 52 व्या वर्षात पदार्पण केले असून सर्वच क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनासह उदंड आयुष्य लाभण्याचा वर्षाव होत आहे.
शब्दांकन ः चेतन कहाणे (वन समिती अध्यक्ष, आंबीखालसा)
तुकाराम कजबे (तंटामुक्ती अध्यक्ष, आंबीखालसा)

Visits: 86 Today: 1 Total: 1114187

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *