मजूर घेऊन जाणारा टेम्पो उलटून एक ठार आठजण जखमी; चालकाविरोधात नेवासा पोलिसांत गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, नेवासा
चालकाच्या हलगर्जीपणामुळे फळबाग तोडण्याकरीता मजूर घेऊन जाणारा टेम्पो उलटून एक ठार तर आठजण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता.24) सकाळी 8 वाजता नेवासा बुद्रुक शिवारातील पवार वस्तीजवळ घडली आहे.

याबाबत मिर्झा अजाझ बेग इकबाल बेग (वय 38, रा. मोहल्ला कमान खुलताबाद, जि. औरंगाबाद) यांनी नेवासा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, शुक्रवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास माझ्यासह आमीन युसूफ पठाण, मिर्झा खलील छोटू बेग असे पुढील बाजूस व मागील बाजूस कामगार मिर्झा शाकीर बेग, युनूस बेग, मिर्झा जहीर बेग छोटू बेग, इम्रान शेख, मिर्झा फाईझ फरीद बेग, मिर्झा फरदीन बेग (सर्व रा. खुलताबाद, जि. औरंगाबाद), सोहेल सलीम शेख, मुक्तार शेख अहमद शेख, शेख इब्राहिम शेख (सर्व रा. दौलताबाद, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद) असे भाऊ मिर्झा इलियास इकबाल यांच्या मालकीच्या 407 टेम्पोमध्ये (क्र.एमएच.46, ई.0669) बसून खुलताबाद येथून पुनतगाव येथील नेवासा बुद्रुक शिवारातील फळबाग तोडण्याकरीता जात असताना आमीन युसूफ पठाण हा भरधाव वेगात चालवत होता.

दरम्यान, नेवासा बुद्रुक शिवारातील शंकर पवार यांच्या वस्तीसमोरील रस्त्याने जात असताना चिखल असल्याने गाडी स्लीप होऊन चालक आमीन पठाण याचे नियंत्रण सुटून टेम्पोचा तोल जाऊन उलटल्याने अपघात झाला. यामध्ये क्लिनर बाजूने बसलेला मिर्झा खलील छोटू बेग हा गाडीखाली दबला गेल्याने त्याच्या डोक्यास व तोंडावर जबर दुखापत होऊन तो बेशुद्ध पडला. तसेच मला व टेम्पोचालक आमीन पठाण यास मुका मार लागून दुखापत झाल्याने ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे उपाचारकामी गेलो. तेथे डॉक्टरांनी मिर्झा खलील छोटू बेग यास तपासले असता तो मयत असल्याचे सांगितले. तर वरील आठजण गंभीर जखमी झाले. यावरून टेम्पो चालकाविरुद्ध पोलिसांनी गुरनं. 532/22 भादंवि कलम 4 (अ), 337, 338, 427 तसेच मोटार वाहन कायदा 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनावाखाली पोलीस नाईक तमनर पुढील तपास करत आहे.

Visits: 186 Today: 1 Total: 1849551

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *