अल्पवयीन मुलीस विकत घेणार्या महिलेस अटक उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाची धडक कारवाई
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
येथील कुविख्यात गुन्हेगार मुल्ला कटर व बाबा चंडवाल यांच्याकडून एका अल्पवयीन मुलीस विकत घेणार्या शेवगाव येथील एका महिलेस श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने अटक केली आहे. या महिलेविरुध्द श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
अल्पवयीन मुलींना फसवून अमिष दाखवून निकाह करून अत्याचार करणार्या कुविख्यात गुन्हेगार मुल्ला कटर हा अटकेत असून त्याने अजून किती मुलींना फसवून त्यांच्यावर अत्याचार केले याचा तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके करत आहे. त्यांना या तपासात मुल्ला कटर याने अत्याचार करून त्या मुलीला बाबा चंडवाल याच्यामार्फत शेवगाव येथे कुंटणखाना चालविणार्या मीनाबाई मुसवत हिला विकल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व त्यांच्या पथकाने शेवगाव येथील नेवासा रस्त्यावरील श्रीराम मंदिर भुखंडाच्या परिसरात तिच्या राहत्या घरी छापा टाकला. पोलिसांना पहाताच मीनाबाईने पळ काढला होता. पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून तिचा शोध घेतला असता ती उसाच्या शेतात लपली होती. त्याठिकाणाहून तिला शोधून पोलिसांनी अटक केली.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात शेवगाव येथील कुंटनखानाचालक मीनाबाई मुसवत हिच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मुल्ला कटर याने अल्पवयीन मुलींना फसवून त्यांचेवर अत्याचार करुन धर्मांतर करुन निकाह केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येवून त्याच्यासह आत्तापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे.