तीन दशकांनंतर नवीन नगर रस्त्यावर शुकशुकाट! फुलांचा बाजार हलला; मात्र कोणतेही नियोजन नाही

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या वैभवातील प्रमुख मार्ग म्हणून ओळखल्या जाणार्‍या नवीन नगर रस्त्याने विजयदशमीच्या निमित्ताने तब्बल तीन दशकांनंतर आज मोकळा श्वास घेतला. कोविडच्या अनुषंगाने पालिकेने या रस्त्यावर फुलांचा बाजार भरवण्यास मनाई करुन पर्याय म्हणून जाणता राजा मैदानाच्या परिसरात तो भरवण्याची परवानगी दिली होती. प्रत्यक्षात मात्र या मैदानावर तशी कोणतीही व्यवस्था करण्यात पालिका अपयशी ठरल्याने फुल विक्रेत्यांनी सह्याद्री विद्यालयापासून जाणता राजा मैदानापर्यंतच्या रस्त्यावरच आपली दुकाने थाटली होती. त्यामुळे महामार्गावर वारंवार वाहतुकीचा खोळंबा होवून अपघाताची शक्यताही कायम होती.

चार दशकांपूर्वीपर्यंत सायंकाळनंतर अरगडे गल्लीतील मारुती मंदिराच्या पुढे जाण्यास कोणी धजावत नव्हते. अतिशय छोटेखानी स्वरुपातील संगमनेरच्या बसस्थानकात येणार्‍या बसेसची संख्याही मर्यादीत होती, आणि बहुतेक बसेेस दिवसा येत असल्याने सूर्यास्तानंतर या परिसरात जेमतेम मानवी हालचाल व्हायची. जुन्या संगमनेर शहराची मुख्य बाजारपेठ लाल बहाद्दूर शास्त्री चौकापासून लखमीपुरा मश्जिदपर्यंत पसरलेली होती. कालांतराने दुचाकी वाहनांची संख्या वाढू लागल्याने अतिशय निमुळत्या असलेल्या बाजारपेठेत वारंवार वाहतुकीची कोंडी होऊन नवीन पेठेच्या गरजेने जन्म घेतला. त्यातून काही मोठे सुवर्णकार, कापड व्यावसायीक यांनी बाजारपेठेला समांतर जाणार्‍या मेनरोडचा पर्याय निवडला.

बाजारपेठेपेक्षा मेनरोड काही प्रमाणात रुंद असला तरीही दुकानासमोर दुचाकी उभी राहील्यास वाहतुकीस खोळंबा व्हायला लागला. त्यातही राजेंद्र क्लॉथ स्टोअर्स वगळता इतर बहुतेक सर्व व्यापार्‍यांनी नव्याने दुकाने उभी करताना पार्किंग हा महत्वाचा विषयच सोडून दिल्याने वाढत्या लोकसंख्येनुसार मेनरोडवरील जागाही अपूरी पडू लागली. त्यामुळे पर्यायी बाजारपेठेचा विचार करुन चक्क पालिकेने नाल्यावर अतिक्रमण करुन आत्ताच्या नवीन नगर रस्त्यावर ‘साथी भास्करराव दुर्वे नाना’ यांच्या नावाने व्यापारी संकुल उभे केले. त्यानंतर मर्चंन्ट बँकेनेही आपले मुख्य कार्यालय या रस्त्यावर हलविले. त्यामुळे या भागात नागरिकांचा राबता वाढल्याने नंतरच्या काळात कधीकाळी दुर्लक्षित असलेला नवीन नगर रोड व्यापारी आस्थापने, बँका, हॉटेल्स आणि मोठ्या प्रमाणात रुग्णालये यामुळे भरभराटीला आला.

1990 च्या सुमारास या रस्त्यावर दिवाळीला फटाक्यांचे असंख्य स्टॉल्सही लागत. मात्र 92 साली येथील एका स्टॉलला आग लागल्याने एकमेकाला खेटून असलेल्या बहुतेक सर्वच फटाका स्टॉल्सला आगी लागून लाखों रुपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळे त्याच्या पुढच्या वर्षी पालिकेने नवीन नगर रस्त्यावर फटाके स्टॉल लावण्यास मनाई करीत आत्ताच्या लिंकरोड जवळील इंदिरा गार्डन परिसरात ते सुरु केले. मात्र त्याभागात पुन्हा विविध समस्या निर्माण झाल्याने दशकांपूर्वी तेथील स्टॉल्स जाणता राजा मैदानावर हलविण्यात आले. 1993 साली नवीन नगर रस्त्यावरुन फटाक्यांचे स्टॉल हटले आणि त्यांची जागा फुल विक्रेत्यांनी घेतली. तेव्हापासून 2020 पर्यंत याच रस्त्यावर दसरा आणि दिवाळीचा फुल बाजार भरत होता. तब्बल 27 वर्षांनंतर येथील हा बाजार आता जाणता राजा मैदानाजवळ हलविण्यात आला आहे.
फेरीविक्रेत्यांकडून पथकराची वसुली करण्यासाठी पालिकेने ठेकेदाराची नियुक्ती केलेली आहे. पालिका ठेकेदाराकडून वर्षाकाठी जवळपास साठ लाख रुपये घेत असल्याने शहरात कोठेही तुम्ही पाटी घेवून बसलात की ठेकेदार हजर होतो. त्याच्याकडून तुम्ही व्यापलेल्या जागेनुसार पैसे वसुल केले जातात. त्यामुळे साहजिकच त्यांच्यासाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सुद्धा पालिकेचीच आहे. अनेक शेतकरी दसरा-दिवाळीच्या पहिल्या दिवशीच फुले घेवून संगमनेरात येतात. त्यांच्यासाठी शौचालयाची सोय नसते, की पिण्याच्या पाण्याची. नवीन नगर रस्त्यावरुन बसस्थानकातील सुविधा त्यांना मिळत होत्या. पण आता हा बाजार जाणता राजा मैदानावर हलविण्यात आल्याने तेथून एखाद्या शेतकर्‍याला आपला माल सोडून जाणं अशक्य आहे.

पालिकेने सक्तीने फुलांचा बाजार हलविला खरा, मात्र जाणता राजा मैदानावर त्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे फुल विके्रते ठराविक अंतर सोडून सह्याद्री विद्यालयापासून जाणता राजा मैदानापर्यंतच्या रस्त्यावरच बसले होते. काही वर्षांपूर्वी या रस्त्यावर भरणारा भाजीबाजार पालिकेने असाच उठविला होता. त्यावेळी भाजी विक्रेत्यांशी मोठा संघर्षही झाला होता. आता पालिका त्याच रस्त्यावर सक्तिने फुलबाजार भरवित असल्याने आश्चर्यही व्यक्त होत आहे.

Visits: 7 Today: 1 Total: 79911

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *