सर्वोच्च पदावर बसण्याचे आदिवासी व्यक्तीला सौभाग्य मिळणार ः पिचड राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांना निवडून देण्याचे सर्वपक्षीयांना केले आवाहन
नायक वृत्तसेवा, अकोले
देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर आदिवासी व्यक्तीला बसण्याचे सौभाग्य प्रथमच मिळणार आहे. सर्व खासदार व आमदारांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून आदिवासी महिलेला निवडून द्यावे, असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कार्याध्यक्ष तथा राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी केले आहे.
माजी मंत्री पिचड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिलेला गौरव स्थान म्हणून भारतीय जनता पक्षाने व एन. डी. ए. यांनी उमेदवारी दिलेली आहे. ओरिसा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यात एका अत्यंत सामान्य आदिवासी कुटुंबात त्यांचा 20 जून, 1958 रोजी झाला. 1979 साली त्या पदवीधर झाल्या. ओरिसा सरकारच्या सिंचन खात्यात कारकून झाल्या. पुढे त्या शिक्षक झाल्या. नगरसेवक, आमदार, मंत्री, राज्यपाल झाल्या. घराणेशाही नाही, संपत्ती नाही, वारसा नाही हे सारेच थक्क करणारे आहे.
आजही त्या मयूरभंज येथे एका साध्या दुमजली घरात राहतात. त्यांनी दलित, आदिवासी यांच्या सेवेत स्वतःला झोकून दिलेले आहे. 2015 साली झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून पाच वर्षे काम केले. विनम्र स्वभावाच्या कठोर प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक झाला. विषेश म्हणजे त्या उच्चशिक्षित आहेत. झारखंडमध्ये राज्यपाल असताना आदिवासी कायद्यांच्या विरोधात सही केली नाही व आदिवासी समाजाला न्याय मिळवून दिला आहे. आता आदिवासी समाजाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च स्थान मिळणार आहे. तसेच आदिवासी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा या देशाला उपयोग होईल. देशातील आदिवासींचा गौरव म्हणून द्रौपदी मुर्मू यांना निवडून देण्यासाठी सर्व पक्षप्रमुखांनी आपल्या सर्व खासदार व आमदार मतदारांना मतदान करण्यास सांगावे अशी विनंती देखील माजी मंत्री पिचड यांनी केली आहे.