… तर वेळप्रसंगी जिल्हा बँकेसमोर मंडप टाकून उपोषण ः लंके राहुरीतील तनपुरे कारखाना सुरू होण्यासाठी कृती समितीतर्फे उपोषण

नायक वृत्तसेवा, राहुरी
तनपुरे साखर कारखाना सुरू व्हावा, मागील सहा वर्षांतील गैरव्यवहारांची चौकशी व्हावी. या मागण्यांसाठी कारखाना बचाव कृती समितीतर्फे सुरू असलेल्या उपोषणास केवळ पाठिंबा नाही, तर मी तुमच्याबरोबर आहे. वेळप्रसंगी जिल्हा बँकेसमोर मंडप टाकून उपोषणाला बसेन, असे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले.

राहुरी येथे तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.13) उपोषणस्थळी भेटीप्रसंगी आमदार लंके बोलत होते. चक्रीउपोषणाचा आजचा तिसरा दिवस होता. कारखाना बचाव कृती समितीचे संयोजक अमृत धुमाळ, राजू शेटे, पंढरीनाथ पवार, बाळासाहेब जठार, दादासाहेब पवार यांनी आमदार लंके यांच्यासमोर कारखान्यातील गैरव्यवहाराचा पाढा वाचला. तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार लंके म्हणाले, डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा राज्यात नावलौकिक होता. कारखाना पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या सहली येत होत्या. मी पण सहलीच्या निमित्ताने कारखाना बघितला आहे. आज कारखान्याची दयनीय अवस्था झाली आहे. कारखान्यात किती भ्रष्टाचार झाला. हे मला आत्ता समजले. कारखाना सुरू होण्यासाठी मी स्वतः तुमच्याबरोबर असणार आहे. आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते बाहेर असल्याने संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरविली जाईल. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी चर्चा केली आहे. वेळप्रसंगी तुमच्याबरोबर उपोषणाला बसण्याची तयारी आहे.
