हरयाणात संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचा सुवर्णोत्सव! महाराष्ट्राला सहा सुवर्णपदके मिळवून देत स्वतःही घडवला इतिहास

नायक वृत्तसेवा, संगमनेर
हरयाणातील पंचकुला येथे सध्या चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेची धूम सुरू आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत योगासन खेळात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार्‍या संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचाच बोलबाला बघायला मिळाला. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी योगासनांमध्ये सुवर्णपदकासह खातं उघडणार्‍या ध्रुव ग्लोबल स्कूलने एकूण 11 पदकांची कमाई केली असून त्यात सहा सुवर्णपदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ध्रुवच्या निरल वाडेकर या योगासनपटूची गोव्याच्या संघात निवड झाली होती, तिनेही गोव्याकडून खेळताना सुवर्णपदक प्राप्त केल्याने ध्रुव ग्लोबलच्या एकूण सुवर्णपदकांची संख्या सातवर पोहोचली आहे. योगासनांमध्ये महाराष्ट्राने एकूण 11 सुवर्णपदके मिळवली असून ही सर्व पदके ध्रुव ग्लोबलच्या योगासनपटूंनी जिंकून एक नवा इतिहास रचला आहे.

गेल्या 4 जूनपासून पंचकुला येथील तावू देवीलाल क्रीडा संकुलात खेलो इंडिया युथ गेम्स् सुरू आहेत. यंदा पहिल्यांदाच या स्पर्धेत योगासनांचा समावेश करण्यात आला होता. त्यासाठी ध्रुव ग्लोबल स्कूलने राज्याच्या कानाकोपर्‍यातून योगासनपटू निवडून आणले व गेल्या दोन वर्षांपासून त्यांना प्रशिक्षण देण्यासह त्यांच्याकडून योगासनांचा सरावही करुन घेण्यात आला. या स्पर्धेत महाराष्ट्राकडून सहभागी झालेल्या एकूण 22 योगासनपटूंमध्ये संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या 20 जणांचा समावेश आहे. ऑलिम्पिक गेम्सचा प्रवेशमार्ग समजल्या जाणार्‍या या स्पर्धेत योगासन संघाकडून मोठी अपेक्षा होती, ती पूर्ण झाली असून या स्पर्धेत महाराष्ट्राच्या योगासनपटूंनी सुवर्णदीपक कामगिरी बजावली आहे.

विविध खेळांचा समावेश असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेतील योगासनांमध्ये महाराष्ट्राने सहा, गोव्याने दोन व हरयाणाच्या संघाने एक सुवर्णपदकं मिळविले आहे. त्यातील तब्बल सात सुवर्णपदके संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या योगासनपटूंनी प्राप्त केली आहेत. पारंपरिक योगासनांमध्ये सुमीत बंडाळे याने सुवर्ण तर तन्वी रेडीज हिने रौप्यपदक मिळवून पदकतालिकेत महाराष्ट्राचे खाते उघडले. त्यानंतर आर्टिस्टिक एकेरी प्रकारात रुपेश सांगे व गोव्याकडून खेळलेल्या ध्रुवच्या निरल वाडेकरने सुवर्ण, प्रांजल व्हाना हिने रौप्य तर रुद्राक्षी भावेने कांस्य पदकं मिळविले. याच प्रकारातील दुहेरी प्रकारात वैदेही मयेकर व युगांका राजमने मुलींच्या गटात तर आर्यन खरात व निबोध पाटील यांनी मुलांच्या गटात सुवर्णपदक प्राप्त केले.

रिदमिक दुहेरी प्रकारातही महाराष्ट्राकडून खेळणार्‍या ध्रुव ग्लोबलच्या विद्यार्थ्यांचेच वर्चस्व दिसून आले. या प्रकारात मुलींच्या गटात स्वरा गुजर व गीता शिंदे यांच्या जोडीने तर मुलांच्या गटात नानक अभंग व अंश मयेकर यांच्या जोडीने सुवर्णपदके मिळवून हरयाणाच्या देवीलाल क्रीडा संकुलात सुवर्णोत्सव साजरा केला. सांघिक आर्टिस्टिक प्रकारातही ध्रुव ग्लोबलच्या खेळाडूंनी दोन रौप्यपदके महाराष्ट्राला प्राप्त करुन दिली. प्रीत बोरकर, सुमीत बंडाळे, जय कालेकर, रुपेश सांगे व ओम राजभर या मुलांच्या गटाने तर मृणाली बाणाईत, तन्वी रेडीज, रुद्राक्षी भावे, स्वरा गुजर व गीता शिंदे या मुलींच्या गटाने सांघिक प्रकारात रौप्यपदकांची कमाई करीत महाराष्ट्राच्या विजयाची पताका फडकावती ठेवली. महाराष्ट्र योगासनांच्या दोन्ही संघांनी या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी बजावताना जनरल चॅम्पियनशीपचा किताबही पटकाविला आहे. राज्याचे प्रतिनिधीत्व करणार्‍या ध्रुव ग्लोबल स्कूलने केलेल्या या कामगिरीमुळे शाळेचे व्यवस्थापन, शिक्षक व पालकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.


महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार्‍या ध्रुव ग्लोबलच्या योगासनपटूंनी शाळेची आणि आमच्या सर्वांची मान अभिमानाने उंचावली आहे. गेल्या पाच वर्षांपासून हे खेळाडू व प्रशिक्षक जीवतोड परिश्रम घेत आहे. मागील दोन वर्षे कोविडचा संसर्ग असतांनाही या सर्वांनी बायो-बबलमध्ये राहून कठोर परिश्रम घेतले. दिवाळीच्या सणालाही ही मुले घरी गेली नाहीत. मंगेश खोपकर, स्वप्नील जाधव, प्रवीण पाटील व किरण वाडेकर या चारही प्रशिक्षकांनी गेली चार वेर्ष प्रचंड मेहनत घेवून या स्पर्धेसाठी मुलांना तयार केले. रात्री उशिरापर्यंत मुलांबरोबर सराव करत त्यांनी खेळाडूंच्या मनातील आत्मविश्वास वाढवला. त्याचाच परिपाक खेलो इंडिया स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या समोर आला आहे.
– डॉ.संजय मालपाणी
संस्थापक – ध्रुव ग्लोबल स्कूल, संगमनेर

Visits: 221 Today: 1 Total: 1420132

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *