उत्तरेत बिबट्याचे दोघांवर जीवघेणे हल्ले; संगमनेरात महिलेचा बळी! ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण; नागरी वस्त्यांत बिबट्यांचा संचारही वाढला

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सोमवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात विवाहितेचा बळी गेला. याच दरम्यान राहाता तालुक्यातील पिंप्री लोकई येथील सहावर्षीय मुलावरही बिबट्याने हल्ला केला. सुदैवाने दिव्यांग असलेले त्याचे वडील जवळच असल्याने त्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली. या हल्ल्यात जखमी झालेल्या बालकावर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तीस किलोमीटरच्या अंतरात एकाच दिवशी घडलेल्या या दोन्ही घटनांनी ग्रामीण भागातील नागरीकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. ऊसाच्या वाढत्या क्षेत्रामुळे नागरी वस्त्यांच्या आसपास बिबट्यांचा वावर वाढल्याचा निष्कर्षही यातून समोर आला आहे.

सोमवारी (ता.21) रात्री सव्वा आठच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथे राहणार्‍या हिराबाई एकनाथ बढे (वय 45) या महिलेवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. सदरची महिला आपल्या घराच्या अंगणात असतांना दबा धरुन बसलेल्या बिबट्याने थेट त्यांच्या मानेवरच झडप घातल्याने त्यांना बचावाची कोणतीही संधी मिळाली नाही. सदर महिलेवर झडप घातल्यानंतर बिबट्याने त्यांना काही अंतरापर्यंत फरफटतही नेले. त्यातून बिबट्याच्या दातांमुळे त्यांना खोलवर दुखापती झाल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील लोकांसह काहींनी आरडाओरड केल्याने बिबट्याने त्या महिलेला सोडून तेथून पळ काढला. संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी तातडीने खासगी वाहनातून त्यांना लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेने मेंढवण परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

जंगली भागावरील मानवी अतिक्रमण आणि त्यातून निर्माण झालेले अन्नपाण्याचे दुर्भीक्ष यामुळे श्वापदांचा मानवी वस्त्यांमधील संचार उत्तर नगर जिल्ह्यासह संगमनेर तालुक्याला नवा नाही. मात्र गेल्या काही कालावधीत बिबट्यांच्या मानवावरील हल्ल्याच्या घटना समोर येवू लागल्याने चिंता वाढल्या आहेत. जंगलीभागातून दूर आलेल्या या श्वापदांना दिवसा आश्रयासाठी ऊसाचे मळे सर्वात सुरक्षित आसरा ठरत असल्याने तालुक्यातील मुळा व प्रवरा नद्यांच्या खोर्‍यात त्यांची मोठी संख्या आहे. दिवसोंदिवस शिकारींचे दुर्भीक्ष निर्माण होत असल्याने एखाद्या शिकारीचा पाठलाग करीत बिबटे मानवी वस्त्यांकडे व पर्यायाने त्यांच्या पाळीव प्राण्यांकडे आकर्षित होतात.

शेतकर्‍यांची दुभती जनावरे, पाळी कुत्री, शेळ्या व कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या अशा आशयाच्या वृत्ताचे बागायती क्षेत्रात कोणतेही नवल नाही. मात्र रात्रीच्या अंधारात गुपचूप येवून जनावरे फस्त करणारे हेच बिबटे जेव्हा ऐन सायंकाळी घात लावून माणसावरच धाव करीत असतील तर चिंता करण्यासारखी स्थिती आहे. यावर सगळ्याच घटकांकडून गांभिर्याने विचार होण्याची गरज आहे. सोमवारी एकाच दिवशी अवध्या तीस किलोमीटर अंतरात बिबट्याच्या माणसावर हल्ल्याच्या दोन घटना घडल्या. यातील संगमनेर तालुक्यातील घटनेत दुर्दैवाने महिलेचा बळी गेला, तर राहात्यातील घटनेत सुर्दैवाने मुलाचा जीव वाचला (सविस्तर वृत्त पान पाचवर).

Visits: 21 Today: 1 Total: 115502

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *