निमगाव खुर्दमध्ये श्वापदाच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार! उत्तरीय तपासणीनंतर होणार स्पष्ट; बिबट्याने हल्ला केल्याचा संशय; वनविभागाकडून तपास सुरु..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द परिसरात 62 वर्षीय वृद्ध महिलेचा रक्तबंभाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. सदर महिलेला आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झोपेत असतानाच झापातून ओढून नेल्याचे समजते. एखाद्या श्वापदाने सावज हेरुन हल्ला केला असण्याची शक्यता वर्तविली जात असून वन विभागाने त्या दृष्टीने तपास सुरु केला आहे. सदर महिलेचा मृतदेह घरापासून सुमारे आठशे मीटर अंतरावर आढळल्याने व मयतेच्या शरीरावरील कपडे फाटलेले आणि गळ्यासह छातीवरही जीवघेण्या जखमा असल्याने सदरचा हल्ला बिबट्यानेच केला का याबाबत वन विभाग साशंक असून उत्तरीय तपासणीनंतरच याबाबतचा नेमका निष्कर्ष काढता येणं शक्य असल्याचे वनाधिकारी सचिन लोंढे यांनी दैनिक नायकशी बोलतांना सांगितले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील निमगाव खुर्द परिसरात राहणारी मिराबाई रामभाऊ मेंगाळ (वय 62) ही वृद्ध महिला आपल्या घराच्या झापात गाढ झोपेत असताना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात श्वापदाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्यांना घरापासून सुमारे आठशे मीटर अंतरापर्यंत फरफटत ओढून नेले. या हल्ल्यात सदर महिलेच्या गळ्याला व छातीला गंभीर दुखापती झाल्याने व त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्रावही झाल्याने या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर निमगाव खुर्द परिसरासह संपूर्ण तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची वार्ता पसरली. या बाबतची माहिती मिळताच वन विभागाचे वनाधिकारी सचिन लोंढे यांनी तत्काळ आपल्या कर्मचार्यांना घटनास्थळी पाठविले. तालुका पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. सदर महिलेला घरापासून लांबवर फरफटत नेले असले तरीही हा हल्ला बिबट्यानेच केला असावा याबाबत परिस्थितीजन्य पुरावे आढळून आलेले नाहीत. कारण सदर महिलेच्या गळ्याचा घोट घेण्यासह त्यांच्या छातीवरही खोलवर गंभीर जखमा असल्याचे दिसून येत आहे. त्यावरही सदर महिलेच्या शरीरावरील कपडेही पूर्णतः फाटलेले असल्याने वन विभागाने हा हल्ला कोणत्या प्राण्याचा आहे याबाबत मत व्यक्त केलेले नाही.
सदर महिलेच्या मृतदेहाची संगमनेरच्या कुटीर रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाल्यानंतरच याबाबतचा नेमका निष्कर्ष काढता येणार आहे. मात्र या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली असून स्थानिक नागरीकांमध्ये हा हल्ला बिबट्यानेच केल्याची चर्चा सुरु आहे. पोलिसांनीही घटनास्थळाचा पंचनामा करुन पोलीस दप्तरी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे.